आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निळवंडे धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क अकोल्याचाच; माजी मंत्री मधुकर पिचड यांचा एल्गार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले- निळवंडे धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क अकोल्याचा आहे. हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आम्ही लढाई करू, असा एल्गार माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केला. अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या गळिताचा प्रारंभ करताना शुक्रवारी ते बोलत होते. 


कोणत्याही प्रकारचे योगदान नसतानाही निळवंडे धरणाचे काम आपल्यामुळेच झाले असल्याचे सांगत काही जण जनतेची दिशाभूल करत आपली पाठ थोपटून घेत आहेत. धरणाच्या निर्मितीसाठी थोडीफार संगमनेरकरांची मदत झाली. इतरांनी ढोल वाजवायचे बंद करावे, असे सांगत पिचड यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर टीकास्र सोडले. 


लोखंडी दरवाजाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली नसल्याने यावर्षी निळवंडेत पूर्ण क्षमतेने पाणी अडवण्यात जलसंपदा विभागाला अपयश आले. त्यामुळे उच्चस्तरीय कालव्यातून अकोल्याच्या शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. आढळा धरण भरलेले नाही. त्यामुळे अगस्तीच्या कार्यक्षेत्रातील ऊस विकासात अडचणी येत आहेत. अशातच जायकवाडी धरणात निळवंडेतून ४ हजार दलघफू पाणी सोडावे लागले, तर संपूर्ण निळवंडे धरणच रिकामे होईल, अशी भीती पिचड यांनी व्यक्त केली. 


महामंडलेश्वर डाॅ. रामकृष्णदास लहवितकर यांच्या हस्ते रौप्य महोत्सवी गळीत हंगामातील बाॅयलर अग्निप्रदीपन झाले. गव्हाणीत उसाची मोळी टाकण्यासाठी पूजेचा मान ज्येष्ठ संचालक मीनानाथ पांडे व अरुणा पांडे यांना देण्यात आला. पौराेहित्य गुरू धनंजय जोशी यांनी केले. प्रास्ताविक संचालक अशोक देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन मुख्य लेखापाल एकनाथ शेळके यांनी केले. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, राष्ट्रवादी किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष मधुकर नवले, अॅड. शांताराम वाळुंंज, बाजार समितीचे सभापती परभत नाईकवाडी, साईनाथ तरमळे (नेवासे), भागवत दातीर (पाथर्डी) यांची भाषणे झाली. 


या वेळी रामनाथ जाधव, विवेक केदार, जे. डी. आंबरे, संतूमामा भरीतकर, डाॅ. दशरथ बंगाळ, अॅड. के. डी. धुमाळ, नगराध्यक्ष संगीता शेटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक प्रकाश नाईकवाडी, परशराम शेळके, सीताराम देशमुख, प्रकाश नवले, गिरजाजी जाधव, शिवाजी फाफाळे, शिवाजी उंडे, पंढरीनाथ पिठे, रामनाथ सानप, गणेश चव्हाण, सुभाष फोफसे व भाऊसाहेब बोराडे, नितीन टर्ले, भाऊपाटील मालुंजकर, कचरू शेटे, अशोक देशमुख, अशोक आरोटे, राजेंद्र डावरे, बाळासाहेब देशमुख, भास्कर बिन्नर, सुरेखा देशमुख, मनीषा येवले, बाळासाहेब ताजणे, सुरेश गडाख, कार्यकारी संचालक भास्कर घुले उपस्थित होते. सुनील दातीर यांनी आभार मानले. 


खरा हुकूमशहा तर दिल्लीत.... 
'अगस्ती'च्या वार्षिक सभेत भाजपचे जि. प. सदस्य जालिंदर वाकचौरे यांच्या भाषणबंदीचा संदर्भ घेऊन पिचड म्हणाले, काही लोक माझ्यावर हुकूमशहा असल्याचा आरोप करतात, पण त्यांनी दिल्लीतील नेतृत्वाकडे पाहून सांगावे की, खरा हुकूमशहा कोण आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमती शंभराच्या घरात गेल्या आहेत. दुसरीकडे ऊसतोडणी कामगार संघटनेचे आंदोलन सुरू आहे. ऊस उत्पादक हुमणीच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले आहेत. अगस्तीने नुकसान सहन करून जिल्ह्यात सर्वाधिक ऊसदर दिला. सर्व ऊस उत्पादकांची दिवाळी गोड करण्यात येणार आहे. चांगला ऊसदर देण्यासाठी उपपदार्थ निर्माण केले पाहिजेत. अगस्ती इथेनॉल उपपदार्थ निर्मितीबाबत प्रगतिपथावर आहे, असे पिचड यांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...