आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएए-एनरसी विरोधात अकोल्यात बंद; आंदोलनकर्ते आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंद दरम्यान आंदोलनकर्त्यांनी पातुर रोडवरील भंडारजनजीक टायर जाळून रस्ता बंद केला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला. - Divya Marathi
बंद दरम्यान आंदोलनकर्त्यांनी पातुर रोडवरील भंडारजनजीक टायर जाळून रस्ता बंद केला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.

अजय डांगे

अकोला - सीएए व एनआरसीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी-भारिप-बमसंच्या नेतृत्वात शुक्रवारी अकोल्यात बंद पाळण्यात येत आहे. या बंद दरम्यान रेल्वे स्टेशन चौक परिसरात भाजप आमदार रणधीर सावरकर तसेच इतर काही नेते आणि आंदोलनकार्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. दुकाने बंद करण्यावरुन हा वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मात्र इतर नेत्यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद वेळीच मिटला. बंद दरम्यान आंदोलनकर्त्यांनी पातुर रोडवरील भंडारजनजीक टायर जाळून रस्ता बंद केला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.

शहरात शुक्रवारी सकाळपासूनच वंचित बहुजन आघाडी व भारिप-बमसंचे नेते बाजारपेठांमध्ये फिरून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन करीत होते. या आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी रोड, कापड बाजार, किराणा-कोठडी बाजार, मो. अली रोड, सराफ बाजार, गौरक्षण रोड, जठार पेठ, नेकलेस रोड, जुने शहर, रेल्वे स्टेशन परिसरातील दुकाने बंद आहेत. ग्रामीण भागातही कडकडीत बंद आहे. सध्या तरी कोणतीही अनुचित प्रकार घडलेला नाही. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. बस सेवा व खाजगी वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे काम करीत असून जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

असा झाला वाद


काही आंदोलनकर्ते रेल्व स्टेशन परिसरातील दुकाने बंद करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना करत होते.या ठिकाणी एका चहाच्या हॉटेलवर अकोला पूर्वचे भाजपचे आमदार रणधीर सावरकर व इतर काही नेते बसले होते. बळजबरीने दुकाने बंद करू नका, असे भाजप नेत्यांनी आंदोलनकर्त्यांना म्हटले. यावर काही आंदोलनकर्त्यांनी भाजप नेत्यांकडे पहात तुमच्यामुळेच हा कायदा आला असून आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असे म्हणाले. याठिकाणी काही वेळ तणाव निर्माण झाला होता. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हा वाद तेथेच मिटवण्यात आला.