आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पक्षात एकाकी अजितदादा काैटुंबिक दबावामुळे काकांना शरण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : ज्या काकांचे बाेट धरून राजकीय कारकीर्द गाजवली त्या शरद पवारांविराेधात बंड करत भाजपच्या सत्तेत उपमुख्यमंत्रिपद मिळवणाऱ्या अजित पवारांना शनिवारपासून झाेप नव्हती. त्यांचा हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे पवार कुटुंबीयांसाठीही तितकाच धक्कादायक हाेता. मात्र या धक्क्यातून सावरत बहीण सुप्रिया सुळेंपासून ते शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताईंपर्यंत सगळ्यांनीच अजितदादांनी राजीनामा देऊन परत यावे यासाठी प्रयत्न केले. भावनिक दबाव वाढत हाेता. त्यातच जे आमदार साेबत राहतील असा विश्वास वाटत हाेता, तेही शरद पवारांकडे परतल्याने अजितदादांच्या बंडातील हवा निघून गेली. अखेर उद्या नाचक्की हाेण्यापेक्षा माघार घेतलेली बरी, या भावनेने अजितदादांनी चारच दिवसांत उपमुख्यमंत्रिपद साेडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. आता ते राजकारणापासून दूर राहणार असल्याचीही चर्चा आहे.
पवारांचा वारस ठरवताना आपल्याला डावलले जात असल्याची खदखद अजितदादांच्या मनात अनेक वर्षांपासून हाेती. यातून अनेकदा त्यांनी टाेकाचे निर्णयही घेतले हाेते. आता शरद पवार शिवसेना व काँग्रेससाेबत सत्तास्थापनेच्या हालचाली करत असतानाही अजित पवारांनी शनिवारी काकांना अंधारात ठेवून भाजपशी हातमिळवणी करत सत्ता मिळवली हाेती. मात्र तेव्हापासून ते कुटुंबीयांपासून काही काळ अलिप्त राहू लागले हाेते. बहीण सुप्रिया सुळेेंनी लगेचच त्यांना परत येण्याचे आवाहन साेशल मीडियातून केले हाेते. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे बडे नेते तीन दिवसांपासून अजित पवार यांना भेटून त्यांचे मन:परिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत होते. पण दादा भूमिकेवर ठाम हाेते.

मात्र मंगळवारी सकाळी पंचतारांकित हॉटेलमध्ये सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी अजितदादांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. शरद पवार यांच्याशीही त्यांचे फोनवर बोलणे करून दिले. तरीही अजित पवारांचा ताठरपणा कमी हाेताना दिसत नव्हता. मात्र जेव्हा शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाकाकींनी फाेनवरून अजितदादांना कुटुंब न दुभंगण्याची साद घातली तेव्हा मात्र अजितदादांचा कठाेरपणा कमी झाला. पवारांचे संयुक्त कुटुंब आजही आहे. अजितदादांसह सर्व भावंडं प्रतिभाकाकींना आईच्या जागी मानतात. ही बाब लक्षात घेऊनच पवार कुटुंबातून प्रतिभाकाकींना या कामी पुढे करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यातच बंड करताना राष्ट्रवादीतील जे आमदार साेबत येतील असे दादा गृहीत धरून हाेते, ते सर्वच जण (अगदी धनंजय मुंडेही) शरद पवारांकडे परतल्यामुळे अजितदादांच्या बंडातील हवा निघून गेली हाेती. त्यातच मंगळवारी सकाळी सर्वाेच्च न्यायालयाने बुधवारपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले हाेते. २४ तासांत एवढे संख्याबळ जमवणे शक्य नसल्याची खात्रीही अजितदादांना पटली हाेती. त्यामुळे काैटुंबिक दबाव व वास्तववादी परिस्थितीचे भान ठेवून अजितदादांनी माघार घेतल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांतून मिळाली.
 

बातम्या आणखी आहेत...