आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धाडसी विचारसरणीचा गौरव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्रम ढालाईत  

पोलिश लेखिका ओल्गा टोकार्झुक यांना २०१८ चा साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. आजतागायत ११६ लेखकांना साहित्यातील नोबेलने सन्मानित केले गेलेय. ओल्गा टोकार्झुक ह्या १५ व्या लेखिका ठरल्या आहेत..
 
पोलिश लेखिका ओल्गा टोकार्झुक यांचे साहित्य “ व्यापक ,कल्पित संकल्पना ज्या जीवनाच्या कोणत्याही स्वरूपाच्या सीमेपलीकडे पाहत वैश्विक बंधाचे प्रतिनिधित्व करतात.” ओल्गा टोकार्झुक साहित्यासोबतच व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ आहेत.समाजातील सुप्त बाबींचे आणि मिथकशक्तीचे विश्लेषण करणारे कार्ल युंग हे त्यांचे आदर्श आहेत. स्त्रीवादी लेखिका,कवयित्री,पटकथा,निबंधकार असणारी ओल्गा पोलंडच्या उजव्या विचारसरणीच्या सरकारविरोधी नेहमीच ठाम भूमिका घेताना दिसते. १९८९ ला त्यांचा (“Cities in Mirrors”) हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.त्यानंतर “पुस्तक माणसाचा प्रवास”, १९९६ मध्ये “प्रायमेव्हल अँड अदर”,१९९८ मध्ये “हाऊस ऑफ डे, हाऊस ऑफ नाइट” प्रकाशित झाली.ओल्गा खऱ्या अर्थाने समोर आल्या त्या “Drive Your Plow Over the Bones of the Dead” या कादंबरीनंतर. गुप्तहेर  केंद्रित ही कादंबरी लोकांना खूप भावली. २०१४ मध्ये “The Books of Jacob”प्रकाशित झाली.आणि २०१८ मध्ये “फ्लाइट” याने मॅन ऑफ बुकरवर नाव कोरले. ओल्गा टोकार्झुक ह्या केवळ बुद्धिवादी लेखिकाच नाहीत तर त्या लोकशाही मूल्ये मानणाऱ्या आणि भूमिका घेणाऱ्या लेखिका आहेत. सध्या जगभरामध्ये राष्ट्रवादाची लाट चालू असताना ओल्गा टोकार्झुक ह्या ठामपणे याचा विरोध करताना दिसतात. उजव्या विचारसरणीच्या आणि धर्मांध शक्तींचे स्तोम माजलेले असताना पोलंडच्या सरकारविरोधी भूमिका त्या घेत राहिल्या आहेत. त्यांना अनेक वेळा जिवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यासोबतच २०१९ चे साहित्यातील नोबेल पीटर हंडके या गृहस्थाला मिळाले आहे. वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असणारे पीटर याना नोबेल जाहीर झाल्यानंतर अनेक बुद्धिजीवी लोकांनी त्याचा विरोध केला आहे.त्यांच्या भूमिका नेहमीच वादग्रस्त राहिल्या आहेत. नोबेल समितीने घेतलेल्या या निर्णयावर अनेक जणांनी नोबेल कशा पद्धतीने उजव्या विचारांकडे झुकत आहे, याचा तर्क काढला आहे. ओल्गा टोकार्झुकसारख्या स्त्रीवादी लेखिकेला नोबेल पुरस्कार मिळणे अनेक अर्थांनी महत्त्वाचे ठरते. जागतिक स्तरावर, स्थानिक भाषेमध्ये लिहिणाऱ्या लेखकाला यानिमित्ताने प्रेरणा मिळू शकते.

लेखकाचा संपर्क : ९५०३६७६०२७

बातम्या आणखी आहेत...