आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील सर्व खासदार कोट्यधीश, राष्ट्रवादीचे भाजप-शिवसेनेपेक्षा श्रीमंत : एडीआरचा अहवाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातून केंद्रात गेलेले सर्वच्या सर्व म्हणजे ४८ खासदार हे कोट्यधीश आहेत. यात राष्ट्रवादीच्या चारही खासदारांची सरासरी मालमत्ता ही शिवसेना, भाजप आणि अन्य पक्षांच्या खासदारांपेक्षा जास्त असून ती ८९.४१ कोटी रुपये आहे. 


देण्यांमध्येही सगळ्यात कमी देणी ही राष्ट्रवादीच्याच खासदारांची असून ती सरासरी ५६ लाख रुपये आहे. भाजपचे सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचीही मालमत्ता २.७८ कोटी असून त्यांनी पॅन कार्डाचा तपशील दिलेला नाही. एडीआरने राज्यातील नवनिर्वाचित खासदारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करून याबाबतचा अहवाल सादर केला आहे. विजयी उमेदवारांची सरासरी मालमत्ता २३.०४ कोटी रुपये असून भाजपच्या २३ खासदारांची सरासरी मालमत्ता २१.११ कोटी रुपये, शिवसेनेच्या १८ खासदारांची सरासरी मालमत्ता १२.९७ कोटी रुपये, काँग्रेसच्या एका खासदाराची मालमत्ता १३.७४ कोटी रुपये, एमआयएमच्या एका खासदाराची मालमत्ता २.९५ कोटी रुपये असून राष्ट्रवादीच्या चार आमदारांची सरासरी मालमत्ता मात्र ८९.४१ कोटी रुपये आहे. 


खासदारांकडे सरासरी ३.२७ कोटींची देणी : या ४८ विजयी उमेदवारांची प्रती सरासरी देणी  ३.२७ कोटी असून भाजपच्या २३ खासदारांची सरासरी देणी ५.५४ कोटी, शिवसेनेच्या १८ खासदारांची प्रती खासदार सरासरी देणी १.३ कोटी आणि राष्ट्रवादीच्या चार खासदारांची प्रती खासदार सरासरी देणी फक्त ५६ लाख रुपये आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर ८९ कोटींपेक्षा जास्त देणी असून सुधाकर श्रृंगारे यांच्यावर १० कोटींपेक्षा जास्त, प्रीतम मुंडे यांच्यावर ९ कोटींपेक्षा जास्त, नवनीत राणा यांच्यावर ७ कोटींपेक्षा जास्त, राजन विचारे यांच्यावर ५ कोटींपेक्षा जास्त, धैर्यशील माने, हेमंत गोडसे, नितीन गडकरी यांच्यावर ४ कोटींपेक्षा जास्त, राजेंद्र गावित यांच्यावर ३ कोटींपेक्षा जास्त आणि संजयकाका पाटील यांच्यावर २ कोटींपेक्षा जास्त देणी आहेत.
 

 

उदयनराजे भोसले सर्वांत श्रीमंत खासदार
सगळ्यात जास्त मालमत्ता उदयनराजे भोसले यांची असून १९९ कोटींपेक्षा जास्त आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांचा क्रमांक असून त्यांची मालमत्ता १४० कोटींपेक्षा जास्त आहे. तर, रणजितसिंह नाईक निंबाळकर १२७ कोटी, श्रीरंग बारणे १०२ कोटी व सुनील मेंढे यांची ६२ कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आहे.
 

 

२८ खासदारांवर गुन्हे, सर्वाधिक भाजपचे
४८ पैकी २८ विजयी खासदारांवर गुन्हेगारी प्रकरणे दाखल असून त्यात भाजपच्या २३ पैकी १३, शिवसेनेच्या १८ पैकी ११, राष्ट्रवादीच्या चारपैकी एक, एमआयएम आणि काँग्रेसच्या खासदारांचाही समावेश आहे.