आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिय मैत्रिणी...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय वाटवे

आपल्या फास्ट फॉरवर्ड लाइफस्टाइलमध्ये एसएमएस, व्हॉट‌्सअॅप, फेसबुक इतक्या वेगात ‘इनबॉक्स’ झाले, की त्या नादात ‘पत्रं’ कधी ‘ट्रॅश बॉक्स’मध्ये गेली हे आपल्याला कळलंदेखील नाही. पर्यायानं पत्रं लिहिणं, पत्राच्या उत्तराची वाट पाहणं, पत्रं वाचण्याचा आनंद हे आपण गमावून बसलो. पत्राला उत्तर येण्याच्या काळातली अस्वस्थता हासुद्धा एक वेगळाच अधीर अनुभव असायचा. पत्रातल्या कमीत कमी शब्दांतल्या मोठ्या आशयाची सर तर कशालाच येणार नाही. संवादाच्या कालबाह्य होत चाललेल्या या प्रकाराची आठवण येण्याचं कारण म्हणजे आजचा दसरा. या दसऱ्याच्या निमित्तानं आपल्या वाचक मित्रानं त्याच्या मैत्रिणींशी संवाद साधणारं पत्रं लिहिलंय. स्वकर्तृत्वावर सर्वच क्षेत्रांत  झेंडा रोवणाऱ्या आजच्या मैत्रिणींनी काही बाबतीत निग्रहानं सीमोल्लंघन करायला हवं, असं या मित्राला वाटतंय...
 
प्रिय सखी,
स.न.वि.वि.

 आजच्या या उत्सवाच्या दिवशी तुला काहीतरी भेट द्यावी म्हणून अनेक दिवसांपासूनचं मनात साठवलेंलं पत्र रूपात तुला पाठवतो आहे.
विकास आणि प्रगतीच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यात मायेचा ओलावा आणि आपुलकीचं छप्पर देणारी अनेक शाखांची भक्कम कुटुंबं आज दुर्मिळ झाली आहेत. काळाच्या एका अशा टप्प्यावर आपण उभे आहोत जिथून पुढे जाण्याचे मार्ग दिवसेंदिवस अतिशय अरुंद आणि अधिकाधिक प्रदूषित होत जाणार आहेत. हा टप्पा असाही आहे जिथे एकीकडे आपल्या हातात भविष्याचे लागम आहेत आणि दुसरीकडे पायात भूतकाळाचे पाश आहेत. ओढ दोन्ही बाजूंची असल्याने आपल्यावर आपलाच एक प्रचंड ताण आहे. अशा अवस्थेत तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे काल्पनिक वास्तवाचे एक वेगळेच चित्र रंगवण्यात आपण आनंदाने रमून गेलो आहोत. थोडक्यात, सतत स्वतःच स्वतःची फसवणूक करण्याच्या काळात आपण जगत आहोत. आजच्या या दिवसाचे अर्थात दसऱ्याचे पौराणिक, ऐतिहासिकदृष्ट्या खास महत्त्व आहे. म्हणूनच आजच्या सीमोल्लंघनाच्या दिवशी स्वतः स्वतःची फसवणूक करण्याच्या या दुष्टचक्राच्या परिघाचे उल्लंघन करण्याच्या मोहिमेवर आपण निघायलाच हवं.

आपलं दिसणं, राहणीमान, शिक्षण, अपेक्षा, पैसा आवडीनिवडी छंद, नातीगोती, मित्रमंडळी अशा अनेक आघाड्यांवर आपणच आपली फसवणूक करत राहतो. यातले खरे काय? दिखाऊ काय? रोजच्या रोज आपण किती प्रकारच्या आणि कुणाकुणाशी तडजोड करत राहतो याचा विचार केलाय का कधी? ही लढाई म्हटली तर खूप सोपी आणि म्हटली तर खूप छोटी आहे. प्रत्यक्षात जेव्हा ही लढाई लढायला आपण सुरुवात करू, तेव्हाच कदाचित युद्धाची खरी तीव्रता जाणवेल. ही लढाई जिंकून विजयोत्सव साजरा करणे किती आव्हानात्मक आहे तेही उमजेल. कारण, आपली ही लढाई स्वतःच्याच विरोधात आहे.

त्यातल्या त्यात मैत्रिणी, तुला सर्वाधिक धोका आहे. भारताच्या इतिहासात, पुराणात याचे दाखले आहेत की, घडून गेलेल्या युद्धाच्या काही कारणांपैकी तूही एक महत्त्वाचे कारण ठरली आहेस. म्हणूनच आता आपणच हातात आरसा घेऊन आपलाच खरा चेहरा पाहण्याची गरज आहे. पुन्हा निरखून.‘जग म्हणजे मोहमाया’ हे तर तू आजीच्या तोंडी ऐकलंच असशील. आजच्या तुझ्या माझ्या काळातल्या स्थितीत फरक एवढाच आहेे की, या मोहाच्या मायावी दुनियेचा दरवाजा आता थेट तुझ्या, माझ्या हातात आहे. त्यामुळेच तुला आता प्रत्येक पाऊल तर सावधगिरीने उचलावे लागेल. अगदी स्क्रीनवर बोट टेकवतानादेखील अवधान बाळगावे लागेल. सोशल मीडिया नामक अदृश्य जाळ्याचे आजूबाजूला पाश आहेत. करकचून आवळलेले. त्यात अडकायचे किती आणि निसटायचे कसे हा निर्णय तुझा तुलाच घ्यायचा आहे. हे काही फक्त सोशल किंवा डिजिटलपुरते मर्यादित नाही. मोहाचे हे जाळे अतिशय आकर्षक रूपात रोजच्या जगण्यातही तुला भुरळ घालणारच. त्यापासून सावध राहा मैत्रिणी.

