आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Allegations Of Pistol Smuggling In Connection With The 'Tunki' Center At Madhya Pradesh Border, The Accused Hide Their Identities

मध्य प्रदेश सीमेवरील 'टुणकी' केंद्राशी जालन्यातील पिस्तूल तस्करीचे कनेक्शन, आरोपी लपवतात एकमेकांची ओळख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना : दहा हजारांत गावठी पिस्तूल आणून ते जालना जिल्ह्यात ४० हजार ते एक लाखापर्यंत विकायचे. या अवैध व्यापारातून जिल्ह्यात दोन जणांचे बळी गेले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या काेठडीत असलेल्या हवालदाराच्या वकील मुलासह अन्य गुन्ह्यातील दोन आरोपींनी पोलिसांपुढे तोंड उघडले असून गावठी पिस्तूल खरेदी-विक्रीचा हा व्यवहार मध्य प्रदेश-महाराष्ट्राच्या सीमेवरील 'टुणकी' या ठिकाणाहून झाल्याचे समोर आले. अजून किती, कुणाला, पिस्तुलांची विक्री झाली याची यादीच तयार केली जात आहे. गुन्हेगारी वर्तुळातील अनेक जण पोलिसांच्या 'हिट लिस्ट'वर अाले आहेत. टुणकी येथील हे केंद्र नष्ट करून तेथील आरोपींना बेड्या ठोकण्यासाठी जालना पोलिस सरसावले अाहेत.

जालना जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांसह जिल्ह्यात सर्रास गावठी पिस्तूल, काडतूस बाळगण्याच्या घटनांमुळे पाेलिसांची डोकेदुखी वाढली होती. पोलिस प्रशासनाने कारवाया करत आरोपींनाही अटक केली. परंतु, गावठी पिस्तुलाच्या नेटवर्कचा पोलिसांना शोध लागत नव्हता. दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच नांदेड येथून पिस्तूल खरेदी करून वापरणारे दोघे तर हवालदाराच्या वकील पुत्रास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला बाेलते केले असता टुणकी येथून हे पिस्तुले येत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक गुन्ह्यांत या पिस्तुलांचा वापर केला जायचा. यामुळे जालन्याचे बिहार हाेण्याकडे वाटचाल सुरू होती. दरम्यान, पोलिसांनी मात्र, आता पिस्तूल विक्रेते, खरेदीदार एकाच वेळी जाळ्यात अाेढले. जिल्ह्यात विक्री करणाऱ्या तस्करांच्याही मुसक्या अावळल्या. पिस्तूल विकणारे अाणखीही काही तस्कर व त्यांचे नेटवर्क पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता अाहे. काेठडीतील आरोपी गुन्ह्यांची सविस्तर कबुली पोलिसांपुढे देत आहेत. यातून शहर व जिल्हाच नव्हे तर अन्य जिल्ह्यातही कुणाकुणाला पिस्तुले विकली, खरेदीदारांची माहिती पोलीस गोळा करीत आहेत. खरेदीदारांचे क्राईम रेकॉर्ड, त्याला आशीर्वाद कुणाचा, फायनान्सर कोण या सर्व बाबी पोलिस तपासत आहेत. हे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यासह पथक काम करीत आहेत.

६८९ परवाना शस्त्रधारक 

कुणाकडून जीवितास धोका असल्यास तसेच गरज असलेल्या ६८९ जणांकडे शस्त्र परवाने आहेत. परंतु, अकरा महिन्यात तब्बल नऊ जणांकडे गावठी पिस्तूल आढळून आली आहेत. तसेच दोन घटनांत तर दोघांचा बळी गेल्यामुळे जिल्ह्यात पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. काही आरोपींच्या मदतीने जालना पोलिस आता पिस्तुलाच्या खरेदी-विक्रीच्या मुळाशी पाेहाेचत अाहेत.

मराठवाडाभर विक्री?

पोलिसांच्या तपासात जालना आणि नांदेड येथे पिस्तुलांची तस्करी केली जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तथापि, पिस्तूल विक्रीचे हे नेटवर्क संपूर्ण मराठवाड्यात पसरले असण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातही या पूर्वी गावठी पिस्तुले हस्तगत करण्यात आली. त्यामुळे इतर शहरांतही पिस्तुले विक्री होत असावीत असाही संशय आहे.

या ठिकाणी आहेत कारखाने

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, टुणकी, उत्तर प्रदेश, बिहार यासह आदी राज्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पिस्तुलांचे कारखाने असल्याची पोलिसांची माहिती आहे. येथून पिस्तूल येऊन नांदेड येथूनही त्याची विक्री होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पिस्तुलांची मागणीनुसार विक्री होते. नेहमी संपर्कात असलेल्यांनाच शस्त्र विक्री केली जाते. काही तुरळक जण नांदेडमधील गुन्हेगारांच्या मदतीने विक्री करत, असे पोलिसांनी सांगितले.

आरोपी लपवतात एकमेकांची ओळख

गावठी पिस्तूल खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना अाराेपी एकमेकांविषयी गोपनीयता बाळगतात. अापली ओळख ही टोपणनावाने देतात. एखादा आरोपी पोलिसांनी पकडल्यानंतर पुढच्याला आपली काही ओळख राहू नये, अशी खबरदारी घेतात. ही एक गुन्हेगारांची 'थेअरी' आहे.

गोपनीय पथक कामाला

जिल्ह्यात गावठी पिस्तुलाचा वापर झाल्याचे काही कारवायांतून समोर आले आहे. खरेदी-विक्रीचा व्यवहार करणारेही काही गळाला लागले आहेत. यामुळे हे नेटवर्क उद्ध्वस्त करणार आहोत. एस. चैतन्य, पोलिस अधीक्षक, जालना.