आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिन्ही ज्योतिर्लिंगे सज्ज, 'सीसीटीव्ही'ची राहणार नजर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी/वेरूळ/हिंगोली- पहिल्या श्रावणी सोमवारला भाविकांची होणारी गर्दी पाहता बारा मराठवाड्यातील तिन्ही ज्योतिर्लिंग देवस्थानांनी पुरेपूर तयारी केली आहे. परळीतील प्रभू वैद्यनाथ, वेरूळ येथील घृष्णेश्वर आणि औंढा येथील नागनाथाच्या दर्शनासाठी देवस्थानांसह प्रशासनानेही विविध सुविधा दिल्या आहेत. तिन्ही देवस्थानांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. 


परळी येथील वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख आणि राजश्री देशमुख यांनी वैद्यनाथास ट्रस्टच्या वतीने रुद्राभिषेक केला. रविवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून प्रभू वैद्यनाथाचे दर्शन सुरू होत असून मंदिर परिसरात ३० सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कर्मचारी राहतील. प्रत्येक भाविकांची तपासणी करूनच प्रवेश देण्यात येईल. अंबाजोगाई विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी वैद्यनाथ मंदिरातील बंदोबस्ताचा आढावा घेतला. 


स्थानिक ग्रामस्थांना घृष्णेश्वराचे सकाळी ७.३० पर्यंत घेता येणार दर्शन
बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाच्या वतीने वेरूळ येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, स्वच्छता, पार्किंग, आरोग्य, परिवहन, सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आला आहे. ग्रामीण पोलिस अधीक्षक आरती सिंह तसेच खुलताबादचे पोलिस निरीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरामध्ये तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ग्रामस्थांसाठी सकाळी ४ ते ७.३० वाजेपर्यंत मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजाने ओळखपत्र, आधार कार्ड दाखवून थेट दर्शन घेण्याची सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. 


आैंढा नागनाथ देवस्थानात कडेकोट बंदोबस्त
औंढा येथील नागनाथ मंदिरात श्रावणी सोमवारपासून पुढील एक महिनाभर भाविकांची मोठी वर्दळ होणार असल्याने हिंगोली पोलिस विभागाने मंदिर आणि परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. सुरक्षेसाठी ४ अधिकारी आणि ५० पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान असा फौजफाटा नियुक्त करण्यात आला असल्याची माहिती औंढा पोलिसांनी दिली. हिंगोली पोलिस दलातील श्वान पथकाने देवस्थानाच्या प्रत्येक भागाची तपासणी केली. 

बातम्या आणखी आहेत...