आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅमेझॉन कंपनीला गंडा; तिघे ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- ग्राहकांना ऑनलाइन खरेदीची संधी देणाऱ्या अॅमेझॉन या कंपनीला मोबाइल व इतर वस्तूंच्या खरेदीतून गंडा घालणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात शहरातील दोघे तर नाशिकमधील एकाचा समावेश आहे. शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठे नेटवर्क समोर येणार आहे. या प्रकरणी शहर पोलिसांत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 


अॅमेझाॅन कंपनीला गंडा घातला जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस टोळक्याच्या मागावर होते. एका कारमधून हे टोळके फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शोध घेत पोलिसांनी कार (एमएच ०५/ सी व्ही ३३९८) अडवली. यामध्ये बसलेल्या तिघा तरुणांना विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस ठाण्यात आल्यावर या कारची झडती घेण्यात आली. यानंतर पाेलिसांनी बोलते केल्यावर ऑनलाइन पद्धतीने मोबाइल खरेदी केल्यावर गंडा घातला जात होता. यातून आतापर्यंत लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला. त्यासाठी काही नागरिकांचे खोटे नाव व पत्ते दिले जात होते. तर कारने आवश्यक ठिकाणी वेळेत पोहाेचण्यासाठी उपयोग केला जात होता. अशी माहिती दिली आहे. त्यावरून या तिघा तरुणांविरुद्ध शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू हाेते. तर पोलिसांनी याबाबत अॅमेझॉन कंपनीशी संपर्क साधून कळविले. सायंकाळपर्यंत या कंपनीचा अधिकारी शहरात आला नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या टोळक्याकडे चौकशीतून मोठे रॅकेट देखील समोर येऊ शकते. शिवाय यापूर्वी नाशिक, पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये अशाच पद्धतीने गंडा घालण्याचे प्रकारही समोर येऊ शकतील. त्यामुळे धुळे शहर पाेलिसांनी या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचे ठरविले आहे. 


अशी करण्यात यायची फसवणूक... 


ऑनलाइनने महागडे मोबाइल खरेदी केले जायचे. शिवाय रक्कमही दिली जायची. त्यासाठी खोटे नाव व पत्ता सांगितला जात असे. कंपनीकडून मोबाइलचे पार्सल अाल्यावर हातचलाखीने महागडा मोबाइल काढून दुसरा ठेवला जात असे. यानंतर कंपनीकडे तक्रार करून पैशांची मागणी केली जात होती. खोटे नाव व पत्त्यावर जाण्यासाठी कारचा उपयोग केला जात होता. 
 

बातम्या आणखी आहेत...