आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षाने तिकीट दिले नाही तरी जनता कायम माझ्याच पाठीशी ; खडसेंचा सूचक शब्दांतून भाजपला दिला अल्टिमेटम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर - पक्षाने मला तिकीट दिले किंवा नाही दिले, तरीही जनता जनार्दन माझ्या पाठीशी आहे. पक्षातील निष्ठावंतांची अवहेलना करून दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना मंत्रिपद दिले जाते. त्यामुळे झालेला अन्याय आपण महाराष्ट्रभर मांडू. मात्र, एवढे झाल्यावरही भाजपलाच निवडून द्या, असेच सांगतो. पण, सातत्याने अन्याय झाला तर कोणी कोणाचा बांधील नसतो, अशा सूचक शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मनातील खदखद व्यक्त केली. सदस्य नोंदणी अभियान व आगामी विधानसभेच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये भाजपची बैठक पार पडली. त्यात एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचाच आहेर दिला. 
खडसे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप लोकसभेत जिंकली. मात्र, विधानसभेत जिंकण्यासाठी जास्त काम करावे लागते. त्यासाठी सदस्य नोंदणी वाढवा. लोकसभेत मिळालेले मताधिक्य विधानसभेत मिळते, हा भ्रम आहे. शिवाय अपेक्षा वाढल्याने नाराज आणि इच्छुकांची संख्या वाढून निवडणूक कठीण होते. रावेर विधानसभा क्षेत्रात जिंकण्याचे आव्हान आहे. काही इच्छुक उघड, तर काही पडद्याआड आहेत. जो पक्षासाठी आयुष्य घालवतो अशा कार्यकर्त्याने इच्छा व्यक्त करणे गैर नाही. मात्र, पक्षाशी कोणताही संबंध नसलेले अनेक इच्छुक भावी आमदार म्हणून गल्लीबोळात फिरत आहेत. पण रावेर विधानसभेत आमदार हरिभाऊ जावळे हेच भाजपचे उमेदवार राहतील. त्यांनाच आपण निवडून आणू. त्यासाठी माणसे जोडा. प्रत्येक बूथवर पक्ष बांधणी करा, असे एकनाथ खडसे भाषणात म्हणाले.


सत्तेत तरीही पदाचा विजनवास
खडसेंना सुरुवातीला मुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता असतानाच देवेेंद्र फडणवीसांची त्या जागी वर्णी लागली आणि खडसेंच्या पदरी महसूलमंत्रिपद आले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच भोसरी येथील भूखंडप्रकरणी खडसेंवर आरोप झाले आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे सातत्याने ते पक्षावर टीका करत असल्याचे पहायला मिळत आहे.

 

एक दिवस तुम्हीदेखील बाजूला व्हाल
खडसेंनी भाषणात कुणाचाही नामोल्लेख न करता, ४० वर्षांपूर्वी मी लावलेले रोपटे आज मोठे झाले. ते मी तोडणार नाही. मात्र, मी जसा बाजूला झालो, तसेच तुम्हीदेखील एका दिवशी बाजूला व्हाल. मी जमिनीवर राहून काम करतो. त्यामुळे मंत्रिपद गेल्यावर काहीही फरक पडलेला नाही. मात्र, आपण आणलेले प्रकल्प रखडल्याने जिल्ह्याचे नुकसान झाल्याचा अप्रत्यक्ष टोला त्यांनी गिरीश महाजनांना लगावला.