आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारांचे देव पाण्यात, कुणाच्या कपाळी गुलाल लागणार, मतदारांत उत्सुकता शिगेला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम दिव्य मराठी -  लोकसभा निवडणुकीची मतमोजणी काही तासांवर आली आहे. प्रमुख स्पर्धेत असलेल्या उमेदवारांत प्रचंड धाकधूक वाढली असून त्यांनी विजयासाठी देव पाण्यात घातले आहेत. शिवाय मतदारांतही निकालाची प्रचंड उत्कंठा आहे. मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघात जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून दोन दिवसांपासूनच मतमोजणी केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  

 

हिंगोली: वंचितमुळे कुणाचे नुकसान?
हिंगोली लोकसभेत काँग्रेस, शिवसेना,  वंचित बहुजन आघाडी व  बहुजन समाज पार्टी या चार पक्षांच्या प्रमुख उमेदवारांसह एकूण २८ उमेदवार रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीने चांगल्याप्रकारे मतदान घेतले असल्याचा प्राथमिक अंदाज असल्यामुळे वंचित आघाडी कुणाचे नुकसान करते आणि कोणाच्या पथ्यावर पडते या बाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत. शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षात काट्याची लढत दिसून येत अाहे. याही वेळी उमेदवार केवळ १० ते १५ हजार मतांच्या मताधिक्याने निवडून येण्याची शक्यता आहे. 

 

बीड : प्रतिष्ठा पणाला
बीड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डाॅ. प्रीतम मुंडे अाणि अाघाडीचे बजरंग साेनवणे यांच्यात काट्याची टक्कर अाहे. उमेदवारांपेक्षा ही लढत मंत्री पंकजा मुंडे अाणि विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रतिष्ठेची अाहे. राज्यातील प्रमुख लढतींपैकी बीडची लढत सर्वांच्याच अाैत्सुक्याची अाहे. २०१४ च्या पाेटनिवडणुकीत ९ लाख २२ हजार ४१६ मते घेऊन विजयी झालेल्या डॉ. प्रीतम मुंडे या वेळी गड राखणार काय, याबाबत मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. कारण बजरंग सोनवणे यांचे त्यांना या वेळी कडवे आव्हान मिळाले आहे. 
 

नांदेड: अशोक चव्हाणांची धाकधूक
काँग्रेेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडमधून या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना  चिखलीकरांचे कडवे आव्हान आहे. २०१४ च्या निवडणुकीतही त्यांना भाजपचे दिगंबर पाटील यांनी चांगलेच झुंजवले होते.  चव्हाण ८१ हजार ४५५ मताधिक्याने निवडून आले होते. या वेळी बहुजन वंचित आघडीचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांच्यामुळे चव्हाणांच्या पारंपरिक मतांची विभागणी झाल्याने ते चिंतातुर आहेत. प्रा. भिंगंेनी लाखावर मते घेतली तरी चव्हाण अडचणीत येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली. 
 

उस्मानाबाद प्रचंड  उत्सुकता
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत प्रचंड उलथापालथ झाली. शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड गायकवाड यांचे तिकीट कापले गेल्याने गायकवाड गटात प्रचंड अस्वस्थता पसरली होती. शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर आघाडीकडून राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवारी मिळाली.  प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात ओमराजेंच्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून केलेली आत्महत्या आणि आेमराजेंकडून आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात असल्याची खा. गायकवाड यांची उमरगा ठाण्यात दिलेली तक्रार यामुळे ओमराजे मोठ्या वादात अडकले होते. या पार्श्वभूमीवर उद्याच्या निकालाकडे उस्मानाबाकरांचे लक्ष लागून आहे. 
 

लातूर : अटीतटीचा सामना
लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुनील गायकवाड यांचे तिकीट कापून बिल्डर असलेल्या सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसनेही उमेदवार बदलून उद्योजक मच्छिंद्र कामंत यांना उमेदवारी दिली. दोन्ही पक्षांचे उमेदवार धनसंपन्न असल्याने संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष या लढतीकडे लागून आहे. वंचित बहुजन आघाडीचे राम गारकरही येथून लढत देत आहेत. 

 

परभणी : कोण येणार? 
परभणी लोकसभा मतदारसंघात या वेळी मोठीच चुरस निर्माण झाली आहे. प्रस्थापित खा. संजय जाधव यांच्याविरुद्ध  नवखे राजेश विटेकर अशी लढत होत आहे. शिवसेनेतून इतर पक्षात जाण्याची परंपरा खंडित करणारे खा. संजय जाधव यांच्यावर शिवसेनेने पुन्हा विश्वास टाकून त्यांना उमेदवारी बहाल केली. पक्षाचा हा विश्वास खा. जाधव सार्थ ठरवतात की बालेकिल्ला गमावतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. 

 

जालना : दानवेंच्या हॅटट्रिककडे लक्ष
जालना लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून येणारे खा. रावसाहेब दानवे पाचव्यांदा लोकसभेत पोहोचणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. २०१४ च्या निवडणुकीत दानवेंना आव्हान देणाऱ्या विलास औताडेंनी याही वेळेस दानवेंना आव्हान दिले आहे. गत निवडणुकीत खा. दानवे २ लाख ६ हजार ७९८ मताधिक्याने विजयी झाले होते. २०१४ मध्ये मोदी लाटेमुळे त्यांचा विजय सुकर झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...