सर्व शाळांत विद्यार्थ्यांना / सर्व शाळांत विद्यार्थ्यांना दिली जाणार नायलाॅन मांजा न वापरण्याची शपथ

प्रतिनिधी

Jan 07,2019 11:24:00 AM IST

नाशिक- मकर संक्रातीचा सण साजरा करतांना शहरात माेठ्या प्रमाणावर पतंगाेत्सव साजरा केला जाताे. या दरम्यान पतंग उडविण्याच्या व कापण्याच्या जणू स्पर्धाच झडत असतात. मात्र याकरीता बंदी असतांनाही नायलाॅन मांजाचा वापर केला जाताे. यामुळे दरवर्षी शेकडाे पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागतात, कित्येक वाहनचालकांचा गळ्यात नायलाॅन मांजा अडकल्याने गळा कापल्याने, अपघात घडून मृत्यू ओढावले आहेत, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. हे प्रकार थांबावेत यासाठी महापालिकाही आता सरसावली आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या आदेशानुसार शहरातील एसएससी, सीबीएसई, आयसीएसई या अभ्यासक्रमांच्या शाळांसह सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांना नायलाॅन मांजा न वापरण्याची शपथ देण्याचे आदेश काढण्यात आले आहे.

'दिव्य मराठी'तर्फे चार वर्षांपासून नायलाॅन मांजाविराेधी अभियान राबविण्यात येत असून दरवर्षी पालिकेचा त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळताे. यावर्षीही थेट आयुक्तांनी शिक्षण विभागाला यासंदर्भात आदेश दिले आहेत. यानुसार शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये नायलाॅन मांजा न वापरण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्याची सूचना काढल्या आहेत. यामुळे पतंग उडविणाऱ्या विद्यार्थ्यांपासून त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत नायलाॅन मांजा जीवघेणा असून त्याचा वापर नकाे असा संंदेश घराघरापर्यंत पाेहाेचणार असून नायलाॅन मांजाबंदी अभियानाला हातभार लागणार आहे. पालिकेने शाळांना दिलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, सर्व शाळांनी शालेय सत्र सुरू हाेतांना राष्ट्रगीत व शाळेची प्रार्थना झाल्यानंतर ही शपथ विद्यार्थ्यांना द्यायची आहे. काही निवडक विद्यार्थ्यांमार्फत किंवा शिक्षकांमार्फत नायलाॅन मांजा वापरल्याने हाेणाऱ्या दुष्परीणामांबाबत उद‌्बाेधनपर माहिती द्यायची आहे.

विद्यार्थ्यांनी हीच शपथ आपल्या कुटुंबियांनाही देण्याबाबत अाग्रही सूचना करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. याचबराेबर केंद्र प्रमुखांनी शाळानिहाय अहवाल घेवून 'नायलाॅन मांजा न वापरण्याबाबत' सामुहिक शपथ कार्यक्रम झाल्याचा अहवाल सादर करावा अशीही सूचना दिल्या गेल्या आहेत.

मांजा जीवघेणा दुर्घटनेचा फणा
तुमच्या आजुबाजूला नायलाॅन मांजाची विक्री हाेत असेल तर 'दिव्य मराठी' ला कळवा. त्या विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही नक्की मदत करू. पतंगाेत्सवाच्या आनंदावर विरजण पडू देऊ नका. रस्त्याने जाणारे तुम्ही, तुमचे कुटुंब या काळात नायलाॅन मांजापासून सुरक्षित ठेवायचे असेल तर पुढे या आणि माहिती द्या. तुमचे नाव प्रसिद्ध केले जाणार नाही. नायलाॅन मांजा अतिशय घातक असल्याचा अनुभव तुम्हाला आला असेल तर ताे आम्हाला सांगा. आम्ही ताे प्रसिध्द करू, जेणेकरून अशा मांजाची विक्री किंवा वापर करणाऱ्यांना सुबुद्धी येऊ शकेल.

माझ्यासह मुलाचाही जीव आला हाेता धाेक्यात
मी विद्यानगर मखमालाबाद रोडला राहताे, शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अंधार पडला होता माझ्या माेटारसायकलवर पाठीमागे माझा चिरंजीव ओम (वय १२ वर्ष) हा बसलेला होता. दुचाकी हळू होती आणि ड्रीम कॅसल पॉईंटजवळ मारुती मंदिराच्या पुढे अचानक माझ्या हेल्मेट कव्हरच्या वर प्लास्टिक स्ट्रिपला मांजा गरगर अडकायला सुरुवात झाली. मला समजेना नक्की काय हाेतेय?, मी गंगारलो कारण हेल्मेटमधून मला कानात करकर आवाज जणू काही विजेच्या तारेला स्पर्श झाल्यावर करंट बसतो तसा आवाज सुरू झाला माझी मान मागे मागे हेल्मेटसह ओढू लागली. मी गोंधळलो पाठीमागे मुलगा होता त्याला काही समजेना शेवटी दुचाकी मी तत्काळ थांबवली, हेल्मेटवर हात ठेवला असता जवळ जवळ२० ते २५ फूट मांजा हेल्मेटला वेटोळ्याप्रमाणे अडकला हाेता. नशीब बलवत्तर हेल्मेट होते अंधार पडलेला होता म्हनून मी बचवलो नाहीतर मान कापली गेली असती कदाचित पाठीमागे मुलगाही बसलेला होता त्याचा पण जीव धोक्यात आला असता. असा अनुभव काेणाच्याही वाटयाला येवू नये याकरीता सर्व पतंगप्रेमींना आव्हान करताे की, भयानक मांजा काही जण वापरतात यातून नाहक सामान्य गरीब, एखाद्या मुलाचा बळी जाऊ शकतो. अशा मांजाची विक्री करणाऱ्यांनीही पैशाच्या मागे न लागता मांजा विक्री करू नये ही विनंती. - प्रा. डॉ संतोष वाघ, विद्यानगर, मखमलाबादराेड

X
COMMENT