आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नको, असे डॉ. आंबेडकर कधी म्हणालेच नव्हते...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नको, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कधी म्हणालेच नव्हते, असा दावा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला. आता तर संसदेतच सवर्णांना आरक्षणाचा कायदा मंजूर झाला आहे. त्यामुळे हा कायदा आणि मोदी दोन्हीही टिकतील. ओबीसींची लोकसंख्या ५२ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने त्यांच्या आरक्षणाचा कोटा १० टक्क्यांनी वाढवून देण्याचा प्रस्ताव रिपाइंतर्फे केंद्र सरकारला दिला आहे. येत्या अर्थसंकल्पात आणखी भरीव घोषणा होतील, असे ते म्हणाले. 


सोमवारी (१४ जानेवारी) सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आधी शरद पवार मराठा समाजाचे आरक्षण टिकणार नाही, असे म्हणत होते. पण आता कायदाच झाल्याने सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. भटक्या विमुक्तांना राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. उत्तर प्रदेशातील सपा - बसपा युतीचा भाजपवर काहीही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आम्ही २ ते ३ जागांचा प्रस्ताव दिला आहे. 
येत्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर होतील.महाराष्ट्रात लोकसभेच्या दोन जागा हव्या आहेत. त्यापैकी दक्षिण मध्य मुंबईची जागा शिवसेनेकडे आहे. शिवसेना-भाजपचे नेमके काय होते ते निश्चित झाल्यावर या जागेसाठी मी आग्रही राहणार आहे. दुसरी जागा कुठली हवी, हे अद्याप ठरवलेले नाही. सेना-भाजप युती झाली तर आमच्या मदतीने महाराष्ट्रातील ४४ जागा जिंकता येतील. युती झाली नाही तर भाजपला रिपाइंच्या पाठिंब्यावर ३५ जागा मिळतील. झारखंड येथील दामोदर नदीच्या खोऱ्यात डॉ. आंबेडकरांनी सात धरणे बांधली. त्यामुळे मॅमल डॅम येथे त्यांचा पुतळा उभारावा, या मागणीसाठी १८ जानेवारीला धनबाद (झारखंड) येथे मेळावा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या वेळी प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, अनिल गोंडाणे, पप्पू कागदे आदींची उपस्थिती होती. 


ज्यांना असहिष्णुता वाटते, त्यांनी मला येऊन भेटावे 
भारतात असहिष्णुतेचे वातावरण नाही. सगळे गुण्यागोविंदाने राहत आहेत. ज्यांना असहिष्णुता वाटते, त्यांनी मला येऊन भेटावे. त्यांच्या सर्व शंका दूर करेन, असे आठवले यांनी सांगितले. 
 


आंबेडकरांनी यावे, त्यांना मंत्रिपद देऊ 
प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबत स्थापन केलेली वंचित बहुजन आघाडी फक्त वंचित नेत्यांचीच आहे. वंचित लोक आमच्यासोबत आहेत. कारण वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठीच आंबेडकरांनी आघाडी केल्याचे लोकांना कळले आहे. त्यांच्या आघाडीचा भाजपला अप्रत्यक्ष फायदा होणार आहे. त्यामुळे आंबेडकरांनी आमच्यासोबत यावे. त्यांना आम्ही मंत्रिपद देऊ, असेही आठवले म्हणाले. 


१० फेब्रुवारीला औरंगाबादेत मेळावा 
दोन महिन्यांपूर्वी आंबेडकरांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना निमंत्रित करून औरंगाबादेत जबिंदा लॉन्सवर वंचित बहुजन आघाडीचा मेळावा घेतला होता. आम्ही १० फेब्रुवारीला फक्त मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा त्याच ठिकाणी घेणार आहोत. त्यात आमच्यासोबत किती लोक आहेत ते जगाला कळेल, असा दावा आठवलेंनी केला. 


 

बातम्या आणखी आहेत...