आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकर पार्क, मायावती आणि दलित इतिहास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दलितांचा संघर्षमय आणि उत्कर्षकारी इतिहास बाबासाहेब आंबेडकरांपासून सुरु होतो, जसे दलित विचारधारा, साहित्य आणि वास्तुरचना सुद्धा! त्यासाठी लागणारा पैसा व ताकद आतापर्यंत नव्हतीच कधी आणि आता राजकीय सत्ता काबीज केल्यावर एखादी मायावती ते करु पाहील, तर आपला कोण विरोध....
 

लखनौला गेलो म्हणजे, बडा इमामबाडा, टुंडे कबाब हे आलेच. आता या अविस्मरणीय गोष्टींत भर पडली आहे ती म्हणजे, मायावती मुख्यमंत्री असताना उभारलेल्या आंबेडकर पार्कची! मुंबई, दिल्लीत त्यावर तिखट प्रतिक्रिया ऐकू येतात. "काय ते हत्तीच हत्ती. किती ती जागा फुकट घालवलीय. आणि पैसादेखील. त्यापेक्षा गरिबांचा उद्धार केला असता थोडा. स्वतःचेच पुतळे उभारुन ठेवलेत - मायावती आणि तिची पर्स! हाऊ फनी!’


आता या जनतेला कसं समजवणार की पर्स घेतलेली, सोन्याचे दागिने घातलेली दलित बाई म्हणजे, किती क्रांतिकारी गोष्ट आहे? पर्स म्हणजे आर्थिक सबलता, उद्याची शाश्वती, अंगतोड मेहनत आणि हिणवणूक यांतून सुटका. नाहीतर दलित बाई म्हणजे, चिखलात माखलेली, घामाने थबथबलेली, डोक्यावरुन मैला वाहणारी अशीच आपली संकल्पना असते, नाही का? घाणीत काम करणारा माणूस म्हणजे, घाणेरडा असे समीकरण आपण मानतो. आंबेडकरांनी आपल्या बंधू-भगिनींना ‘नेटके रहा, स्वच्छ नेसा’ सांगितले ते हीच हीनतेची कल्पना बदलण्यासाठी. एकदा महिलांच्या परिषदेला ते अध्यक्ष म्हणून आले, आणि सद््गदीत होऊन म्हणाले, "माझ्या भगिनी किती छान तयार होऊन आल्या आहेत. त्यांना बघून मला भरुन आले आहे. कोण म्हणेल यांना म्हारणी?’


लखनौला आंबेडकर पार्कमध्ये गेल्यावर असेच वाटले, व्वा, काय भव्य, सुंदर, कलात्मक जागा उभारली आहे. प्रवेशद्वारातून आत जातो, तर व्याप्ती बघूनच डोळे दिपले. मोठ्या प्रांगणात अनेक वास्तू - उंच खांबवर अशोकचक्र आणि सिंह, बोनसाय झाडांच्या रांगा, दगडा, हत्तींच्या रांगा. आणि समाजसुधारकांचे पुतळे आणि त्यांच्या कार्याची सखोल माहिती. आंबेडकरांचा जीवनपट उलगडतो, तसाच महात्मा फुले, शाहू महाराज, बिरसा मुंडा, संत रविदास, कबीर, गौतम बुद्ध सगळेच आपल्याला भेटतात. ज्या कोणी जातिअंताचे, स्त्री उद्धाराचे, नवीन जीवनप्रणालीचे धडे दिले, अशा सर्वांची कधी शाळेच्या पुस्तकांत झाली नाही, ती ओळख इथे होते. पुतळ्यांच्या मागे मोठमोठ्या पाट्यांवर पुण्यात मुलांना शिकवणारे फुले पतीपत्नी भेटतात, तर सायकलवर उत्तर प्रदेशांत प्रचारासाठी फिरणारे कांशीरामही. उत्तर भारत ते दक्षिण भारत अशी परिवर्तनाची सहलच आपल्याला घडते. वास्तू व पुतळे यांसोबत आपल्या इतिहासाची माहिती बहुजन जनतेला शब्दां-निबंधाद्वारे पोचवण्याचा हा प्रयत्न आहे. शेवटी इतिहास म्हणजे, काय असतो? आपण कोणाचे वंशज आहोत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न. पण या देशात दलितांना कुठे आहे इतिहास?


