आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसऱ्या आघाडीसाठी केसीआर यांची भेट घेणार : अखिलेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- समाजवादी पार्टीचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रादेशिक पक्षाला सोबत घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रस्तावाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आघाडी स्थापन करण्यासाठी मी हैदराबादला जाऊन चंद्रशेखर राव यांची भेट घेणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

मध्य प्रदेशात सपाचा एकमेव आमदार आहे. राज्यातील मंत्रिमंडळात आपल्या पक्षाच्या आमदारास मंत्रिपद देण्याची मागणी सपाने केली होती. मात्र काँग्रेसने त्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे अखिलेश नाराज झाले आहेत. अखिलेश म्हणाले, काँग्रेसने समाजवादींचा मार्ग खुला केला. त्याबद्दल त्यांचे आभार. भाजपचेही आभार. त्यांना समाजवादी मागास वाटतात. चंद्रशेखर राव यांनी गेल्या आठवड्यात बिजू जनता दलाचे प्रमुख व आेडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक तसेच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन आघाडीबाबत विचारविनिमय केला. बुधवारी त्यांनी मोदी यांची भेट घेतली होती.

 

रालोआत फूट : ‘अपना दल’ कार्यक्रमात सहभागी होणार नाही
केंद्रात मोदी सरकारमध्ये आरोग्य राज्यमंत्री असलेल्या अनुप्रिया पटेल यांचा अपना दल आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर नाराज झाला आहे. केंद्रीय नेतृत्वात असलेला पक्ष अपना दलच्या नेत्यांना सन्मानजनक वागणूक देत नाही. तोपर्यंत अनुप्रिया पटेल व त्यांचे पती आशिष पटेल युपीत कोणत्याही सरकारी कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. बुधवारी देवरिया येथे अनुप्रिया यांच्या हस्ते नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाच्या उदघाटनाची जबाबदारी होती. मात्र हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत  भाजपने अपना दलशी आघाडी केली होती.

 

काँग्रेसशी आघाडीस तयार, शिवपाल यांची भूमिका
समाजवादी पार्टीचे बंडखोर नेते शिवपाल यादव यांनी आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेससोबत हातमिळवणी करून लढण्याचे संकेत दिले आहेत. प्रगतिशील समाजवादी पार्टीचे (लोहिया) प्रमुख यादव यांनी राज्यात भाजपला पराभूत करण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य आघाडीबद्दल विचारणा केली असता ते म्हणाले, आमच्या संघटनेच्या उत्तर प्रदेशात ७५ जिल्ह्यांत शाखा आहेत. या सर्व ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. आम्ही भाजपला पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही त्यासाठी काँग्रेससोबत आघाडी करण्यासही तयार आहोत, असे ते म्हणाले. मंगळवारी रात्री एका कार्यक्रमानिमित्त बरेलीत आलेल्या शिवपाल यांनी ही भूमिका जाहीर केली.

बातम्या आणखी आहेत...