आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात कडकडीत बंद; राज्यात संमिश्र प्रतिसाद, 'महाराष्ट्र बंदला जनतेचा चांगला प्रतिसाद' : प्रकाश आंबेडकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सीएए आणि एनआरसीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. राज्यभरात काही ठिकाणी बंद यशस्वी झाला असला तरी मुंबईत मात्र दोन-तीन ठिकाणी दगडफेकीच्या तुरळक घटना वगळता बंदचा परिणाम जाणवला नाही. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र महाराष्ट्र बंदला जनतेने चांगला प्रतिसाद दिल्याचे सांगत मुंबईत घाटकोपरमध्ये बसवर दगडफेक झाली त्या कार्यकर्त्यांनी तोंड झाकून हा प्रकार केला. तो आमचा कार्यकर्ता नाही, आम्ही तसे पोलिसांना कळवले आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी बंदबाबत माहिती देत बंद मागे घेत असल्याची घोषणा संध्याकाळी केली. या वेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशात लागू केलेला एनआरसी, सीसीए या कायद्यांना विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. मात्र, या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. त्यामुळे या बंदला गालबोट लागले. राज्यात शांततेत बंद पार पडला असून पोलिसांनी सुमारे साडेतीन हजार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, बंद यशस्वी केल्याबद्दल आपण महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानत आहोत, असेही ते म्हणाले.

लाेकांपर्यंत याेग्य संदेश गेला

मुंबईत चेंबूर, घाटकोपर आणि मुलुंड येथे वंचितच्या कार्यकर्त्यांनी बंद पाळण्यासाठी रस्त्यावर आंदोलन केले. घाटकोपर रमाबाईनगर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, या वेळी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले, त्यानंतर ठाणे तीन हात नाका या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुलुंड येथे बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वतःहून या बंदला पाठिंबा दिला, विक्रोळी असल्फा व्हिलेज, वरळी या मुंबईतील अनेक भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला, असेही त्यांनी सांगितले.

सांगलीत उडाला फज्जा

महाराष्ट्र बंदचा सांगलीत फज्जा उडाला.आंबेडकर पुतळ्यापासून सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध करण्यासाठी बहुजन वंचित आघाडीसह इतर संघटनांनी पाठिंबा देत काही काळ घोषणाबाजी केली. प्रमोद कुदळे यांनी संविधानाच्या मूलभूत ढाच्याला अडचणीत आणणारा हा कायदा असल्याचे सांगत मोदी-शहांनी कितीही राजकीय हेराफेरी केली तरी आम्ही लोकशाही मार्गाने लढा देणार, असे म्हणत आपली भूमिका या वेळी बोलताना स्पष्ट केली.

अकोल्यात सर्वत्र बाजारपेठा बंद

अकाेला : सीएए व एनआरसीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी-भारिप-बमसंच्या नेतृत्वात शुक्रवारी महानगरात कडकडीत बंद पाळण्यात अाला. ग्रामीण भागातही बंदला प्रतिसाद मिळाला. महानगरातील प्रमुख बाजारपेठा बंद हाेत्या. महानगरात बंद शांततेने पार पडला असून, ग्रामीण भागात काही ठिकाणी टायर जाळून रस्ता अडवण्यात अाला. मात्र, काहीच वेळानंतर पाेलिसांनी धाव घेतल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी माेकळा करण्यात अाला. या बंददरम्यान रेल्वे स्टेशन चौक परिसरात भाजप आमदार रणधीर सावरकर व इतर नेते आणि आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
अकोल्यात बंदमध्ये दिव्यांग कार्यकर्तादेखील सहभागी झाला होता.

अमरावतीत सौम्य लाठीमार

अमरावती : सीएए, एनआरसीविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरात अतिउत्साही कार्यकर्त्याने दुकाने बंद करण्यासाठी दगड फेकल्याने पोलिसांनी संतप्त जमावावर सौम्य लाठीमार केला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या लाठीमारात पाच जण जखमी झाले. सुमारे तेरा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, जिल्ह्यात शहरासह दर्यापूर, धामणगाव रेल्वे, तिवसा तालुक्यात बंदला किरकोळ प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात बंददरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

खान्देशात समिश्र प्रतिसाद

जळगाव : वंचित बहुजन अाघाडीतर्फे शुक्रवारी देण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला खान्देशात समिश्र प्रतिसाद मिळाला. धुळ्यात दुपारी १२ वाजेला मोर्चा काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. बहुतांश भागात चोख बंदोबस्तामुळे दुकाने बंद होती. जळगावात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. सर्वच व्यवहार सुरळीत सुरू होते. भुसावळ येथे सराफ बाजार व माॅडर्न राेडवरील हातगाडी व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभाग घेतला.

नाशिकला संमिश्र प्रतिसाद

नाशिकरोड : मोदी शहा फेक है.. हिंदू-मुस्लिम एक है, देश वाचवा, स्वत:ला वाचवा, वारे मोदी तेरा खेल.. गिरता रुपया महेंगा तेल अशा घोषणा देत देशवासियांना आझादी द्या, या अशी मागणी करत नाशिकरोड येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध करत निदर्शने केली. तसेच केंद्र सरकारने एनआरसी व सीएए कायदा रद्द करावा या मागणीसाठी वंचित बहुजन अाघाडीने पुकारलेल्या नाशिकरोड बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बिटको उड्डाणपुलाखालील भाजीबाजार, आंबेडकर पुतळा परिसर वगळता अन्य ठिकाणी दुकाने सुरू होती.
 

बातम्या आणखी आहेत...