आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: उधारीमुळे रस्त्याचा दर्जा कायम राहील; नेतेही लक्ष घालतील; सा. बां. मंत्री पाटील यांनी लगावला टोला  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - दहा वर्षांच्या देखभाल-दुरुस्तीच्या हमीवर उधारीतत्त्वावर रस्ते रुंदीकरण-बांधकामाची याेजना राज्य सरकारकडून राबवण्यात येत आहे. या उधारी व कंत्राटदाराची मानगूट सरकारच्या हातात असून, त्यामुळे रस्त्याचा दर्जा अबाधित राहण्यास मदत होईल, असे मत सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केले. याच हायब्रिट अॅन्युईटीअंतर्गत चार रस्त्यांचे भूमिपूजन हिंगणा फाटा येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. रस्ते चांगले होण्यासाठी भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष घालतील, असा टोलाही ना. पाटील यांनी लगावला. ७५५ कोटी रुपयांच्या रस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम २० मिनिटात आटोपला. लोकप्रतिनिधींपैकी केवळ ना. पाटील एकटेच ७ मिनिट बोलले अन् कार्यक्रम संपला. 
हायब्रिट अॅन्युईटी अर्थात ४० टक्के उधारीवर रस्ते बांधण्यात येत असून, उर्वरित ६० टक्के पैसा सरकारचा असतो. शासनाकडे पैसा नसल्याने रस्ते उधारीवर रस्ते बांधण्यात येत अाहे, असा याचा अजिबात अर्थ नसून, दहा वर्षे कंत्राटदाराची मानगूट सरकारच्या हातात राहणार असल्याने रस्त्यांची दुरवस्था हाेणार नाही; या दृष्टीकाेनातून ही याेजना असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. १० वर्षे रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराची राहणार अाहे. चार वर्षांपूर्वी १७०० कोटी रुपयांचे असलेले बांधकाम विभागाचे बजेट अाता सात हजार कोटींवर पोहोचले आहे. 


केंद्र शासनाकडून एक लाख सात हजार कोटी रुपये रस्ते विकासासाठी मिळाले आहे. राज्यात ७० वर्षांत पाच हजार किलोमीटर रस्ते तयार झाले असून, चार वर्षांत २२ हजार कि.मी. रस्ते तयार झाले, अशी माहितीही पाटील यांनी दिली. 


गोरेगाव टी पॉइंट, वाशीम रोड येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खा. संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, गोपीकिशन बाजोरिया, हरिश पिंपळे, भाजप महानगराध्यक्ष किशाेर मांगटे पाटील, िवनाेद बाेर्डे, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर व जिल्हाधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम िवभागाचे अभियंते उपस्थित हाेते. 


सात मिनिटांच्या भाषणात टोलेबाजी :

देशात एकाचवेळी मोठे प्रकल्प राबवण्यात असल्याने कंत्राटदार लवकरच िमळत नाहीत. माेठ्या रस्त्यांसाठी लवकर कंत्राटदार मिळावेत, यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदारांकडून प्रयत्न झाले. अाता ते रस्ते रस्ते दर्जेदार कसे हाेतील यातही लक्ष घालतील, असा टाेला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. यापूर्वी शहरात झालेल्या सहा रस्ते ५० टक्के निकृष्ट झाल्याचे अर्थात त्यात भ्रष्टाचार झाल्याचे तपासणी अंती उजेडात अाले हाेते, हे येथे उल्लेखनीय. 


रस्ते दर्जेदार हाेणार असल्याने काेणाला सेल्फी काढण्यासाठी खड्डेच मिळणार नाही, असा टाेला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काेणाचेही थेट न घेता लगावला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील रस्त्यांच्या दुर्दशेचा पर्दाफाश करण्यासाठी खड्ड्यासोबत सेल्फी काढण्याची मोहीम राबवली होती. या मोहिमेला उद्देशून पाटील यांनी कोपरखळी तर मारली नाही ना , अशी चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली हाेती


२० मिनिटांमध्ये ७५५ कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन; पाटील एकटेच ७ मिनिट बाेलले 
गोरेगाव टी पॉईंट, वाशिम रोड येथे हायब्रिड ॲन्यूइटी अंतर्गत पाच रस्त्यांचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी प्रामुख्याने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, गोपीकिशन बाजोरिया, हरिष पिंपळे अादी उपस्थित हाेते. 


कार्यक्रमस्थळी केव्हा काय झाले ? 
कार्यक्रमस्थळी मंत्री, आमदार, खासदार दुपारी १२.४३ मिनिटांनी अाले. त्यांनी १२.४४ वाजता थेट भूमिपूजन केले. त्यानंतर अगदी थोडक्यात स्वागताचा कार्यक्रम झाला. अभियंत्यांनी तीन मिनिट प्रास्तविक केले. त्यानंतर ७ मिनिट चंद्रकांत पाटील बाेलले आणि महत्त्वाच्या कामासाठी मुंबईला जायचे असे म्हणत कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले. 

 

बातम्या आणखी आहेत...