आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणुकीमध्ये युतीला २२५ पेक्षा जास्त जागा मिळणार ; भाजप नेत्यांना विश्वास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीत ४५ च्या आसपास जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या शिवसेना-भाजप युतीला तितक्या जागा काही मिळाल्या नाहीत, परंतु २०१४ एवढ्याच म्हणजे ४१ जागा कायम ठेवण्यात युतीला यश आले. विशेष म्हणजे २२५ पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात युतीने चांगले यश मिळवले असून ज्या ठिकाणी युतीला मते मिळाली नाहीत त्या ठिकाणांवर आता लक्ष केंद्रित केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत २२५ पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार असून त्यात आम्हाला नक्कीच यश मिळेल, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.


लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा पूर्णपणे सुपडासाफ झाला असून राष्ट्रवादीही २०१४ एवढ्याच जागा कायम ठेऊ शकले आहे. खरे तर शरद पवार यांनी आघाडीला राज्यात २२ ते २५ जागा मिळतील, अशी आशा व्यक्त केली होती.  लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीने २२८ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळवली तर आघाडीला फक्त ५५ मतदारसंघांत आघाडी मिळाल्याचे समोर येत आहे. २०१४ मध्ये युतीने २०० च्या आसपास जागांवर आघाडी घेतली होती आणि वेगळे लढूनही १८५ जागा निवडून आणल्या होत्या. आता तर युती एकत्र लढणार असल्याने २२५ पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. 
 

 

राष्ट्रवादीचा वरचष्मा राहणार?
काँग्रेसकडे कणखर नेता नसल्याने विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादी व मनसेची आघाडी होऊ शकते. काँग्रेसची जागा राष्ट्रवादी व मनसे भरून काढण्याचा प्रयत्न करतील. काँग्रेस कमजोर झाल्याने राष्ट्रवादीचा जागा वाटपात वरचष्मा राहू शकतो. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून २८८ जागा लढवण्याचे घोषित केले आहे. लोकसभा निवडणुकीला वंचितच्या सर्व उमेदवारांनी लाखांच्या वर मते घेतल्याने त्याचा फटका आघाडीला बसलाच आहे. त्यामुळे विधानसभेलाही त्यांची मतांची टक्केवारी कायम राहाण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी आणि मनसेला कितपत यश मिळू शकेल याबाबत राजकीय वर्तुळातच शंका व्यक्त केली जात आहे.

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघांवर नजर
पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, काँग्रेस सचिव अमित देशमुख, प्रणिती शिंदे, भास्कर जाधव, माजी मंत्री नसिम खान, मनोहर नाईक, राणा जगतसिंह पाटील आणि संग्राम जगताप यांच्या मतदारसंघात आघाडी मते मिळवण्यात अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे या मतदारसंघांवर भाजप आपले लक्ष केंद्रित करणार असून या जागा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न युद्ध स्तरावर केला जाणार आहे, असेही या नेत्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...