• Home
  • National
  • All the accused have been charged with murder in connection with the Tabrej lynching

कारवाई / तबरेज लिंचिंगप्रकरणी सर्व आरोपींवर पोलिसांनी पुन्हा ठेवला खुनाचा आरोप

 नव्या वैद्यकीय अहवालाच्या आधारावर पुरवणी आरोपपत्र दाखल

Sep 20,2019 10:40:00 AM IST

रांची - झारखंड पोलिसांनी तबरेज अन्सारी लिंचिंग प्रकरणात नव्या वैद्यकीय अहवालाच्या आधारावर सर्व ११ आरोपींवर पुन्हा खुनाचा आरोप ठेवला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. विशेष म्हणजे ८ दिवसांआधीच पोलिसांनी या सर्व ११ आरोपींवरील खुनाचा आरोप मागे घेतला होता.


नव्या वैद्यकीय अहवालाच्या आधारावर पोलिसांनी बुधवारी सेराईकेला-खारसवान जिल्हा न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यात सर्व ११ आरोपींच्या विरोधात भादंविचे कलम ३०२ (खून) पुन्हा लावण्यात आले आहे, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली. पोलिसांनी उर्वरित दोन आरोपींच्या विरोधातील चौकशी पूर्ण केल्यानंतर त्यांच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


तबरेज अन्सारीला (२४) चोरीच्या आरोपावरून एका खांबाला बांधण्यात आले आणि त्याला राॅडने मारहाण करण्यात आली तसेच ‘जय श्रीराम’ ही घोषणा देण्यास भाग पाडण्यात आल्याचे राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर जून महिन्यात दाखवण्यात आले होते. पोलिसांनी गेल्या १० सप्टेंबरला या प्रकरणातील सर्व आरोपींच्या विरोधातील खुनाचा आरोप वगळला होता आणि शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय आणि न्यायवैद्यक अहवालाच्या आधारे भादंविच्या कलम ३०४ मध्ये त्याचे रूपांतर केले होते. या अहवालांमध्ये तबरेजचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला, असे म्हटले होते. कलम ३०२ नुसार फाशी किंवा जन्मठेप आणि दंड अशा शिक्षेची, तर कलम ३०४ नुसार जन्मठेप किंवा १० वर्षांचा तुुरुंगवास आणि दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.या अधिकाऱ्याने सांगितले की, अन्सारीचा मृत्यू हृदयविकाराने झाला असल्याचे आधीच्या वैद्यकीय अहवालात म्हटले होते. त्यामुळे पोलिसांनी जमशेदपूर येथील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या तज्ञ डाॅक्टरांचे सेकंड ओपिनियन घेतले.


तज्ञ डाॅक्टरांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, ‘तबरेजच्या हाडाला फ्रॅक्चर झाले होते. कठीण वस्तूने केलेला हल्ला आणि हाडाला झालेले फ्रॅक्चर यामुळे रक्तस्राव होऊन त्याला हृदयविकाराचा झटका आला.’ आरोपी तबरेजला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात कुठलीही छेडछाड करण्यात आली नाही असे पोलिसांना आढळले आहे, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली. सर्व १३ आरोपींना अटक झालेली आहे.

असे आहे प्रकरण

तबरेज अन्सारी हा कामगार आणि वेल्डर म्हणून महाराष्ट्रातील पुणे येथे काम करत होता. ईद साजरी करण्यासाठी तो गावी परत आला होता. मोटारसायकल चोरीचा प्रयत्न करत असल्याच्या संशयावरून धटकीडीह येथील ग्रामस्थांनी त्याला १७ जूनच्या मध्यरात्री पकडले होते. त्याला एका खांबाला बांधण्यात आले होते. जमावाने काठ्या आणि लोखंडी राॅडने त्याच्यावर हल्ला केला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो दूरचित्रवाणी वाहिन्यांवरही दाखवण्यात आला होता. हल्ला करणाऱ्यांनी त्याला ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’ या घोषणा देण्यास भाग पाडले, असे त्या व्हिडिओत दिसत होते. हल्लेखोरांचा कुठल्याही हिंदुत्ववादी संघटनेशी संबंध असल्याचा पुरावा नव्हता, पण विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या हल्लेखोरांच्या अटकेच्या निषेधार्थ निदर्शने केली होती. जमशेदपूर येथील टाटा मेन हाॅस्पिटलमधील डाॅक्टरांनी २२ जून रोजी त्याला मृतावस्थेत दाखल करण्यात आल्याचे जाहीर केले होते. या घटनेसंदर्भात दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते.

X