आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीसाेबत सत्ता स्थापन करण्याची रणनीती करण्यात शिवसेना व्यग्र असताना सर्वात माेठा पक्ष असूनही सत्तास्थापनेत असमर्थ ठरलेल्या भाजपचे नेते शांत हाेते. मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्या शिवसेनेला मात्र हे माहीत नव्हते की भाजपच्या गाेटातील ही शांतता वादळापूर्वीची हाेती. या काळात 'वर्षा'वर पडद्यामागे बऱ्याच घडामाेडी घडत हाेत्या, सत्तेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या महाविकास अाघाडीला मात्र याची पुसटशीही खबरबात नव्हती. ही अाघाडी चर्चेचा खल करण्यात गुंतलेली असताना शनिवारी भाजपने या अाघाडीतीलच महत्त्वाचे नेते, अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा एक गट फाेडून थेट सत्ता स्थापन केली. केंद्रात असलेल्या सत्तेचा फायदा घेत भाजपने रात्रीतून सत्तास्थापनेचा दावा दाखल केला, राष्ट्रपती राजवटही उठवली अन् सकाळी अाठ वाजता शपथविधीही उरकून घेत शिवसेनेच्या मनसुब्यावर पाणी फिरवले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी भाजपने बहुमत नसल्याने सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे राज्यपालांना पत्र दिले त्याच दिवशी सत्तास्थापनेची तयारी सुरू केली हाेती. शिवसेनेला आता सोबत घ्यायचेच नाही असे ठरवून राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी काय करता येईल याची चाचपणी सुरू हाेती. या माेहिमेची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि काँग्रेसमधून भाजपत अालेल्या एका बड्या नेत्यावर सोपवण्यात आली होती. या तिघांनी चाचपणी करून अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे एक अहवाल पाठवला. देवेंद्र फडणवीस यांचे अजित पवारांशी असलेले चांगले संबंध आणि शरद पवार व अजितदादांत वाढलेला दुरावा याच लाभ उठवण्याचे भाजपने ठरवले.
लोकसभेला अजितदादांचे पुत्र पार्थ पवार पराभूत झाले, मात्र विधानसभेत पुतणे राेहित पवार विजयी झाले. पार्थला पराभूत करण्यात पक्षातील काही लाेकांनीच 'हातभार' लावल्याचा अजितदादांना संशय हाेता. तेव्हापासून पवार कुटुंबात दुही वाढली हाेती. हीच बाब भाजपने लक्षात घेतली.
शुक्रवारी रात्री जेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची बैठक झाली, त्या वेळी अजित पवारही उपस्थित हाेते. शरद पवारांनी बाहेर येताच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर एकमत झाल्याचे सांगितले. त्यावरून अजितदादांच्या नाराजीत भर पडली. त्यांनी तातडीने फडणवीसांशी संधान साधून सत्तास्थापनेत सहकार्य करण्यास अनुकूलता दर्शवली. हे राजकारण शिजत असल्याची कल्पना भाजपने राज्यपालांना अाधीच देऊन ठेवली हाेती, त्यामुळे दिल्ली दाैरा रद्द करून ते मुंबईतच थांबले हाेते. अजित पवार शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता राष्ट्रवादीच्या अामदारांच्या सह्यांचे पत्र घेऊन राजभवनात गेले, तिथे भाजप व राष्ट्रवादीच्या पत्रावरून बहुमत असल्याचे पाहून राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट उठवण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तातडीने कळवले. त्यांनीही लगेचच अनुकूल निर्णय घेतला. अाणि शनिवारी पहाटे राष्ट्रपती राजवट उठवत असल्याचे पत्र दिले.
फडणवीसांसाेबत दादा राजभवनात
शुक्रवारी मध्यरात्रीच अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आणि त्यांच्यासोबतच पहाटे साडेसातच्या सुमारास राजभवनवर गेले. तिथे अजितदादांनी १२ समर्थक अामदारांनाही बाेलावले हाेते. सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. इकडे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणार की नाही, याचा निर्णय शरद पवार यांना शनिवारी कळवून राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी पत्र देणार होते. परंतु त्यापूर्वीच भाजपने अजित पवार यांच्या मदतीने शपथविधी पार पाडला.
शपथविधीनंतर भाजपच्या नेत्यांसाेबत हस्तांदाेलन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.