Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | all political parties preparing for municipal election

फोडाफोडीच्या राजकारणाची धास्ती; सर्वपक्षीय 'सर्कस' सुरू; काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी शक्य

दीपक कांबळे | Update - Aug 28, 2018, 10:05 AM IST

प्रारूप प्रभागरचनेचे नकाशे जाहीर होताच सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी दुसऱ्या टप्प्यातील चाचपणीला सुरुवात केली आहे. जास्तीत ज

 • all political parties preparing for municipal election

  नगर- प्रारूप प्रभागरचनेचे नकाशे जाहीर होताच सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी दुसऱ्या टप्प्यातील चाचपणीला सुरुवात केली आहे. जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रसंगी प्रतिस्पर्धी पक्षाला खिंडार पाडण्याची रणनिती आखली जात आहे. फोडाफोडीच्या राजकारणाची सर्वच पक्षांनी धास्ती घेतली अाहे. दरम्यान, आमच्याच पक्षात मोठ्या प्रमाणात 'इनकमिंग' होणार असल्याचा दावा सर्वच पक्षातील पदाधिकारी करत आहेत. भाजप व शिवसेना स्वबळावर लढणार आहे, तर आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांचे तळ्यात-मळ्यात आहे.


  विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनाही आगामी महापालिका निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत, त्यादृष्टीने मागील दोन ते तीन महिन्यांपासून प्रभागात भेटी-गाठीला गती आली आहे. निधी नसेल, तर प्रसंगी खिशातील पैशांतून किरकोळ कामे करण्यावरही नगरसेवकांनी भर दिला आहे. सध्या ३४ प्रभागांत ६८ नगरसेवक आहेत. प्रभागात मतांचे राजकारण जोमात असतानाच प्रारूप प्रभागरचनेचे नकाशे प्रसिद्ध झाल्यानंतर गुडघ्याला बाशिंग बांधणारेही कोमात गेले आहेत. प्रभागरचनेत झालेली तोडफोड व मतांची जुळवाजुळव करताना मोठी कसरत करावी, लागेल हे सर्वांनाच कळून चुकले आहे. परिस्थिती कशीही असली, तरी निवडणूक जिंकून सत्तेत बसण्याचा चंग भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बांधला आहे. त्यात किंगमेकर होण्याची रणनिती मनसेकडून ठरवली जात आहे.


  भाजपने प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वी दोन महिन्यांपासून रणनिती आखून कामाला सुरुवात केली. मुंबईला झालेल्या बैठकीत स्वबळाचा नारा देत गटतट बासनात गुंडाळून एका झेंड्याखाली काम करण्याचा निर्णय घेतला. पण अंतर्गत वैचारिक मतभेदातून झालेली गटतटाची विभागणी भाजपची डोकेदुखी वाढवणारी ठरत आहे. या निवडणुकीत ४२ 'प्लस'चा नारा देऊन इतर पक्षांना खिंडार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. त्यात काही अंशी यश मिळत असल्याचे दिसून येत आहे.


  आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला मरगळ आल्याचे चित्र आहे. ही मरगळ झटकून बालेकिल्ले पुन्हा जोमाने लढवण्यासाठी सत्यजित तांबे, दीप चव्हाण यांच्यासह काँग्रेसजन मंगळवारी मुंबईला अशोक चव्हाण यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. तेथेच शहराची रणनिती ठरवून कामाला गती दिली जाणार आहे.


  जळगाव, सांगलीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करून लढवल्या होत्या. नगर मनपाची निवडणुकीतही आघाडी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सनेने २०१३ च्या निवडणुकीत सत्तेच्या चाव्या खिशात घालून पदे पदरात पाडून घेतली होती. परंतु, आता मनसेत पांगापांगी झाली असल्याने आगामी निवडणुकीत जुळवाजुळव करण्याचे आव्हान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर आहे. विस्कटलेली घडी बसवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तथापि, निवडणुकीत पुन्हा एकदा ४० ते ५० उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी मनसेने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिशा आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप व माजी आमदार दादा कळमकर यांनी ठरवली आहे.


