कर्ज फेडण्यात अपयशी / कर्ज फेडण्यात अपयशी अंबानींची 'आरकॉम' दिवाळखोरीच्या तयारीत; कंपनीवर विविध बँकांचे 46,000 कोटींचे कर्ज 

Feb 03,2019 09:12:00 AM IST

नवी दिल्ली- भांडवलाच्या संकटात सापडलेली अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) त्यांची संपत्तीची विक्री करूनही कर्ज फेडण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे कंपनीच्या संचालक मंडळाने आयबीसीअंतर्गत एनसीएलटीच्या माध्यमातून दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्याचा पर्याय निवडला आहे. हा निर्णय सर्वच पक्षांचा हिताचा ठरेल, असे मत संचालकांनी व्यक्त केले आहे. यामुळे २७० दिवसांच्या कालावधीत आरकॉमची संपत्ती विकून कर्ज फेडण्याची पारदर्शी प्रक्रिया निश्चित होऊ शकेल. आरकॉमवर ४६,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे.

आरकॉमच्या वतीने शुक्रवारी एका प्रसिद्धिपत्रकात ही माहिती देण्यात आली. यानुसार कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवारी आरकॉमची संपत्ती विकून कर्ज फेडण्याच्या योजनेचा आढावा घेतला. यामध्ये १८ महिन्यांनंतरही या प्रस्तावित योजनेतून कर्जदात्यांना काहीच मिळाले नसल्याचे समोर आले आहे. ही योजना दोन जून २०१७ रोजी बनवण्यात आली होती.

संपत्तीच्या विक्रीतून २५,००० कोटी रुपये मिळण्याची आरकॉमला अपेक्षा होती. ४० कर्जदात्यांना त्यांची थकीत रक्कम देण्यासाठी या रकमेचा वापर करण्याचे कंपनीचे नियोजन होते. तर, आरकॉम मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओलाही स्पेक्ट्रम विक्री करण्यास अयशस्वी ठरली. आरकॉमच्या स्पेक्ट्रम विक्री करून कंपनीला ९७५ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा होती. यातील ५५० कोटी रुपये इरिक्सनला, तर २३० कोटी रुपये रिलायन्स इन्फ्राटेलला देण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. मात्र, अशी थकीत रक्कम देण्याची जबाबदारी घेण्यास जिओने नकार दिला, कारण भविष्यात दूरसंचार विभाग त्याची जबाबदारी आरकॉमवर टाकू शकतो.

इरिक्सनचा दिवाळखोरीसाठी अर्ज
स्वीडनची दूरसंचार उपकरणे निर्माता कंपनी इरिक्सनने आरकॉमच्या विरोधात दिवाळखोरी कायद्यांतर्गत प्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादात (एनसीएलटी) याचिका दाखल केली होती. आरकॉमने केलेल्या विनंतीवरून दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्यास एनसीएलटीने कंपनीला सवलत दिली होती.

X