आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेरड्या दुष्काळातील सर्व सवलती अतिवृष्टीग्रस्तांनाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी दुष्काळी परिस्थितीत ज्या सवलती दिल्या जातात त्या ओल्या दुष्काळातही द्याव्यात, रोजगार हमी योजनेद्वारे नुकसानग्रस्त शेताच्या सफाई कामाचा समावेश करून शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.


राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे दौरे केले. त्याचा अहवाल सादर करण्यासाठी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य या वेळी उपस्थित होते.


मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात या वर्षी झालेला अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, पूर परिस्थिती ह्या घटना गेल्या ३० ते ४० वर्षांत प्रथमच इतक्या तीव्रतेने घडल्या आहेत. राज्यात सर्वच भागात पीक परिस्थिती चांगली असताना या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीची मदत त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी प्रयत्न करावेत. दुष्काळी परिस्थितीत ज्या सोयी-सवलती दिल्या जातात त्या ओल्या दुष्काळातही द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


विमा कंपन्यांनी जास्तीत जास्त भरपाई द्यावी : विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसानीची जास्तीत जास्त भरपाई द्यावी यासाठी राज्यस्तरावर बैठका झाल्या आहेत. केंद्रीय गृह तसेच कृषिमंत्रीदेखील विमा कंपन्यांची लवकरच बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी
शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी आहे. पात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी पंचनामे तातडीने होणे आवश्यक आहे. विमा कंपन्यांकडून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी अचूक पंचनामे गरजेच आहेत. त्यासाठी पालकमंत्र्यांनी क्षेत्रियस्तरावर बैठका घ्याव्यात. तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी मदतीपासून बाधीत राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिल्या.
 

बातम्या आणखी आहेत...