आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा वगळता सर्वच भाजप नेत्यांची सरकारवर टीका; कुणी दिली बेडकाची तर कुणी 'महागोतावळा'ची उपमा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाणीप्रश्नासाठी उपोषण औरंगाबाद शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिल्यास आंदोलन करण्याचा आ. सावेंचा इशारा

आैरंगाबाद- पाणीप्रश्नावर भाजपच्या नेेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात सोमवारी आैरंगाबादेत विभागीय आयुक्तालय परिसरात लाक्षणिक उपोषण झाले. या वेळी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह सर्वच उपस्थित नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीवर भरभरून टीका केली. कुणी या सरकारला बेडूक संबोधले तर कुणी 'मल्टिस्टार महागोतावळा आघाडी' अशी उपमा दिली. ठाकरे कुटुंबीयांशी सलोख्याचे संबंध असलेल्या उपोषणकर्त्या पंकजा मुंडे यांनी मात्र हे आंदोलन सकारात्मक असल्याचे सांगत ठाकरे सरकारवर टीका करणे टाळले.

खासदार डाॅ. प्रीतम मुंड म्हणाल्या, 'आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही, मात्र कुणी आमच्या वाटेला गेले तर त्याला सोडत नाही. चांगल्या गोष्टीचे समर्थन करता येत नसेल तर किमान विरोधही करू नये, अशी अपेक्षाही टीकाकारांकडून केली. आम्हाला लहानपणी आजीने गोष्ट सांगितली. पाण्याला कुणाला नाही म्हणू नये नसता माणूस बेडकाच्या जन्माला जातो. भाजप सरकारच्या विरोधात लक्षात राहील असे एकही आंदोलन त्यावेळच्या विरोधकांनी केले नाही. काही विरोधकांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आंदोलनाची काॅपी करत संघर्ष यात्रा काढली, मात्र ती वातानुकूलित गाडीत बसून,' असा टोला त्यांनी कांॅग्रेस- राष्ट्रवादीला लगावला.

आमदार सुरेश धस यांनी राज्यातील सरकार मल्टिस्टार महाघोटाळा आघाडी सरकार असल्याचे सांगितले. 'मल्टिस्टार सिनेमे चालत नाहीत त्याप्रमाणे हे सरकारही अपयशी ठरेल,' असे भाकीतही वर्तवले. भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी श्रीसाईंची जन्मभूमी पाथरी असून त्याचा विकास व्हावा, अशी मागणी केली.

नापासांचे सरकार : बागडे

माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, 'लोकोपयोगी योजना मागे पडू नयेत याची आठवण करून देण्यासाठी हे उपोषण आहे. राज्यात नापासांचे सरकार आहे. शंभरपैकी सत्तर विद्यार्थी नापास झाले असून तेच उत्तीर्ण झाल्याचे पेढे वाटत आहेत. आज पाणी परिषदेची भाषा करणारे एवढे दिवस कुठे गेले होते. त्यांना पाणी परिषद घेण्यावाचून कुणी रोखले होते काय, असा प्रश्न त्यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उद्देशून केला. शंभर कोटी रुपये आैरंगाबाद महापालिकेचे कारभारी खर्च करू शकले नाही. १६८० कोटींची पाणीपुरवठा योजना स्थगित केली. पंकजा मुंडे यांनी परळीकरांचा कशाची उणीव भासू दिली नसताना त्यांचा पराभव झाला? याबद्दल बागडेंनी खंत व्यक्त केली.

आमदार अतुल सावे यांनी औरंगाबाद शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनेला तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगून हे स्थगिती सरकार असल्याची टीका केली. मंत्री झाल्यानंतर आपण केवळ ५५ दिवसांत ही योजना मंजूर केली होती. मात्र आज आजी व माजी खासदारांनी शहरासाठी काय केले हे स्पष्ट करावे, असे आव्हान सावे यांनी खासदार इम्तियाज जलील व चंद्रकांत खैरे यांना दिले. शहरातील पिण्याच्या पाण्याच्या योजनेला स्थगिती दिली तर एक लाख लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

हे ट्रेलर आहे, स्थगिती दिल्यास सिनेमाच दाखवू, दरेकरांचा सरकारला इशारा


सध्याचे सरकार केवळ स्थगिती देण्याचे काम करत आहे. मराठवाड्याच्या जनतेच्या मनात त्यांची 'स्थगिती सरकार' अशी प्रतिमा बनत आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावर आज होत असलेले आंदोलन केवळ ट्रेलर आहे. मराठवाड्याच्या प्रकल्पांना यापुढेही सरकारने स्थगिती दिल्यास त्यांना आम्ही राज्यभर 'सिनेमा' दाखव, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारला दिला.


