आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयसूर्यासह श्रीलंकेच्या तीन खेळाडूंवर भारतात सडक्या सुपारीच्या तस्करीचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - भारतात तस्करीच्या माध्यमातून सडलेली निकृष्ट सुपारी पाठवल्याप्रकरणी श्रीलंकेचा माजी क्रिकेट कर्णधार सनत जयसूर्याचे नाव समोर आले आहे. त्याच्यासह आणखी दोन क्रिकेटपटूंचाही या गोरखधंद्यात समावेश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप त्यांची नावे समोर आलेली नाहीत. 


डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने नागपुरात कोट्यवधी रुपयांची सडकी सुपारी जप्त केली होती. या प्रकरणात अटकेतील एका व्यापाऱ्याच्या चौकशीत जयसूर्याचे नाव समोर आले. पथकाने जयसूर्याला मुंबईला बोलावून चौकशी केली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी श्रीलंका सरकारला पत्र पाठवण्यात आले आहे. सूत्रांनुसार, इतर दोन क्रिकेटपटूंना २ डिसेंबरपर्यंत चौकशीसाठी बोलावण्याची तयारी आहे. रेव्हेन्यू इंटेलिजन्सचे उपसंचालक दिलीप सिवारे यांनी सांगितले की, ही सुपारी इंडोनेशियाहून आधी श्रीलंका आणि नंतर तस्करीद्वारे भारतात पाठवण्यात आली होती. 

 

यासाठी श्रीलंकेत डमी कंपन्या स्थापण्यात आल्या  
असा केला जातो घोळ : थेट इंडोनेशियाहून सुपारी आयात केल्यास १०८ आयात शुल्क द्यावे लागते. साऊथ एशिया फ्री ट्रेड एरिया (सपता) अंतर्गत श्रीलंकेत आयात शुल्क पूर्णपणे माफ आहे. याचा फायदा सुपारी तस्करीसाठी घेतला जात आहे.  नागपुरातील व्यापाऱ्यांना सडकी सुपारी आयातीचा सर्वाधिक फायदा होतो. ही सडकी श्रीलंकेतील व्यापारी सुपारी भारतीय व्यापाऱ्यांना एकूण २५ टक्के दरातच देतात. म्हणजेच १०० कोटींची सुपारी २५ कोटींत घेऊन ती देशातील विविध भागांत सल्फरच्या भट्टीत भाजून चांगल्या सुपारीत मिसळवली जाते. 


एकट्या नागपुरात सुपारीचा १०० कोटींवर व्यवसाय  : नागपुर शहर सडक्या व कच्च्या सुपारीच्या धंद्याचे मोठे केंद्र बनले आहे. १०० कोटींपेक्षा जास्त रकमेचा व्यवसाय नागपुरातूनच होतो. याची अनेक कारणे सांगितली जातात. नागपूर हे रस्ते व रेल्वेमार्गाने जुळलेले असल्याने येथे सहजपणे माल पोहोचतो. सुपारीचे मोठे साठे आशियाई देशांतून आणले आसामपर्यंत पोहोचवले जातात. आसाममध्ये सुपारीचा मोठा व्यवसाय आहे. तेथे अनेक डमी कंपन्या असून तेथील उत्पादनाची पक्की बिले तयार करून देशभरात पाठवली जातात. तेथून मोठ्या प्रमाणात नागपुरला सुपारी येते.

 

सुपारी इंडोनेशियाहून मागवली, लंकेत खोटी उत्पादन प्रमाणपत्रे
सूत्रांनी सांगितले की, खेळाडूंनी आपले वजन वापरून सरकारकडून सुपारी व्यापाराचे परवाने मिळवले. यानंतर डमी कंपन्या स्थापल्या. या कंपन्यांनी उत्पादनाची खोटी प्रमाणपत्रे तयार केली. इंडोनेशियातून आणलेल्या सुपारीचे उत्पादन श्रीलंकेचे दाखवले. या माध्यमातून आयात करचाेरी झाली. 

 

नागपूरमध्ये झाली होती काेट्यवधींची सुपारी जप्त
रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या नागपुरातील छाप्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नागपुरात प्रकाश गोयल नावाच्या एका व्यापाऱ्याचे गाेदाम सील करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. याआधी मुंबईच्या फारुख खुरानी या व्यापाऱ्याला पकडण्यात आले होते. 

बातम्या आणखी आहेत...