आपण इंका, (पेरू देशात १३व्या शतकाच्या प्रारंभी बहरलेली संस्कृती) हडप्पा, मेसेपोटेमिया इथे संस्कृती होती, हे कसे जाणतो? त्यांच्या संस्कृतीचे अवशेष सापडतात म्हणून ना. पण जिथे गावातून घोडीवर वरात नेण्यास बंदी आणि सिमेंटची घरे बांधण्यास मज्जाव, तिथे भौतिक अंगाने संस्कृती (material culture) तयार कशी होणार? एखादी भव्य वास्तू, पुतळे, मंदिरे, किल्ले बघून हा आपला इतिहास आहे, आपली गोष्ट सांगतोय, आपण याचा वारसा चालवतोय, असे वाटावे असे दलित बहुजनांचे काय सापडते? जो काही इतिहास वारसा सांगावा दाखवावा, तो फक्त उच्चवर्णीयांनीच-राजपुतांच्या हवेल्या, ब्राम्हणांची मंदिरे, मराठ्यांचे किल्ले. राहता राहिले मांगीराचे देऊळ. गावात नवीन विहीर किंवा वेशीची मोट बांधायला घेतली, की प्रथम एका तरुण मांगाचा बळी देण्याची प्रथा होती, मग त्याच्या नावाचे मंदिर बांधत. असा हा क्रूर इतिहास. 


दलितांचा संघर्षमय आणि उत्कर्षकारी इतिहास बाबासाहेब आंबेडकरांपासून सुरु होतो, जसे दलित विचारधारा, साहित्य आणि वास्तुरचनासुद्धा! त्यासाठी लागणारा पैसा व ताकद आतापर्यंत नव्हतीच कधी आणि आता राजकीय सत्ता काबीज केल्यावर एखादी मायावती ते करु पाहिल, तर आपला कोण विरोध. शिवाजी आणि पटेलांच्या समुद्रातील पुतळ्यांना मात्र आपण "देशप्रेम’ म्हणून माफ करत असतो. आता तर बाळ ठाकरेंचे शंभर कोटींचे स्मारकही बनेल. पण भीमा  कोरेगावच्या स्तंभाला आणि तिकडच्या जत्रेला मात्र देशद्रोह ठरवून आपण मोकळे होतो. देशाची अन् प्रेमाद्रोहाची ही अजबच कल्पना आहे. पेशवाई काय होती?  महारांनी म्हणे सूर्य मावळल्यावर शहरांत रहायचे नाही. रस्त्यावरुन चालताना गळ्यात मडके आणि कमरेला झाडू बांधून जायचे, म्हणजे थुंकी, पावलांच्या खुणा रस्त्यात रहायला नको. अशा पेशव्यांची सत्ता जावी म्हणून महार बटालियन भीमा कोरेगावच्या लढाईत ब्रिटिशांच्या बाजूने लढली यात आश्चर्य काय? आणि त्यावेळच्या आपल्या विजयाचा आणि जोखडातून मुक्तीचा आनंद महारांनी आज का साजरा करु नये? तर त्यांच्या समारंभात बाधा आणून, दंगली करुन वर  त्यांनाच अटक करण्याचे प्रकार म्हणजे स्वतंत्र भारतातही पेशवाई जिवंत असण्याचे द्योतक नाही का?


महाराष्ट्रातील आणखी एक दलित ऐतिहासिक जागा म्हणजे दादर चैत्यभूमी, महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेचे हे पंढरपूरच्या म्हणा. दर वर्षी ६ डिसेंबरला राज्याच्या कानाकोपऱ्यातून बायाबापड्या, पोरे-टोरे भाकरी बांधून मुंबईत दादर चौपाटीवर पोचतात. शिवाजी पार्कला यात्रेचे स्वरुप येते. आणि मग उच्चवर्णीय मध्यमवर्गाचा पारा चढतो. अत्यंत कुत्सितपणे "आंबेडकर जमलेत’ अशी संभावना करत, नाके मुरडत, हे लोक कसे गलिच्छ आहेत, कसा संडास बनवतात "आमच्या’ परिसराचा अशी यथेच्छ चर्चा होत रहाते. पण जर कधी त्या जत्रेतून फेरफटका मारलात तर अनेक दुर्मिळ पुस्तके, गाण्यांच्या कॅसेट, शाहिरी, पोवाडे सापडतील. लोकांशी गप्पा केल्या, तर दिसेल की तळागाळातला समाजात कसे क्रांतिकारी वारे वाहू लागले आहेत. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार यांबद्दल जागरुकता आलीय. "जग बदल घालूनी घाव, सांगून गेले आम्हा भीमराव’ हे खालपर्यंत पोचलंय.


