आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • All The Leaders Are Now Visiting The Farmers Who Are In Distress Due To The Heavy Rainfall

'संगीत खुर्ची' बांधावर !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई, दिल्लीतल्या 'संगीत खुर्ची'च्या खेळातून सवड मिळाली की, सगळे बिनीचे नेते सध्या अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातल्या बांधावर धाव घेत आहेत. गेल्या दोन दिवसात शरद पवार हे विदर्भाच्या, तर उद्धव ठाकरे सांगली व साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. शेतकऱ्यांशी चर्चा, माध्यमांशी गप्पा, फुकाच्या आश्वासनांचा अाधार यातून साधत काहीच नाही. मोठ्या नेत्यांच्या शाब्दिक आधाराची तूर्त गरज असतेच. मात्र, शेतकरी खरी वाट पाहतोय, ते सरकारी मदत त्याच्या बँकेतल्या खात्यामध्ये कधी पाेहोचेल याची? पण, सध्याच्या एकूण राजकीय स्थितीमुळे दिलाशाची सरकारी कृती लांबते आहे. आणि त्यामुळे धीर न धरु शकणारा, संयम व क्षमता नसलेला शेतकरी दम सोडतो आहे. 'टोकाला जाऊ नका. आत्महत्या करू नका. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी,' असे नुसते शब्द ऐकून धीर किती दिवस टिकणार? सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यवतमाळ जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने तर स्वत:, पत्नी व चार मुलांना संपवले. 'अशा स्थितीत शेतकरी म्हणून जगणे अशक्य आहे,' अशी लिहून ठेवल्याने सरकारी कागदावर नोंदलेली ती आत्महत्या आहे. अतिवृष्टीनंतर मदत करण्यासाठी आणखी किती आत्महत्यांची वाट आता केंद्र सरकारला बघायची आहे? मुख्यमंत्र्यांनी १० हजार कोटी रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली होती, पण तीही कागदावरच आहे. पवारांच्या विदर्भातील दौऱ्यात नुकसानीचे पंचनामे वस्तुस्थितीला धरून होत नसल्याचे निदर्शनास आले. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासकीय आदेश आहेत. पण, ही नुकसानी मोजायची कशी? कमकुवत, छोट्या शेतकऱ्याला मदतीची गरज जास्त असते. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात कोण घेणार? राज्यातील फटका बसलेल्या क्षेत्राचा आकडाही बदलतो आहे. कधी ५६ लाख, तर कधी ७० लाख हेक्टरचा उल्लेख प्रशासनाकडून होतोय. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचे मीटर थांबलेले नाही. तो निर्णय कोण घेणार? ज्यांचे पीक विमे आहेत, त्यांना भरपाई मिळण्याची प्रक्रिया वेगात कशी होणार? दुबार पेरण्या करायच्या तर आर्थिक सहाय्य कोण देणार? ते वेळेवर नाही मिळाले की, शेतकरी सावकाराकडे धाव घेतो. एकदा त्या व्याजाच्या पाशात अडकला की, संकटांची पुढची मालिका सुरू होते. यावर उपाय एकच आहे, ताे म्हणजे तातडीने, नेमके व सत्यतेला धरून पंचनामे करणे आणि शेतकऱ्याच्या खात्यात मदतीचे पैसे लगेच टाकणे. अन्यथा, नेत्यांचे बांधावर कितीही दौरे झाले, तरी शेतकऱ्यांच्या हाती मात्र फक्त शब्दच पडतील. वेळेवर मदत न मिळण्यास चारही पक्ष जबाबदार आहेत. सत्तेच्या खेळात भाजपचे 'वेट अँड वॉच' ठीक आहे. पण, तेच तंत्र शेतकरी मदतीच्या बाबतीतही दिसत आहे. सरकार स्थापनेसाठी धडपडणारी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचे किमान समान कार्यक्रमावर एकमत केव्हा का होईना; पण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी आवश्यक ती पावले लवकर उचलायला हवीत. नाही तर शेतकऱ्यांवर अस्मानीने आणलेले संकट मदतीअभावी आणखी गहिरे होईल.