अमरनाथ यात्रा / १ जुलैपासून सुरू झाली अमरनाथ यात्रा : १४ दिवसांत सुमारे १.८० लाख भाविकांनी घेतले दर्शन

साेमवारी साडेपाच हजार भाविक झाले दर्शनासाठी रवाना, असा आहे अमरनाथचा इतिहास 
 

वृत्तसंस्था

Jul 16,2019 09:45:00 AM IST

जम्मू - जीवनात एकदा तरी भगवान अमरनाथाचे दर्शन घ्यावे, असे प्रत्येक भारतीयाला वाटत असते. त्यामुळे बहुतांश जण काेणत्याही प्रकारे व अनेक अडचणींवर मात करून अमरनाथला जाऊन बाबा बर्फानीचे दर्शन घेतात. दरवर्षी जुलै महिन्यात अमरनाथ यात्रा सुरू हाेते. त्यानुसार या वर्षी १ जुलैपासून ही यात्रा सुरू झाली असून, ती येत्या १५ आॅगस्टच्या श्रावण पाैर्णिमेपर्यंत चालेल. ४५ दिवस चालणाऱ्या या यात्रेत

आतापर्यंत १.८० लाख भाविकांनी अमरनाथाचे दर्शन घेतल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गत १४ दिवसांत १,८२,७१२ भाविकांनी बर्फाच्या पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. तसेच साेमवारी सकाळी ५,२१० यात्रेकरूंचा जत्था दर्शनासाठी भगवतीनगर यात्रेकरू निवासापासून दाेन सुरक्षा दलांच्या ताफ्यासह रवाना झाला. त्यापैकी २,३७२ यात्रेकरू बालटालकडे, तर २,८३८ यात्रेकरू पहलगामकडे गेले, असे पाेलिसांनी सांगितले. बाबा अमरनाथ गुहेत बर्फाचे भव्य नैसर्गिक शिवलिंग तयार हाेते. ते शिवलिंग भगवान शंकराच्या पाैराणिक शक्तींचे प्रतीक मानले जाते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या शिवलिंगाच्या दर्शनास गुहेपर्यंत पाेहाेचण्यासाठी यात्रेकरू लहान १४ किमी लांब बालटाल किंवा ४५ किमी दूर पहलगाम मार्गाने जातात.


या दाेन्ही ठिकाणी असलेल्या आधार कॅम्पमध्ये भाविकांसाठी हेलिकाॅप्टरची सुविधाही आहे. विशेष म्हणजे, ही यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी हिंदू नागरिकांसह स्थानिक मुस्लिम बांधवही सहकार्य करत असतात. तसेच स्थानिक प्रशासनासह केंद्र सरकारतर्फेही यात्रेतील भाविकांना विविध साेई पुरवण्यात येतात.

असा आहे अमरनाथचा इतिहास
या पवित्र गुहेचा शाेध १८५० मध्ये एक मुस्लिम गुराखी बुटा मलिकने लावला हाेता. एका आख्यायिकेनुसार एका सुफी संताने मलिकला काेळशाने भरलेली पिशवी दिली हाेती व नंतर त्या काेळशाचे साेन्यात रूपांतर झाले हाेते. त्यामुळे सुमारे गत १५० वर्षांपासून संबंधित गुराख्याच्या वंशजांना गुहेत अर्पण केल्या जाणाऱ्या वस्तूंमधील (पैसे आदी-चढावा) काही भाग दिला जाताे. ही परंपरा आजही सुरूच आहे.

X
COMMENT