आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमधील राष्ट्रवादीचे चारही आमदार म्हणतात, आम्ही शरद पवारांबरोबरच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिनेश लिंबेकर | बीड

शनिवारी सकाळी ८ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी, तर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ अजित पवार यांनी घेतल्यानंतर राजकीय घडामोडीला वेग आला. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांकडे की अजित पवारांकडे जाणार अशी चर्चा सुरू झाली. चारही आमदारांशी संपर्क साधला असता संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके व बाळासाहेब आजबे हे तीन आमदार शरद पवारांबरोबर असल्याचे दिसून आले. शुक्रवारपासून संपर्कात नसलेले धनंजय मुंडे यांनीही शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावल्याने तेसुद्धा पवारांबरोबरच असल्याचे सिद्ध झाले.

बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले आहे की, अजित पवार यांच्या फोनमुळे आम्ही राजभवनाकडे गेलो. पण आम्हाला याची कल्पना नव्हती. शपथविधी झाल्यावर आम्ही थेट पवार साहेबांकडे गेलो. मी राष्ट्रवादी व शरद पवार साहेबांबरोबरच आहे. गैरसमजुतीने आणि नेत्यांचा फोन आला म्हणून मी गेलो, असे संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, शरद पवार साहेब आणि अजित पवार हे दोघे काही वेगळे नाहीत, एकच आहेत. मी राष्ट्रवादीमध्येच आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजून चित्र स्पष्ट होण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे. कालच मी शरद पवार साहेबांची भेट घेतली. आज कोल्हापूर येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेलो आहे. दोघेही एकच आहेत असे मी मानतो. आष्टी येथील राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी आपण शरद पवार साहेबांबरोबर असून जो निर्णय घेतील तो आपल्यास मान्य असल्याचे सांगितले. आज सकाळी राष्ट्रवादीकडून मुंबईला या, असा निरोप आल्यानंतर आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो. तसेच आपण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांसोबतच असल्याचेही आ. आजबे यांनी सांगितले. 

परळीचे आमदार धनंजय मुंडे हे शुक्रवारपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात नव्हते. शनिवारी सकाळीसुद्धा मुंडे यांचा मोबाइल नंबर नॉट रिचेबल होता. त्यामुळे ते अजित पवार यांच्याच बराेबर असतील असे तर्क वर्तवले जात होते. परंतु मुंडे हे सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकंदर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे चारही आमदार पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरच असल्याचे समोर आले आहे.

मुंबईत नेमकं काय घडलं
बुलडाण्याचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना सुरुवातीला गटनेते अजित पवार यांचा शुक्रवारी रात्री बारा वाजता फोन आला. फोन आल्यानंतर ते बी-४ बंगल्यावर पोहोचले. त्यांच्यासमवेत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह आमदार नरहरी झिरवळ, सुनील शेळके हे होते. शनिवारी सकाळी सात वाजता बी-४ बंगल्यावर हे आमदार गेले. त्या ठिकाणी जवळपास आठ ते दहा आमदार आल्यानंतर तिथून राजभवनाकडे गेले. राजभवनापर्यंत जाईपर्यंत आमदारांना कशासाठी गेलो हे माहीत नव्हतं. तिथे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह राज्यपाल आले आणि लगेच शपथविधी झाला.

बातम्या आणखी आहेत...