आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारच्या निर्णयाबद्दल बोलायचेच नाही, ही तर हुकूमशाही : अजित पवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजीव पिंपरकर

सोलापूर - २०१४ च्या निवडणुकीत मोदी यांची सुप्त लाट होती. कोणालाही अपेक्षा नव्हती एवढ्या प्रचंड संख्येने भाजपचे सरकार आले. तशीच लाट आता युवकांमध्ये आहे. युवकांत दिसणारा उत्साह सत्तासमीकरणात बदल घडवेल, असा आत्मविश्वास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. 
 

प्रश्न : निवडणुकीत समोर पैलवान नसल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबद्दल काय वाटते?
अजित पवार : भाजपवाले अतिअात्मविश्वासात आहेत. आम्ही सभांमधून सांगतोय ही देशाची नव्हे महाराष्ट्राची निवडणूक आहे. पाच वर्षांच्या कारभाराबद्दल लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे राज्यकर्त्यांनी दिली पाहिजेत. ३७० कलम, जम्मू-काश्मीर-लडाख याचा महाराष्ट्राशी काय संबंध? प्रश्नांची थेट उत्तरे टाळत फडणवीस म्हणतात समोर पैलवान नाही. पैलवान नसेल तर नरेंद्र मोदी १० आणि अमित शहा २० सभा का घेतात? मुख्यमंत्र्यांनाही एवढ्या सभा का घ्याव्या लागल्या? त्यांचे अनेक केंद्रीय मंत्री फिरत आहेत. याचा अर्थ एवढी ताकद लावली पाहिजे, असे त्यांना वाटते. कारण पाच वर्षांचे अपयश त्यांच्यासमोर आहे. 

प्रश्न : भाजपच्या प्रचारात ३७० चा उल्लेख वारंवार होतो. त्यामुळे युवक त्यांच्या मागे जातील का?
अजित पवार : बेरोजगारीबद्दल युवकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ७२ हजारांची नोकरभरती करणार, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. एकही भरती न करताच आकडा ७२ हजारावरून ३६ हजारावर आला. नंतर लगेच निवडणुका लागल्या. असंतोषातील युवकांनी सोशल मीडियावर ३७० कलमाच्या विरोधात ट्रोल केले तर देशद्रोही ठरवले जाते. सरकारच्या विरोधात कोणी बोलूच नये, असा दृष्टिकोन आहे. तुमच्या निर्णयावर टीका-टिपण्णी करू नये, असे लोकशाहीमध्ये होऊच शकत नाही. तसेच हवे असेल तर लोकशाही कशाला म्हणायचे? ती हुकूमशाही झाली.

प्रश्न : एवढी पक्षांतरे व बंडखोरी का झाली? 
अजित पवार : भाजपला जनतेची कामं करण्यापेक्षा तोडाफोडीचे राजकारण करायचे आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राला ते पटत नाही. ज्यांनी इकडून तिकडे कोलांटउड्या मारल्या त्यांच्याबद्दल लोकांमध्ये चांगली भावना नाही. निवडणुकीच्या निकालानंतर ते स्पष्ट होईल. भाजपमध्येही असंतोष आहे. काेणी बोलू शकत नाही. मागच्या निवडणुकीत मोठा सहभाग असलेलेे एकनाथराव खडसे, विनोद तावडे यांचा पत्ता कट केला. राजपुरोहित, चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी समाजाचे विष्णू सावरा, मागासवर्गीय दिलीप कांबळे यांचेही पत्ते कट झाले. खरे तर हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. पण लोकांना प्रश्न पडलाय, तुमच्या सरकारने चांगले काम केले तर एवढ्या मंत्र्यांना दूर ठेवण्याचे कारण काय? याचे उत्तर जनतेला मिळावे. 

प्रश्न : आघाडीपेक्षा ग्रामीण भागाचे प्रश्न युतीने जास्त सोडवल्याचा दावा मुख्यमंत्र्यांचा आहे. 
अजित पवार : तसे अजिबात नाही. ग्रामीण महाराष्ट्रातल्या प्रश्नांबाबत जाण नाही, असे अनेक प्रश्नांवरून वाटते. ग्रामीण रस्त्यांची काय लायकी आहे ते बघा? राष्ट्रीय हमरस्त्यांची काढलेली अनेक कामे ठप्प झाली आहेत. आम्हाला तर माहिती मिळतेय, त्यासाठी निधी उपलब्ध नाही आणि तो सगळा अधिकार पंतप्रधान कार्यालयाने काढून घेतला आहे. १६ हजार शेतकरी आत्महत्या झाल्या. कर्जमाफीची टिमकी हे मिरवतात. आम्ही सभेत विचारतो तेव्हा एकही शेतकरी हात वर करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही फसवी कर्जमाफी करता, हे कशाचे उत्तर आहे?  नोटबंदीचा अतिशय वाईट परिणाम ग्रामीण भागावर झाला आहे. लाेकांच्या हातात पैसा नाही. दिवाळी तोंडावर आली असताना शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांना दुष्काळ हाताळता आला नाही. पूरस्थिती हाताळता आली नाही. 


