आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • All Four Accused Of Hyderabad Rape Case Were Killed In Police Firing At The Place Where She Was Burnt After The Rape

नराधमांनो... भोगा परिणाम ! बलात्कारानंतर जेथे तिला जाळले, तिथेच पोलिस गोळीबारात चारही आरोपींचा खात्मा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कदाचित प्रथमच... पोलिस एन्काउंटरच्या समर्थनार्थ देशभर लोकांचा रस्त्यांवर आनंद साजरा
  • जल्लोष : एन्काउंटर पथकावर पुष्पवृष्टी, आता मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल...
  • प्रश्न : असा न्याय करायचा असेल तर कोर्ट कशासाठी ? काहींचे मत

​​​​​​हैदराबाद : २७ नोव्हेंबर २०१९ च्या रात्री या चौघांनी टोलनाक्याज‌‌वळ महिला व्हेटरनरी डॉक्टरला स्कूटर पार्क करताना पाहिले. त्या वेळी हे चौघे दारू पीत होते. तिने मदत मागावी या हेतूने त्यांनी तिची स्कूटर पंक्चर केली. या चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिचे प्राण गेल्यानंतरही त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिचा मृतदेह जाळून टाकला.

महिला व्हेटरनरी डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि तिला मारून जाळून टाकणाऱ्या चारही आरोपींना हैदराबाद पोलिसांनी शुक्रवारी पहाटे एन्काउंटरमध्ये गोळ्या घालून ठार केले. शादनगरज‌वळ जेथे आरोपींनी डॉक्टरला जाळले होते, त्या जागेपासून सुमारे ४०० मीटर अंतरावर पहाटे ५.४५ ते ६.१५ दरम्यान हे एन्काउंटर झाले. गुन्ह्याची दृश्यनिर्मिती करणे आणि डॉक्टरचे साहित्य मिळवण्यासाठी पोलिस त्यांना तेथे घेऊन गेले होते. आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला आणि शस्त्र हिसकावून घेत गोळीबार करत पळू लागले.

सायबराबादचे पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी सांगितले की, कारवाईत चौघे ठार झाले. सकाळीच या आरोपींच्या खात्म्याचे वृत्त ऐकताच देशभरात लोकांनी जल्लोष केला. हैदराबादेत एन्काउंटरस्थळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि 'तेलंगण पोलिस जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. पोलिसांना खांद्यावर घेत पुष्पवृष्टी केली आणि फटाक्यांची आतषबाजी केली.

११ वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला
 
पोलिस आयुक्त सज्जनार २००८ मध्ये वरंगलचे एसपी होते. तेव्हा तेथे तिघांनी एकतर्फी प्रेमातून दोन मुलींवर तेजाब फेकले होते. तिघांनी अटक झाली. मात्र काही तासांतच एन्काउंटर झाले. त्या वेळीही सज्जनार यांच्या नेतृत्वात पोलिस गुन्ह्याची दृश्यनिर्मिती करत होते.

महिला अत्याचारातील दोषींना दयेच्या अर्जाचा हक्क नसावा, संसदेने फेरविचार करावा : राष्ट्रपती
 
माउंट अबू (राजस्थान)। महिला अत्याचारातील दोषींना दयेचा अर्ज अधिकाराच्या फेरविचाराची आवश्यकता असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी म्हटले. ते म्हणाले, पाेक्सो कायद्यांंतर्गत बलात्कारातील दोषींना दयेचा अर्ज दाखल करण्याचा अधिकार नसावा. संसदेने याबाबत फेरविचार करावा.

जनतेची सलामी
सायबराबादाच्या रस्त्यांवर शुक्रवारी महिलांनी एन्काउंटरसाठी पोलिसांचे अभिनंदन केले, मिठाई खाऊ घातली.

क्रिया : गुन्ह्याच्या दृश्यनिर्मितीवेळी आरोपींनी शस्त्रे हिसकावत हल्ला केला, प्रत्युत्तरात ठार


- पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी सांगितले- पीडितेचा फोन आणि घड्याळ मिळवण्यासाठी १० पोलिसांचे पथक अारोपींना घेऊन घटनास्थळी गेले होते.


- चारही आरोपींनी पोलिसांवर दगड, काठ्यांनी हल्ला चढवला. उत्तरादाखल पोलिंसाच्या गोळीबारात चौघे ठार.

प्रतिक्रिया : अभिनंदनासह पोलिसांसाठी पुरस्कारांची घोषणा, मानवाधिकार आयोगाची चौकशी सुरू


- बंगळुरूचे पोलिस आयुक्त भास्कर राव म्हणाले, योग्य कारवाई होती. हिस्सारच्या राह फाउंडेशन आणि भावनगरचे उद्योजक राजभा गोहिल यांनी पोलिसांना एक-एक लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.