दरेकर म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांना या उपोषणाची दखल निश्चित घ्यावी लागेल. या आंदोलनाच्या निमित्ताने पंकजाताईंना एकटे पाडले जात आहे का, असा गैरसमज होत काही लोकांना गुदगुल्या होत आहेत. मात्र भाजप पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे,' असे दरेकर यांनी ठामपणे सांगितले.

केवळ भाजपचाच नव्हे तर पाणीप्रश्नावर काम करणाऱ्या अनेक संस्थांचा पंकजांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी पाण्याचा वणवा पेटवला आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर सरकार आगडोंबात भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला.

याप्रसंगी आमदार नारायण कुचे, विजय गव्हाणे, माजी आ. भीमराव धोंडे, आ. अभिमन्यू पवार, आ. संतोष दानवे, गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार, कळमनुरीचे आ. तानाजी मुटकुळे, आ. प्रशांत बंब, माजी आ. बब्रुवान खंदाडे, माजी आ. विलास खरात, बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, भाई ज्ञानोबा मुंडे, रमेश आडसकर, मराठवाडा जनता विकास परिषदेचे प्राचार्य शरद अदवंत आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर भाजप प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डाॅ. भागवत कराड, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, माजी महापाैर भगवान घडमोडे, समीर राजूरकर, माजी उपमहापाैर संजय जोशी, विजय औताडे, मदन नवपुते, महिला आघाडीच्या अध्यक्षा माधुरी अदवंत, औरंगाबाद जि. प. च्या महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, औरंगाबाद तालुका अध्यक्ष श्रीराम शेळके, बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, नगरसेवक राजू शिंदे, जि. प. सदस्य शिवाजी पाथ्रीकर, कचरू घोडके आदींची उपस्थिती होती.

फोटो काढण्यास केंद्रेकरांचा नकार

निवेदन देताना केवळ विरोधी पक्षनेते व त्यांच्या सोबतच्या शिष्टमंडळातील सदस्यांना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या दालनात प्रवेश देण्यात आला होता. माध्यम प्रतिनिधी व छायाचित्रकार यांना बाहेरच रोखण्यात आले. मात्र प्रवीण दरेकर यांनी निवेदन देतानाचे छायाचित्र काढण्यासाठी आग्रह धरला. त्यावर एकच छायाचित्रकार बोलवा म्हणून केंद्रेकरांनी आदेश दिला. मोबाइलवर छायाचित्र घेऊन नका अशा सूचनाही केल्या. तेव्हा बाहेरून एका छायाचित्रकारास आत प्रवेश देण्यात आला.

पंकजांना केवळ संघर्षच करायला लावू नका : जानकर


गोपीनाथ मुंडेंचा संघर्षाचा वारसा पंकजा पुढे नेत असल्याचे आमदार सुजितसिंह ठाकूर म्हणाले. त्यावर रासपचे महादेव जानकर यांनी 'पंकजांना केवळ संघर्षच करायला लावू नका' असे त्यांना सुनावले.

खासदार इम्तियाज, चंद्रकांत खैरेंवर टीका

खा. इम्तियाज जलील आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या आंदोलनावर टीका केली होती. त्याचा समाचार घेताना दरेकर म्हणाले की, 'इम्तियाज यांना भाजपचे कार्यकर्ते रस्त्याने फिरू देणार नाहीत. तर केवळ 'मातोश्री'चा आशीर्वाद मिळवण्यासाठी खैरे प्रयत्न करतात. मात्र इतकी वर्षे खासदार असून आैरंगाबादेत तुम्ही कुठली विकासाची कामे केली?' असा प्रश्नही दरेकर यांनी केला. तर 'गोपीनाथ मुंडे प्रचाराला यायचे व थैली सोडून जायचे, त्यामुळेच खैरे खासदार होऊ शकले,' असा आरोप महादेव जानकर यांनी केला. इम्तियाज जलील 'अॅक्सिडेंटली एमपी' असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...