आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धा, चंद्रपुरात ३७० नव्हे; फक्त ‘दारूबंदी’चीच चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन काटे 

चंद्रपूर - महाराष्ट्रात वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर हे तीन संपूर्ण दारूबंदी असलेले जिल्हे आहेत. या भागात होणाऱ्या निवडणुकांत दारूबंदीचे समर्थन करणाऱ्या पक्षांना फायदा होतो, असे मानले जायचे. पण लोकसभा निवडणुकीपासून दारूबंदीबाबत दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू आहे. पंचवीस वर्षांपासून दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूविरोधात मोठी जनजागृती सुरू आहे. राज्यभरातील निवडणुकीत कलम ३७० रद्द करणे हा प्रचाराचा मोठा विषय होता, पण या भागात मात्र दारूबंदी फायद्याची की तोट्याची या एकमेव विषयावर संपूर्ण निवडणुका केंद्रित होताना पाहायला मिळत आहे. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या वास्तव्यामुळे वर्धेत सुरुवातीपासून दारूबंदी आहे. गडचिरोलीत नक्षली प्रभावामुळे दारूबंदी करण्यात आली. या दोन जिल्ह्यांमध्ये असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीच्या मागणीवरून मोठी आंदोलने झाली. त्यामुळे १ एप्रिल २०१५ रोजी दारूबंदी लागू करण्यात आली. चंद्रपुरातील दारूबंदीसंदर्भात काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात एक समिती नेमण्यात आली होती. समितीने दारूबंदीचे समर्थन केले होते. त्या वेळी झालेल्या निवडणुकांत दारूबंदीचे समर्थन करणाऱ्या पक्षांना फायदा झाल्याचे इतके दिवस बोलले जात होते. आता मात्र दारूबंदीच्या दुष्परिणामांवर मोठ्या प्रमाणावर मतदारांमध्ये सध्या तरी चर्चा होताना दिसत आहे.

अनेकांचे आरोग्य धोक्यात
परिसरात बनावट दारूचा धोका आहे. विषारी दारूने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याचे प्रकार आजवर घडले आहेत. या भागातही एखादी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
 

राज्य सरकारचा साडेसहाशे कोटींचा महसूल बुडीत
दारूबंदीला विरोध करणे सामाजिकदृष्ट्या चुकीचे आहे हे सगळेच जाणतात, पण प्रस्थापित व्यवस्था बंद केल्यामुळे नवीन समस्या समोर येत आहेत. शिवाय चंद्रपूरचे अर्थकारण बिघडल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे. राज्य शासनाचा साडेसहाशे कोटींचा महसूल बुडत आहे. शेजारच्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर तस्करीची दारू येत आहे. बनावट दारू पण मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे. चंद्रपुरातील रिअल इस्टेट, हॉटेल इंडस्ट्री आणि ताडोबा पर्यटनावर परिणाम झाल्याची तक्रार लिकर असोसिएशनसह अनेकांनी केली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...