- मानवाधिकार आयोग म्हणाले - हा चिंतेचा विषय, चौकशी होणार. पोलिस म्हणाले - सर्व प्रकारच्या चौकशीसाठी आम्ही तयार आहोत.


एन्काउंटरचा हा जल्लोष न्यायातील विलंबाच्या निराशेतून आला आहे का ?
कारण
... २०१८ मध्ये देशातील १६२ जणांना ट्रायल कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या दोन दशकांतील हा स‌‌र्वात मोठा आकडा आहे. मध्य प्रदेशात मे २०१८ ते आतापर्यंत २९ बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, मात्र सर्व अपील प्रलंबित आहेत. २३ प्रकरणे अल्पवयीन मुलीवर बलात्काराची आहेत.

यासाठी ... राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी म्हटले की, मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना दयेच्या अर्जाचा अधिकार नसावा. विशिष्ट मुदतीत शिक्षेची अंमलबजावणी व्हावी यासाठी कठोर कायदा बनवण्याची मागणी विधिज्ञ करत आहेत.

फाशीच्या शिक्षेनंतरही असे जिवंत राहतात गुन्हेगार... 
 
सेशन कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब आवश्यक असते. त्यासाठी कायद्याने मुदत निश्चित केली आहे.


- निकालावर हायकोर्टाच्या शिक्कामोर्तबसाठी ६० दिवस


- पुन्हा हायकोर्टात अपिलासाठी ९० दिवस आणि


- पुन्हा सुप्रीम कोर्टात एसएलव्ही ९० दिवसांत (हायकोर्ट-सुप्रीम कोर्टात सुनावणीस कालमर्यादा निश्चित नाही)


- पुन्हा सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका - मुदत निश्चित नाही


- पुन्हा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज - मुदत निश्चित नाही


दिव्य मराठी भूमिका... 
निर्णायक कायदा आता नाही तर मग केव
्हा?
हैदराबादेत जे घडले ते एखाद्या हिंदी किंवा तेलुगू चित्रपटातील दृश्याप्रमाणे आहे. चारही आरोपी बलात्कार जेथे झाला होता तेथेच पोलिसांच्या गोळीबारात मेले. दोन पोलिसही जखमी झाले. देशात एकच चर्चा आहे की हे योग्य की अयोग्य? एकीकडे मुलींचे आई-वडील, बहुतांश तरुणाई पोलिसांचा जयजयकार करताहेत आणि दुसरीकडे अनेक जण हे अयोग्य मानताहेत. शिक्षा व्हायला हवी, अधिक कठोर, तत्काळ व्हायला हवी, हे सर्वांना मान्य आहे. आता मुद्दा शिक्षेच्या पद्धतीचा आहे. या घटनेनंतर एक अतिकठोर व निर्णायक कायदा करावा लागणार आहे. त्याचे परिणामही बलात्काराच्या सर्व प्रलंबित खटल्यांत दाखवावे लागतील, जेणेकरून कायद्यावरील लोकांचा विश्वास डळमळणार नाही. या घटनेची दुसरी धोकादायक बाजू अशी की, पोलिसांचा जयजयकार क्वचित होतो आणि तेलंगणचे पोलिस आता हीरो ठरले आहेत. लवकरच निर्णायक कायदा बनला नाही आणि तो लागू झाला नाही तर इतर राज्यांतील पोलिसही या जयजयकाराने उत्साहित होऊन वेगळा मार्ग निवडू शकतात. यामुळे व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहील. हैदराबादेतील एन्काउंटरची घटना एक मैलाचा दगड सिद्ध होईल, अशी अपेक्षा आहे. परिणामी एक अतिकठोर आणि निर्णायक कायदा तत्काळ अमलात येईल.

निर्भया हत्याकांड : आता राष्ट्रपतींच्या निर्णयाची प्रतीक्षा
 
गृह मंत्रालयाने निर्भया प्रकरणातील दोषी विनय शर्मा याची दया याचिका फेटाळण्यात यावी, अशी शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. दिल्ली सरकारनेही अशीच शिफारस केली असून आता राष्ट्रपतींच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. निर्भयाच्या आईने राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दया याचिका तर फाशी टाळण्यासाठीचा मार्ग आहे. ती फेटाळा....
- हैदराबाद एन्काउंटरनंतर तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या निर्भयाच्या दोषींची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. जेल नंबर-२ मध्ये बंद असलेले अक्षय व मुकेश याच्या बराकीसमोर विशेष पोलिस तैनात आहेत- तिहारच्या जेल नंबर-४ मध्ये बंद विनय शर्माने शुक्रवारी तुरुंग अधीक्षकांची भेट घेतली. त्याची दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे.

बातम्या आणखी आहेत...