आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिमला मिरचीमधून कृषी अधिकाऱ्याला झाले लाखो रुपयांच्या अपसंपदेचे 'उत्पन्न'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मागील काही वर्षांपासून बिकट आहे. अनेक शेतकऱ्यांचा तर पेरणी व मशागतीचा खर्चही पिकातून वसूल होत नाही. मात्र काही वर्षांपूर्वी दारव्हा तालुक्यात तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या हणमंत गणपती होलमुखे (५६) यांनी त्यांच्या शेतात शिमला मिरची पेरली. त्यांना शिमला मिरचीचे भरघोस 'उत्पन्न' झाल्याचे त्यांनीच उघड चौकशी करणाऱ्या एसीबीकडे मिरची विक्रीचे देयकं सादर केलेत. या अधिकाऱ्यांकडे सुमारे १९ टक्के (सुमारे पावने सोळा लाख ) अपसपंदा असल्याचे उघड झाल्यामुळे अमरावती एसीबीच्या पथकाने सोमवारी (दि. ४) यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा पोलिस ठाण्यात या अधिकाऱ्याविरुध्द अपसंपदेचा गुन्हा दाखल केला.

 

होलमुखे हे ठाणे कृषी सहसंचालक कार्यालयात तंत्र अधिकारी म्हणून कार्यरत अाहेत. ते पाच वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे तालुका कृषी अधिकारी होते. त्याच दरम्यान त्यांच्या मालमत्ते बाबत अमरावती एसीबी कार्यालयात तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीच्या आधारे अमरावती एसीबीचे पोलिस निरीक्षक राजवंत आठवले यांनी होलमुखेंची उघड चौकशी सुरू केली होती. चौकशीत त्यांच्याकडे कायदेशीर मार्गाने येणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत त्यांनी केलेला खर्च व मालमत्ता विसंगत आढळला. होलमुखे यांना अतिरिक्त व विसंगत उत्पन्नाबाबत तपास अधिकाऱ्यांनी विचारणा केली होती. त्यावेळी सांगलीत त्यांच्या मुळ गावी असलेल्या शेतीत शिमला मिरची व अन्य प्रकारची मिरची पेेरली होती. त्या मिरचीमधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले होते. त्या मिरचीच्या विक्रीतून आलेल्या पैशांच्या पावत्यासुध्दा त्यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे सादर केल्या होत्या. त्यामुळे या पावत्यांबाबत एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता या पावत्या बनावट असल्याचे समोर आले. होलमुखे हे १९९३ मध्ये कृषी विभागात रुजू झाले होते. त्यामुळे १९९३ ते २०१४ या २१ वर्षातील त्यांच्या मालमत्तेबाबत चौकशी केली आहे. त्यांच्या एकूण मालमत्तेपेक्षा त्यांच्याकडे सुमारे १५ लाख ७६ हजार ५८ रुपयांची अपसंपदा चौकशी दरम्यान पुढे आली होती. त्या आधारे एसीबी कार्यालयाने वरिष्ठांकडे अहवाल पाठवला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राप्त होताच सोमवारी एसीबीच्या तक्रारीवरून दारव्हा पोलिसांनी होलमुखेंविरुध्द गुन्हा दाखल केला. 

 

मालमत्ता गोठवण्यापुर्वीची प्रक्रिया सुरू 
या प्रकरणात उघड चौकशीअंती गुन्हा दाखल झाला असून आता सखोल तपास करण्यात येणार आहे. तपास पुर्ण झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवण्यात येईल तसेच उघड झालेल्या अपसंपदेतील मालमत्ता गोठवण्यासाठी परवानगी मागण्यात येणार आहे. ही परवानगी मिळताच मालमत्ता गोठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

राजवंत आठवले , पोलिस निरीक्षक, एसीबी, अमरावती. 

 

बातम्या आणखी आहेत...