आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून साहित्य संमेलन; आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्र्यांची दांडी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ/नागपूर- ज्येष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना आधी निमंत्रण देऊन नंतर ते रद्द करण्यावरून निर्माण झालेली वादाची वावटळ आता शांत झाली आहे. यवतमाळ येथे शुक्रवार, ११ जानेवारीपासून ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास प्रारंभ होत आहे. आयोजन समितीच्या सूचनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलेेेच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती महामंडळाच्या प्रभारी अध्यक्ष विद्या देवधर यांनी दिली. मात्र दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय बैठकीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटनास येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

 

वैशाली येडे यांना बहुमान 
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील वैशाली येडे संमेलनाचे उद्घाटन करतील. शेतकरी पतीच्या आत्महत्यानंतर हालअपेष्टा सहन करून त्याच्याशी निर्धाराने लढा देत वैशाली सध्या सन्मानाने जगत आहेत. विशेष म्हणजे, 'तेरवं' या शेतकरी विधवांच्या लढ्याची कहाणी असलेल्या नाटकात भूमिका साकारून त्यांनी या प्रश्नाला तेवत ठेवले आहे.
 
बहिष्कृत कार्यक्रमांचे नियोजन पांगले, अनेक कार्यक्रम रद्दबातल 
निमंत्रित वक्ते, कवी, लेखकांनी बहिष्कार असलेल्या कार्यक्रमांचे, टॉक शोचे, मुलाखती, सत्काराचे नियोजन अखेर पांगले. आता मान्यवरांचा सत्कार, टाॅक शो, प्रकट मुलाखत होणार नाही. विद्या बाळ यांचा सत्कार, प्रभा गणोरकर यांची मुलाखत होणार नाही. 'माध्यमांची स्वायत्तता नेमकी कुणाची?' हा टाॅक शो रद्द करण्यात आला. 

 

नयनतारांना पत्र पाठवणार 
संमेलनाच्या इतिहासात प्रथमच 'प्रभारी अध्यक्ष' महामंडळाचे प्रतिनिधित्व करतील. श्रीपाद जोशी यांच्या राजीनाम्यामुळे उपाध्यक्ष विद्या देवधर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महामंडळाची बैठक झाली. त्या म्हणाल्या, नयनतारा सहगल यांना महामंडळाच्या वतीने एक पत्र पाठवण्यात येणार आहे. मात्र, त्यांचे भाषण वाचले जाणार नाही. 

 

मुख्यमंत्री पक्षाच्या कामासाठी दिल्लीत : पालकमंत्री येरावार 
मुख्यमंत्री शुक्रवारी वाराणसी, तर शनिवारी पक्षाच्या कामासाठी दिल्लीला आहेत. यामुळे ते संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र १२ किंवा १३ रोजी येण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पालकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदन येरावार यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...