प्रश्न :  सरकारची आर्थिक स्थिती सुधारल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा कितपत योग्य आ
हे?
अजित पवार : युतीच्या सरकारने महाराष्ट्राला कर्जबाजारी केले आहे. मी अर्थमंत्र्याची जबाबदारी खाली ठेवली तेव्हा अडीच लाख कोटींचे कर्ज होते आणि आता नवीन सरकार येईल तेव्हा कर्जाची रक्कम पाच लाख तीन हजार कोटींचे कर्ज असेल. याचा अर्थ असा की, ५४ वर्षांत अडीच लाख कोटी आणि फक्त पाच वर्षांत पाच लाख तीन हजार कोटींचे कर्ज त्यांच्या अपयशामुळे निर्माण झाले. त्यामुळेच काही मंत्र्यांना थांबवले. त्याच्यामागचे कारण निश्चितपणे वेगळे आहे. आता कोणी स्पष्टपणे बोलत नाहीत. कारण त्याचा परिणाम निवडणुकीतल्या भाजपच्या प्रतिमेवर होईल. तीच अवस्था शिवसेनेची. भाजपबरोबरची आमची २५ वर्षे सडली, या शब्दात उद्धव ठाकरे म्हणाले. जागा वाटपात ५० टक्क्यांची भाषा करताना १२४ जागांवर समाधान मानावे लागले.   

प्रश्न : राज ठाकरे म्हणतात विरोधक सक्षम नाहीत? 
अजित पवार : आम्ही पाच वर्षात संघर्ष यात्रा, हल्लाबोल आंदोलन केले. कर्जमाफीची घोषणा करायला लावली. अंमल केला नाही यात त्यांचे अपयश आहे. सभागृहात विरोधकांचा आवाज दाबायचा प्रयत्न सत्ताधारी करतात. परवा मोदींच्या आगमनामुळे सभेसाठी निघालेल्या अमोल कोल्हे व अमोल मिटकरी यांचे हेलिकॉप्टर टेक ऑफ करू दिले नाही सुरक्षिततेच्या नावाखाली. त्यांच्या सभाच होऊ द्यायच्या नाहीत, हा रडीचा डाव आहे. 
 

प्रश्न : तुम्ही सत्तेत असतानाही निवडणूक लढवली. आता विरोधक म्हणून निवडणूक लढताय, परिणाम काय जाणवतो? रसद कमी पडतेय का? 
अजित पवार :  परिणाम सरळसरळ जाणवतो. माध्यमांमधून जाहिराती कोणाच्या आहेत? विरोधी पक्षांवर त्याचा परिणाम झाला आहे. ते कशाही पद्धतीने निधी गोळा करू शकतात. खर्च करतात. आमच्या सभांमध्ये फक्त स्टेज आणि माईक असतात. त्यांच्या सभांमधून प्रचंड स्टेज, भपकेबाजपणा असतो. एकीकडे पाऊस पडत नाही म्हणून झाडं लावायचं आवाहन केले जाते. आणि हे सभांसाठी झाडे तोडतात. पर्यावरणमंत्री याचे समर्थन करतात. हे आणखीन दुर्दैव. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता असे चाललेले आहे. प्रत्येक राष्ट्रीय पक्षाच्या खात्यात पैसे आहेत? हे पाहिले तर सहज लक्षात येईल. त्यांच्याकडे हजार कोटींच्या घरात पैसे आहेत. विरोधकांकडे नाममात्र पैसे आहेत. पण लोकांना बदल करायचा असेल तर ते गप्प बसून करतात.  
 

प्रश्न : तरुणांचा कल कोणाकडे आहे?
अजित पवार : शरद पवार यांच्या सोलापुरातील प्रचाराच्या प्रारंभ सभेत तरुणांचा जो प्रचंड उत्साह दिसला तो आम्हाला सगळीकडे पाहायला मिळला. याचा अर्थ तरुणांना बदल हवा आहे. बदल होतो तेव्हा तरुणांचीच भूमिका महत्त्वाची असते. असा उत्साह मागच्या निवडणुकीत नव्हता. मागच्या निवडणुकीत मोदी यांची सुप्त लाट होती. कुणालाही अपेक्षा नसताना ३० वर्षांत एका पक्षाचं पूर्ण बहुमताचं सरकार आलं. तशी लाट आता युवकांमध्ये आहे. २४ तारखेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी ‘मॅजिक फिगर’ निश्चित गाठेल.