ऑस्ट्रेलिया आग / दर मिनिटाला 2.43 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या अॅमेझॉनच्या मालकाने दान केली इतकी रक्कम, सोशल मीडियावर युजर्सनी केले ट्रोल

  • अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजोस यांची एकुण संपत्ती 8.29 लाख कोटींपेक्षा जास्त आहे
  • युजर म्हणाले - कमाईचा अर्ध्या टक्का दान करणे मदत करण्यापेक्षा प्रसिद्धीची पद्धत असल्याचे दिसते

दिव्य मराठी वेब टीम

Jan 15,2020 11:19:00 AM IST

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियातील आग मदत निधीत 4 कोटी 89 लाख रुपये (6 लाख 90 हजार डॉलर) दान केल्यामुळे अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजोस सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. बेजोसने इन्स्टाग्रामवर ऑस्ट्रेलियातील आग मदत निधीत दान केल्याची घोषणा केली होती. या पोस्टनंतर इन्स्टाग्राम आणि ट्विटर युजर्स म्हणाले की, बेजोस यांनी दान केलेली रक्कम त्यांच्या पाच मिनिटांच्या कमाई इतकी आहे.


बेजोस यांच्याकडे 8.29 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांची कंपनी अॅमेझॉनचे मूल्य 66.32 लाख कोटी रूपये आहे. ब्लूमबर्ग मिलनिअर इंडेक्सच्या मते बेजोस यांच्या नेटवर्थमध्ये सोमवारी 3494 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या हिशोबाने त्यांची प्रति मिनिटाची कमाई 2.43 कोटी होते. नेटवर्थमधील बदल शेअर्सच्या मूल्यातील चढउतारांवर आधारित असते.


बेजोसने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले की, "जीवघेण्या आगीशी झुंज देत असलेल्या नागरिकांसोबत आमच्या संवेदना आहेत. अॅमेझॉन संकटग्रस्त राज्यांना 10 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्सची मदत करत आहे. अॅमेझॉनचे ग्राहक म्हणून तुम्ही कशाप्रकारे मदत करता येईल यावर विचार करा."

सोशल मीडिया युजर्स म्हणाले - कमाई पुढे दान काहीच नाही

> एका युजरने लिहिले की, जगभरातून ऑस्ट्रेलियासाठी 7 कोटी रुपये गोळा करण्यात आले आहेत. बेजोस यांनी इतकी रक्कम एकट्याने दान केली असती तरी त्यांच्याकडे 8 लाख कोटींपेक्षा जास्त संपत्ती राहिली असती.

> दुसऱ्या युजरने बेजोस यांची इतर धनाढ्य लोकांसोबत तुलना करत म्हटले की, बेजोस यांनी दान केलेली रक्कम त्यांच्या व्यवसायाच्या तुलनेने काहीच नाही. एक युजर म्हणाला की, बेजोससाठी ही रक्कम दान करणे म्हणजे दोन डॉलर दान केल्यासारखे आहे.

> आणखी एका युजरने म्हटले की, कोणतीही रक्कम धर्मादाय संस्थांना महत्त्वाची वाटते, पण तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात आणि कमाईचा अर्ध्या टक्का दान करणे मदत करण्यापेक्षा प्रसिद्धी पद्धत असल्याचे दिसते


X
COMMENT