  शांत दिसत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून इतर पक्षातील असंतुष्टांचा कानोसा घेतला जात आहे. अनेकजण राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा दावा पदाधिकारी करत आहेत. आघाडीबाबत काँग्रेसच्या मंगळवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे लक्ष असून श्रेष्ठींच्या आदेशानुसार समर्थ उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी पक्षाने केली. भाजपबरोबर युती केल्याने सेनेचे नुकसान होते, अशी भावना सेनेतील नेत्यांत आहे. युती केल्यामुळे सेनेच्या जागा कमी झाल्या होत्या, असा दावा सेनेकडून केला जात आहे. आतापर्यंत शंभराहून अधिक उमेदवारांच्या मुलाखती सेनेने घेतल्या. चाचपणी अंतिम टप्प्यात आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेला बहुमत मिळेल असाही दावा केला जात आहे. मनसेतील काही नगरसेवकांसह इतर पक्षातूनही काही जण शिवसेनेत येण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.


  'आयात' नव्हे, विकासासाठी प्रवेश
  भाजपने सुरुवातीपासूनच स्वबळाचा नारा दिला आहे. अंतर्गत गटा-तटाचा विषय संपला आहे. आम्ही भाजपच्या झेंड्याखाली सर्वजण एक आहोत. विचाराच्या देवाण घेवाणीचा वाद असतो. असा कोणताच पक्ष नाही ज्यात गट नाहीत. प्रत्येकाला ४२ प्लसचा नारा दिला. आम्ही कार्यकर्ते आयात करत नाही, पण शहर विकासासाठी स्वत: होऊनच कार्यकर्त्यांचा भाजपकडे ओढा आहे.
  - सुवेंद्र गांधी, नगरसेवक, भाजप.


  शिवसेनेला िमळणार स्वबळावरच बहुमत
  भाजपला आता प्रचाराची सुरुवात करावीच लागेल. कारण साडेचार वर्षे ते काय करत होते? शिवसेना ३६५ दिवस कामच करत असते. भाजपने आमदार शिवाजी कर्डिले, कोतकर व जगतापांना मदत करण्यासाठीच स्वतंत्र लढण्याचा नारा दिला. आतापर्यंत भाजपशी युती करून शिवसेनेचे नुकसानच झाले आहे. स्वबळावरच शिवसेनेला मनपात बहुमत मिळेल.
  - दिलीप सातपुते, शहरप्रमुख, शिवसेना.


  अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात
  आघाडीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. इतर पक्षांत नव्याने लोक आले म्हणजे ते निवडून येतात, असे होत नाही. निवडून येण्याची पात्रता हवी. आमच्याकडे सक्षम कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. अनेकजण राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक अाहेत. याबाबत आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर निर्णय घेतील.
  - माणिक विधाते, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.


  आघाडीबाबत मुंबईत बैठक
  मनपा निवडणुकीत आघाडी करायची किंवा नाही, याबाबत मुंबईत अशोक चव्हाण यांच्यासमवेत चर्चा होणार आहे. त्यासाठी सत्यजित तांबे यांच्यासह भेट घेऊन चर्चा करणार आहोत. आघाडीबाबत पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत. प्रसंगी काँग्रेस स्वबळावरही ही निवडणूक शकतो. आमच्याकडे येण्यासही अनेकजण इच्छुक आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही व्यूहरचना ठरवणार आहोत.
  - दीप चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष.


  मनसे पूर्ण ताकदीनिशी उतरणार
  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आतापर्यंत स्वबळावरच निवडणुका लढवल्या आहेत. २०१३ मध्ये मनसेने ४८ जागा लढवल्या होत्या, यंदाही लढवणार आहोत. आमच्या पक्षाला खिंडार पडेल असे वाटत नाही, आमचे विद्यमान नगरसेवकही आमच्याच तिकिटावर लढणार आहेत. लवकरच पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्याचे नियोजन आहे.
  - सचिन डफळ, जिल्हाध्यक्ष, मनसे.

Trending