आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा : अर्थमंत्री मुनगंटीवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा असून, शेतकऱ्यांचे दु:ख दूर सारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज योजनेत शेतकऱ्यांना २२ हजार कोटी रुपये दिले. परंतु केवळ आर्थिक मदत देऊन भागणार नाही तर पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर, तसेच शेतकऱ्यांच्या आयुष्यात 'मेरे देशकी धरती सोना उगले' वाली परिस्थिती आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, असा निर्धार वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. 


डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती वर्षातील ३३ व्या दीक्षांत सोहळ्यात बीज भाषणात ते बोलत होते. मंगळवारी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या सोहळ्याला कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती चंद्रकांत पाटील, राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, राणी लक्ष्मीबाई कृषी विद्यापीठ झाशीचे कुलगुरू प्रा. अरविंदकुमार, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू व्यासपीठावर होते. जमिनीचे शोषण खूप झाल्याने ते थांबवून उत्पादनवाढीचा प्रयत्न केला पाहिजे, असे सांगून सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ज्ञानाचा उपयोग कृषीक्रांती होण्याची गरज आहे. सत्तेपेक्षा सत्य महत्वाचे असल्याने ही जाणीव ठेवून आम्ही कृषी क्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्याचा संकल्प केला पाहिजे. या मध्ये कृषी पदवीधरांची अहम भूमिका राहणार आहे. या क्षेत्रामध्ये मुलींच्या गुणवत्तेचे प्रमाण अधिक असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. 'अन्नदाता सुखीभव' हा मंत्र झाल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात चांगले दिवस येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


5 एकरांचे 100 एकर झाले कसे?

आपल्या भागातील एका शेतकऱ्याने आपल्याजवळ पूर्वी ५ एकर शेती होती ती वाढत १०० एकरापर्यंत पोहोचल्याची सक्सेस स्टोरी सांगितली. सिमला मिरचीमुळे उत्पन्नात भर पडल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जे विकतं ते पिकवत नाही, त्यामुळे आम्ही माघारल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. सर्वांसाठी ही बाब चिंतनीय असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

 

हे राजकीय नेत्याचे आश्वासन नाही

कृषी विद्यापीठाच्या विकासासाठी १५१ कोटी रुपये देण्याचे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले. यातील ५० टक्के रक्कम संशोधनावर खर्च व्हावी, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हे राजकीय आश्वासन नाही तर दिलेला शब्द पाळणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या. व्यासपीठावर लोकप्रतिनिधी, माजी कुलगुरू, विभाग प्रमुख, अधिकारी होते. कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी स्वागतपर भाषणात विद्यापीठाने ५० वर्षाच्या संशोधनावर प्रकाश टाकला. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या जीवनात कायापालट घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास व्यक्त केला. 

 

शेतकऱ्यांचे दु:ख दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध 

 

स्नेहल विजय चव्हाण सर्वाधिक पुरस्काराची मानकरी 
बीएस्सी कृषी पदवी परीक्षेत सर्वाधिक ९ पुरस्कार स्नेहल चव्हाणने पटकावले. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सुवर्ण पदकासह अन्य पुरस्कार तिला मिळाले. एमएस्सी कृषीमध्ये लालसिंग राठोड यांना ६ पदके मिळाले. दामोदर बल्लाळ रौप्य पदक डॉ. नीरज सातपुते, डॉ. उपेंद्र कुळकर्णी, संशोधनासाठी डॉ. पी. एच. बकाने, डॉ. महेंद्र नागदेवे, एम. बी. खेडकर, पशुविज्ञानसाठी डॉ. काळबांडे, व्ही. पी. खांबलकर, डॉ. उपेंद्र कुळकर्णी, स्व. डॉ. पी. एस. खानखोजे सुवर्ण पदक डॉ. शामसुल हयात मो. शेक यांना प्रदान केले. अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे ते विद्यार्थी आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...