टेलिकॉम / 1 डिसेंबरपासून टॅरिफ प्लॅन महागणार, एअरटेल-जिओसह सर्वच कंपन्यांच्या ग्राहकांना मोजावे लागणार जास्तीचे पैसे

कंपन्यांच्या टॅरिफ वाढीमध्ये हस्तक्षेप करण्यात ट्रायचा नकार 

दिव्य मराठी वेब टीम

Nov 30,2019 06:16:45 PM IST

यूटिलिटी डेस्क - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)ने टेलिकॉम कंपन्यांद्वारे करण्यात येणाऱ्या दर वाढीमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. अशात आता 1 डिसेंबरपासून मोबाइल दरांत वाढ होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. नुकतीच ट्रायने टेलिकॉम क्षेत्राशी संबंधित लोकांसोबत एक बैठक घेतली होती. या बैठकीत टेलिकॉम क्षेत्रातील एका घटकाने किमान किंमत निर्धारित करण्याची मागणी केली होती. तर दुसऱ्या घटकाने याचा विरोध केला होता. यानंतर नियामक मंडळाने यावर विचार करण्यास नकार दिला आहे. अनेक टेलिकॉम कंपन्या आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. या संकटांतून सावरण्यासाठी कंपन्यांना दर वाढ करायचे आहेत.


अनेक कंपन्यांनी शुल्कवाढ जाहीर केली आहे

व्होडाफोन-आयडियानंतर एअरटेलने देखील 1 डिसेंबरपासून टॅरिफ वाढवण्याची घोषणा केली होती. या कंपन्यांनंतर रिलायन्स जिओने देखील टॅरिफमध्ये वाढ करणार असल्याचे घोषणा केली होती. टेलिकॉम क्षेत्राशी निगडीत लोकांच्या मानन्यानुसार, टेलिकॉम कंपन्या टॅरिफमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ करू शकतात.


मागील तिमाहीत व्होडाफोनला झाले मोठे नुकसान

व्होडाफोनने गेल्या आठवड्यात 50,921 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे जाहीर केले होते. समायोजित एकूण महसूल आदेशानंतर सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत हे कोणत्याही व्यावसायिक कंपनीचे सर्वात मोठे नुकसान होते. सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्या सरकारच्या बाजुने निकाल देत, व्होडाफोन-आयडियासह सर्व टेलिकॉम कंपन्यांना दूरसंचार विभागाची थकबाकी भरण्याचे निर्देश देण्यात आले होते. कंपन्यांनी आपल्या टॅरिफमध्ये 10 टक्के वाढ केल्यास पुढील तीन वर्षांत त्यांना 35 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


देशात मोबाइल डेटा आणि कॉल दरात घसरण

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या मते, जून 2016 ते डिसेंबर 2017 दरम्यान देशात मोबाइल डेटाच्या दरात 95% घट नोंदवण्यात आली आहे. सध्या मोबाइल डेटा 11.78 रुपये प्रती गिगाबाइट (जीबी) च्या दराने उपलब्ध आहे. मोबाइल कॉलचे दरही 60 टक्‍क्‍यांनी घसरले असून ते प्रति मिनिट 19 पैशांच्या आसपास गेले आहेत.

X
COMMENT