अशा सर्व श्रद्धास्थळांमध्ये आता लखनौचे आंबेडकर पार्क जाऊन बसलंय. आम्ही मुख्य इमारतीतून बाहेर येत असताना, आम्हाला मराठी बोलणाऱ्या, दिसणाऱ्या लोकांचा मोठा ग्रूप भेटला. त्यांनी चपला बाहेर काढून ठेवल्या आणि अनवाणी चालत ते आत गेले. माझा नवरा मला म्हणाला, "आता मला लाज वाटतेय. असे कसे बूट घालून आपण आत गेलो, बेदरकारपणे?’ मी त्या लोकांना सामोरी गेले व म्हटले, "जय भीम. कुठून आलात तुम्ही भाऊ?’ तर खुशीत सगळा ग्रुप जमला. "आपल्या गावचे’ लोक दूरदेशी भेटल्याच्या आनंदात गप्पा झाल्या. तीर्थाटनास नांदेडहून बसने निघाले होते, पन्नास लोक-मुले बाळे, बाया बापड्या. देशभरातील अनेक जागा-मुंबई व नागपूर चैत्यभूमी, नालंदा विद्यापीठ, सारनाथचे स्तुप, बोधगया, लखनौचे आंबेडकर पार्क. इतकेच नव्हे तर अगदी नेपाळमधील लुंबिनीदेखील. बरोबर शिधा. जेवण बनवायला आचारी. दोन-तीन आठवडे असे फिरणे. बौद्ध धर्म व आंबेडकरांचा इतिहास - म्हणजे धार्मिक व राजकीय अशी एकत्र यात्रा. तरीही धार्मिक यात्रेकरु व यांच्यात मला प्रकर्षाने फरक जाणवला. जुनाट अंधश्रद्धा व नवीन स्फुल्लिंग यातला फरक. उदा. मला एका बाईने विचारले, "ताई, तुम्हाला लेकरे?’ मी म्हटले, "दोन लेकी’ ती म्हणाली, "आणि मुलगा?’ मी हसले, म्हणाले, "बाबासाहेबांनी काय सांगितले? आपल्या लेकींना शिकवा, मोठ्या करा. मुलाची आस कशाला?’ तर साऱ्या बायका म्हणाल्या, "ते बाकी बरोबर आहे ताई.’ माझ्या मनात आले, दिल्लीत उच्चभ्रु बायका असेच प्रश्न विचारतात. पण असे उत्तर मी तिथे देऊ शकत नाही. कारण परिवर्तनाची आस असलेला माणूसच नसतो तिथे!


माझा नवरा आसपास घोटाळत होता. माझे नवीन मित्र म्हणाले, हे यजमान वाटते? तर तो पुढे आला व हात जोडून म्हणाला, नमस्ते. ते हसले, "हे जय भीमवाले दिसत नाही’ मी उत्तरले, "हो ना. हे तेलंगाणाचे रेड्डी. नमस्कारमवाले. मी मात्र जय भीमवाली आहे’ असे माझे भाऊबंद मला लखनौला भेटले. आमच्या "बाबाने’ आमचे नाते तयार केले. आणि आता मायावतींनी खेळायला अंगण बांधले. तुम्ही नाही का, कोजागिरीला गावच्या वाड्यावर जमता? आणि सर्व कुटूंब एकत्र बसून आजोबाच्या गोष्टी ऐकता?


तिथून निघताना संत रविदासच्या कवितेची आवर्जून आठवण झाली.
"एक शहर आहे, ज्याचे नाव बेगमपुरा. जिथे दुःख नाही. ना वेदना. तिथे ना सारा, ना संपत्ती. ना चिंता, ना चोरी मोरी, ना दहशत ना छळ. इथे मी पोचलो आता, हेच माझे खरे घर. इथे खुशहाली आणि मुबलकता. इथे सर्व समान, ना कोणी दुसरा ना तिसरा. सगळीकडे आम्ही फिरतो, स्वतंत्र. आम्हाला कोठे नाही आडकाठी. रविदास म्हणे, मी ढोर आता मुक्त. माझ्या सोबत चालणारे सर्व माझे भाऊबंद.’


पंधराव्या शतकात वाराणसीत एका दलित संताने लिहिलेली कविता. ज्यात स्वप्नांची नगरी आहे बेगमपुरा! एका मुस्लिम महिलेची, राणीची राजवट. ज्यात सर्वजण मुक्त, स्वच्छंद बागडत आहेत. अशी बेगम स्वतंत्र भारतात कुठून आणावी? गांधींच्या स्वप्नानुसार एका दलित महिलेला पंतप्रधान बनण्याची संधी मिळेल का कधी? मायावती तयार आहेत. पण आपण?

 

संपर्क- divyamarathirasik@gmail.com
 

बातम्या आणखी आहेत...