Amazon / अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांचे प्राइम-डेवर जगभरात प्रदर्शन, जर्मनीत 2 हजार कर्मचारी संपात सहभागी, अमेरिकेत 6 तास काम बंद

कामासाठी वातावरण खराब असल्याने कर्मचाऱ्यांची निदर्शने

दिव्य मराठी

Jul 17,2019 12:56:00 PM IST

न्यूयॉर्क - जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने १५ आणि १६ जुलै रोजी वार्षिक प्राइम-डेचे आयोजन केले होते. अॅमेझॉन प्राइम-डेनिमित्त विक्री होणाऱ्या अनेक उत्पादनांवर मोठी सूट आणि बँका ऑफर देतात. मात्र, यंदा कंपनीसाठी यात अडचणी आल्या.


जगभरातील अनेक देशांत अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. काम करताना त्रासदायक वातावरणाविरोधात ही निदर्शने करण्यात आली. कंपनीला सर्वाधिक त्रास जर्मनीमध्ये झाला. तेथील सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. अमेरिकेत मिनेसोटा सेंटरवरील कर्मचाऱ्यांनी सहा तास काम बंद ठेवले होते. इंग्लंडमध्ये आठवडाभर निदर्शने करण्यात येणार आहेत.


प्रत्येकी ८ सेकंदांत एक वस्तू उचलावी लागते
विदेशी मीडियामधील वृत्तानुसार अॅमेझाॅनचे अनेक कर्मचारी सध्या अडचणींचा सामना करत आहेत. काही केंद्रावर एका कर्मचाऱ्याला प्रत्येक तासाला ३३२ वस्तू उचलाव्या लागतात. म्हणजेच प्रत्येक आठ सेकंदांत एक वस्तू उचलावी लागते. कामाचा कालावधीही १०-१० तासांचा झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनुसार यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे त्यांना दुखापत होण्याचीही भीती असते.


आम्ही मनुष्य आहोत, एखादा रोबोट नाही
ब्रिटनमधील कर्मचारी संघटनेने एक आठवडाभर चालणाऱ्या निदर्शनांची घोषणा केली आहे. कामावर येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला लिफाफा देऊन विरोध करण्याच्या पद्धतीची माहिती देण्यात आली आहे. संघटनेचे मिक रिक्स यांनी सांगितले की, ‘आम्ही मनुष्य आहोत रोबोट नाही, हे अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजो यांनी समजून घ्यावे. त्यांनी आमच्याशीही चर्चा करावी. कंपनीसोबतच कर्मचारी हितही जोपासले पाहिजे.’


अॅमेझॉनकडे ६.३ लाख कर्मचाऱ्यांची संख्या
अॅमेझाॅनसाठी जगभरात एकूण ६.३ लाख कर्मचारी काम करतात. यामध्ये अर्धे कर्मचारी अमेरिकेत आहेत. ब्रिटनमध्येही कंपनीचे २९ हजार कर्मचारी आहेत. अमेरिकेत कंपनी कर्मचाऱ्यांना प्रतितास किमान १५ डॉलर देते, तर ब्रिटनमध्ये हा दर ९.५० पाउंड आहे. भारतात अॅमेझॉनचे सुमारे ५० हजार कर्मचारी काम करतात. भारतामध्ये किमान पगार वेगवेगळ्या राज्यासाठी वेगवेगळा निश्चित करण्यात आलेला आहे.

X