मी सुरुवातीला म्हणालो, की स्वतःच स्वतःला फसवण्याचे दुष्टचक्र आहे. त्याची उदाहरणे अगदी पदोपदी आहेत. म्हणजे बघ, फसवे मुखवटे घालून वावरणारी माणसे आजही तुझ्या आजूबाजूला आहेत. अगदी घराघरात आहेत. त्यांच्या नजरा सतत रोखलेल्या असतातच तुझ्यावर. तू काय खातेस, काय बघतेस, कोणते आणि कसे कपडे वापरतेस, कोणती गाडी, मोबाइल वापरतेस, सुट्ट्यांना फिरायला कुठे जातेस? तुझी मुलं कोणत्या शाळेत जातात, तू पार्लरला जातेस का, कोणत्या ब्रँडचे प्रॉडक्ट वापरतेस? तू स्मार्ट आहेस की नाही  की नाही? हे सतत तपासून पाहणारे हे मुखवटे तुझ्या आसपास आहेत. तुझ्याही नकळत त्यांचे दडपण येत राहते तुझ्यावरच. 
समूहप्रिय माणसाला नाती जोडायला आवडतात. मग ती आजच्या काळाप्रमाणे सोशल किंवा व्हर्च्युअल असोत किंवा रक्ताची नाती... इथेही परिस्थिती दिखाऊगिरीची अधिकच दिसते. 

मैत्रिणी मला कल्पना आहे की, शहरात किंवा खेड्यात राहणारी, नोकरी करणारी किंवा घर सांभाळणारी, मुलांमध्ये रमणारी किंवा ऑफिसच्या कामात गुंतवून घेणारी तू, किंवा दोन्ही सांभाळतानाची कसरत करणारी तू, अनेकदा मनातून उदास होतेस, खिन्न होतेस, अनेक व्यथा तुला सतावत असतील. त्या व्यक्त कशा करायच्या, करायच्या की तोंड दाबून सहन करायच्या नि आला दिवस आपला गाडा ओढत राहायचा याही संभ्रमात असशीलच तू; तर तुला सांगावेसे वाटते की, निव्वळ बाहेरून सगळे काही आलबेल आहे असे दाखवण्याचा तुझा जन्मजात स्वभाव जरासा दे सोडून नि हक्काच्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे जसं जमेल तसं मनसोक्त मोकळं घे बोलून. पण हे सगळे दुःख, तुझ्या उरातल्या वेदना लाइक्स आणि फसव्या कमेंट्ससाठी सतत अपलोड नको करत राहू. जीव रमवण्यासाठी क्षणभराच्या या करमणुकीत पुन्हा स्वतःलाच फसवण्याच्या चक्रात तू अडकशील.  काळजी घे. त्या चक्राच्या परिघातून सीमोल्लंघन करायचे आहे तुला...

तू म्हणशील, असा कसा हा मित्र! जो एवढ्या आनंदाच्या दिवशी हे असले चिंताजनक सूर लावतो. सर्वांकडे नकारात्मकतेनंच पाहतो आहे? असा प्रश्न पडला असेल नं तुला? तुझा प्रश्न अगदीच योग्य आहे. याचा दुसरा अर्थ असा की जिथे रमायला नको, अशा मोहाच्या काठावर तू रमली आहेस. पण मैत्रिणी, आजच्या या दिवशी एक गोष्ट तुला नक्कीच सांगेन, ही सगळी फक्त संपर्काची माध्यमं आहेत. तुझ्या हातात कितीही महागडा फोन असला, तुला आऊटगोइंग अगदी फुकट असलं तरी मन मोकळं करून बोलावंसं वाटतं तेव्हा पलीकडं किती माणसं तुझ्यासाठी वेळ देतात हे एकदा तपासून बघ... प्रोफाइल अपडेट ठेवण्याच्या नादात ओलाव्याची माणसं गमावू नकोस…
 
इतरांना तुला ज्या रूपात पाहण्याची इच्छा आहे तशाच सुपर वुमन, कूल, ब्यूटिफुल,अशाच रूपात वावरण्याची तुझी धडपड. इतरांना हवं तसं दिसत राहण्याचा तुझा अट्टहास. पण असं राहण्याचा ताणही येतोच तुझ्यावर. या ताणातूनच मग वाढते अस्वस्थता. तेव्हा वेळीच सांभाळ. तुझं इतरांना दिसणं महत्त्वाचं नाही तर तू स्वतः जशी आहेस तशी अधिकाधिक आनंदात असणं महत्त्वाचं आहे. शाळेतल्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात शिकलेल्या माणुसकीच्या कसोट्यांची पुन्हा-पुन्हा सतत उजळणी करत राहा. स्वतःच स्वतःची फसवणूक करत जगण्याच्या काळात या दुष्टचक्राच्या परिघाचे उल्लंघन करण्याच्या मोहिमेवर तू निघायलाच हवं, असं मला तुझा सच्चा मित्र म्हणून सतत वाटतं...

तुझाच
अक्षय....

लेखकाचा संपर्क : ९७६६९९१४२१