आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Alliance Will Be, CM Will Be ShivSena's Candidate : Uddhav

युती तर होणारच, शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवणार : उद्धव

एका वर्षापूर्वीलेखक: सुनील चौधरी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘पाठीमागे काय झाले ते विसरुन आता आपल्याला शिवसेना-भाजप युतीसाठीच काम करायचे आहे. आपले उमेदवार तर निवडून आणायचेच आहेत. ज्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत, तेथेही शिवसैनिकांनी आपली ताकद त्यांच्यासोबत लावायची आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जाताना मी एक वचन दिले आहे. एक ना एक दिवस मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवणार. हे  वचन पूर्ण करण्याची मी शपथ घेतली आहे. यासाठी मला तुमची साथ हवी. म्हणूनच गाव तेथे शिवसेनेची शाखा आणि घर तेथे शिवसेना पोहोचवायचे काम करायचे आहे’, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी शिवसैनिकांना केले.
 
मुंबईतील रंगशारदा भवनात शनिवारी राज्यातील २८८ मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आणि जिल्हाप्रमुखांचा मेळावा शिवसेनेने आयाेजित केला हाेता. त्याला उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केले. ‘ जागावाटपाबाबत भाजपच्या नेत्यांशी आपले बाेलणे झाले आहे. लवकरच जागावाटप जाहीरही केले जाईल. निवडून येण्याची क्षमता असलेल्या व निष्ठावंत उमेदवारांना न्याय देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. निवडणूक लढविण्यासाठी आपल्या पक्षात इच्छूकांची संख्या माेठी आहे. त्यामुळे जर युतीचा धर्म पाळताना एखाद्याला उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरीची भाषा करु नये. सच्चा शिवसैनिक कधी गद्दारी करत नाही’, असा इशाराही ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना  दिला. 

आज भाजप-शिवसेना युतीची घोषणा होण्याची शक्यता
शिवसेना आणि भाजपमधील जागावाटप अंतिम झाले असून दोन्ही पक्षांनी जागा वाटपाला मंजुरी दिली आहे. जागांच्या अदलाबदलीचा प्रश्नही सोडवण्यात आला असून रविवारी युतीची घोषणा होण्याची शक्यता शिवसेनेतील सूत्रांनी दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केली.
 

सेनेच्या इच्छुक उमेदवारांना बोलावले म्हणजे आता युती तुटली असे नाही
उद्धव ठाकरे म्हणाले, २८८ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना बोलावले म्हणजे युती तुटली असे नाही. आगामी निवडणुकीत सत्ता हवी म्हणून सर्व मतदारसंघातील इच्छुकांना बोलावले आहे. जागावाटपाची चर्चा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुरू असून एक-दोन दिवसात जागावाटप आणि युतीची घोषणा होईल, असेही त्यांनी सांगितले.

आमच्याकडे कपट कारस्थान नाही आणि गनिमी कावा हा गनिमासाठी 
उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेची स्थापना कोणताही मुहूर्त किंवा काळ बघून झालेली नाही. एकीकडे देश चंद्राकडे झेप घेतोय. मंगळावर पाणी शोधतोय आणि आपण अजून पत्रिकेत मंगळ शोधत बसलो आहे. आयुष्य बदलण्याची जर कोणत्या खड्यामध्ये ताकद असेल तर जिवंत माणसांमध्ये की ताकद का नसेल? सांगत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, जर शिवसैनिक माझ्या सोबत असतील आणि माझ्यावर त्यांचा विश्वास आहे तर मला हवा तसा टर्न मी मारीन. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत कपट कारस्थान आमच्याकडे नाही आणि गनिमी कावा हा गनिमासाठी आहे असे स्पष्ट केले.
 

जे ५० वर्षे आपल्याशी जसे वागले त्यांचे काय झाले त्यांना उत्तर मिळतेय
राष्ट्रवादी काँग्रेसमधील घटनांबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, कोणाचे वाईट होत असताना मला आनंद होत नाही, काल पवार कुटुंबाबत जे घडले, जे गेली ५० वर्षे आपल्याशी जसे वागले त्यांचे काय झाले त्यांना परस्पर उत्तर मिळत आहे. हा महाराष्ट्र कुणाशी सुडाने वागत नाही. आम्ही कुणाशी सुडाने वागणार नाही. पण आसूड ओढतो. अजित पवार यांच्या पार्थला शेती करण्याचा सल्ला दिल्याच्या वक्तव्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी राजकारण सोडणार नाही आणि शेतीही करणार नाही. परंतु मी मुख्यमंत्री बसवून दाखवेन.
 

१० वर्ष जुने प्रकरण उकरून शिवसेनाप्रमुखांवर दाखल केला होता गुन्हा
बाळासाहेबांच्या अटकेसाठी काहींनी दंड थोपटले. उस्फूर्तपणे जनता रस्त्यावर उतरली. सरकार कुणाचे काय होते ते स्पष्ट आहे. आम्ही कुणाच्या मध्यस्थीसाठी गेलो नव्हतो. न्यायमूर्ती म्हणाले केसच होऊ शकत नाही. बाळासाहेब कुठले संचालक नव्हते वा फायलींची अफरातफरही नव्हती. १० वर्ष जुने प्रकरण काढून शिवसेनाप्रमुखांवर गुन्हा दाखल केला होता. पोलिस आणि सत्ता हातात असेल तर काहीही करू शकतो. शिवसेनाप्रमुखच स्वत:च कोर्टासमोर हजर झाले होते आणि जाब विचारला की सांगा माझा गुन्हा काय होता. हिंदूंचे रक्षण करणे हा गुन्हा होता?