Home | Maharashtra | Vidarva | Akola | Akola and Khamgaon's passenger injured in accident near aurangabad

अकाेला अन् खामगावचे प्रवासी अपघातात जखमी; औरंगाबाद येथे बजाज कंपनीजवळील घटना

प्रतिनिधी | Update - Aug 31, 2018, 12:18 PM IST

ट्रक आणि दोन ट्रॅव्हल्सच्या अपघातात ट्रॅव्हल्समधील २७ प्रवासी जखमी झाले. नगर-औरंगाबाद महामार्गावर बजाज कंपनीजवळील चौकात

 • Akola and Khamgaon's passenger injured in accident near aurangabad

  अाैरंगाबाद/ अकाेला- ट्रक आणि दोन ट्रॅव्हल्सच्या अपघातात ट्रॅव्हल्समधील २७ प्रवासी जखमी झाले. नगर-औरंगाबाद महामार्गावर बजाज कंपनीजवळील चौकात गुरुवारी पहाटे ३ वाजता ही घटना घडली. जखमींमध्ये अकोला, जळगावातील रहिवाशांचा समावेश असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.


  दरम्यान, मृत्युमार्ग बनलेल्या नगर-औरंगाबाद महामार्गावरील अपघात स्थळे आणि अशा घटना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांकडे लक्ष वेधणारे वृत्त ‘दिव्य मराठी’ने २८ ऑगस्ट रोजी प्रकाशित केले होते. गुरुवारी त्याच ठिकाणी पुन्हा अपघात झाला. एस. आर. ट्रॅव्हल्स कंपनीची स्लीप रकोच बस (एमएच ३०, बीडी ४५००) विमाननगर, पुणे येथून रात्री ८ वाजता १८ प्रवासी घेऊन अकोल्याच्या दिशेने निघाली होती. तर, नॉव्हेल्टी ट्रॅव्हल कंपनीची बस (एमएच १९ बीवाय १५२९) ही जळगावच्या दिशेने निघाली. मागे-पुढे असणाऱ्या या बस औरंगाबाद-नगर महामार्गावरून वाळूजमार्गे औरंगाबादकडे जात हाेत्या. पहाटे ३ च्या सुमारास वाल्मी-पाटोदा शाॅर्टकटने आलेला ट्रक (एमएच १६ एवाय ७५३१) बजाज आॅटो कंपनीच्या गेटजवळील चौकातून कामगार चौकाकडे जाण्यासाठी वळण घेत होता. अचानक समोर आलेला ट्रक पाहून एस.आर. ट्रॅव्हल्सचा बसचालक विठ्ठल शेषराव राठोड (३१, रा. वरखेड, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला) याने जोरात ब्रेक लावला. याच वेळी मागून भरधाव आलेली नॉव्हेल्टी ट्रॅव्हल्स कंपनीची बस समोरील एस. आर. ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसवर धडकली.


  प्राणापेक्षा सामान किमती
  दोन्ही बसमधील प्रवासी साखरझोपेत असतानाच हा अपघात झाला. या वेळी झालेला मोठा आवाज व वाहनांच्या धडकेमुळे दोन्ही बसमधील प्रवासी गोंधळून गेले. काही कळण्याच्या आत अनेकांना मार लागला. लहान मुले व महिलांना रडू आवरत नव्हते. मागून आलेल्या तिसऱ्या खासगी बसचे प्रवासी त्यांच्या मदतीला धावले. बसच्या खिडक्या तोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना घाटीत नेण्याची तयारी या बसच्या चालकाने दर्शवली. मात्र, आमचे सामान या बसमध्ये आहे, त्यामुळे आम्ही येणार नाही, असा पवित्रा जखमींनी घेतला.


  घटनास्थळी वाहतूक कोंडी
  जखमांपेक्षा सामान महत्त्वाचे असल्याचे सांगत तिथेच थांबणारे जखमी प्रवासी, तीन अपघातग्रस्त वाहने आणि मदतीसाठी थांबलेली तिसरी बस यांच्यामुळे घटनास्थळी वाहतूक कोंडी झाली. अखेर पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना घाटीत रवाना केले. या घटनेत तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. एस. आर. ट्रॅव्हल्सचा चालक राठोडच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी नाॅव्हेल्टी ट्रॅव्हल्स चालक रवींद्र गजमल सोनवणे व ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

Trending