आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांनी टाळली उद्धव यांची भेट; भाषणात मात्र केला एनडीएचा उल्लेख

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी दिवसभर मुंबईत होते. भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत साशंकता व्यक्त होत असताना त्यांनी या दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट न घेतल्याने युती तुटते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शहांनी उद्धव यांची भेट टाळली, भाषणात मात्र राज्यात एनडीएची सत्ता येईल, असे वक्तव्य करत भाजपकडून युती निश्चित असल्याचे संकेत दिले. परंतु, आगामी काळात शिवसेनेमुळे युती तुटलीच तर ते खापर शिवसेनेवर फोडण्याचा मार्ग त्यांनी या प्रकारे मोकळा करून ठेवला.


लोकसभेच्या वेळी स्वतः शहांनी मतभेद दूर झाल्याचे सांत विधानसभा एकत्र लढवणार, असे म्हटले होते. त्यानुसार विधानसभेसाठी सेना-भाजप युतीच्या नेत्यांची जागावाटपावरून चर्चा सुरू झाली. परंतु भाजप स्वतःला मोठा भाऊ समजू लागल्याने सेनेला कमी जागा देण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आणि आता युतीत पुन्हा तणाव अाहे.

शहा म्हणाले...
भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन भाजप सरकारने काश्मीरमध्ये कलम ३७० का हटवले याची माहिती द्यावी.
कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला शरद पवार आणि राहुल गांधी यांचा विरोध आहे की समर्थन, हे त्यांनी राज्यातील जनतेला सांगावे.
जवाहरलाल नेहरू यांनी युद्धबंदीची घोषणा केली नसती तर व्याप्त काश्मीर (पीओके) भारताचा भाग राहिला असता.

... म्हणे नियोजनात नव्हते : उद्धव यांची भेट टाळल्याबाबत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की शहा यांच्या या मुंबई दौऱ्यात उद्धव ठाकरे ठाकरेयांच्या भेटीचा कार्यक्रम नव्हता.

घटस्थापनेचा मुहूर्त
मागील वेळी घटस्थापनेच्या दिवशीच युती तुटली होती. या वेळी घटस्थापनेच्या दिवशी युतीची घोषणा केली जाईल, असे सांगितले जात असताना अमित शहा यांनी उद्धव यांची भेट टाळल्याने वेगळेच चित्र समोर येण्याची चिन्हे आहेत.
यावर उद्धव ठाकरेच बोलतील... : शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, मी काहीही प्रतिक्रिया देऊ शकणार नाही. कारण मला याची काहीच माहिती नाही. यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच अधिकृत प्रतिक्रिया देऊ शकतील.

महाराष्ट्रात एनडीएलाच मिळेल प्रचंड बहुमत
महाराष्ट्रात तीन चतुर्थांश बहुमत मिळवून एनडीएचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास शहा यांनी येथे व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत या जनतेने एनडीएला बहुमत दिले होते. आता ही जनता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदी बसवणार आहे, हे स्पष्ट होत असल्याचे शहा म्हणाले. दरम्यान, यातून शहांनी प्रथमच फडणवीस यांच्या रुपाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणला.

असाही कयास...
अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरून बोलणी झाली असतील आणि युतीबाबत देवेंद्र फडणवीस तसेच उद्धव घोषणा करणार असल्याने शहा यांनी त्याबाबत थेट बोलण्याचे टाळले असावे, असा कयासह काही सूत्रांनी व्यक्त केला.
 

बातम्या आणखी आहेत...