Election / महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपर्यंत अमित शहाच भाजप अध्यक्ष, 6 महिन्यांनंतर होणार अंतर्गत निवड

येत्या काही महिन्यात महाराष्ट्रासह झारखंड आणि हरियाणात निवडणूक

दिव्य मराठी वेब

Jun 13,2019 05:59:00 PM IST

नवी दिल्ली / मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तूर्तास भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष पदावरच राहतील. विधानसभा निवडणुकीनंतर नवीन अध्यक्षाची निवड अंतर्गत चर्चेतून केली जाणार आहे असे भाजप नेते भूपेंद्र सिंह बघेल यांनी स्पष्ट केले. येत्या काही महिन्यात महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणात विधानसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक यश मिळाले. तरी काही राज्यांमध्ये भाजपचा प्रभाव कमी असल्याचे दिसून आले आहे. त्या सर्वच राज्य आणि भागांपर्यंत भाजपला पोहोचवणार असे शहा यांनी म्हटल्याची आठवण बघेल यांनी गुरुवारी करून दिली आहे.


भाजपमध्ये अध्यक्ष पदावर तीन वर्षांसाठी निवड केली जाते. भाजपच्या पक्षांतर्गत कायद्यानुसार, तो कार्यकाळ आणखी 3 वर्षाने वाढवता येतो. अमित शहा यांचा भाजपच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ यावर्षीच संपुष्टात आला. परंतु, लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना पक्षश्रेष्ठींनी पदावर कायम राहण्याचा आग्रह केला. लोकसभा निवडणुकीत भाजपला 300 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. या अभूतपूर्व यशाचे संपूर्ण श्रेय भाजप अध्यक्ष अमित शहांना दिले जात आहे. पक्षांतर्गत त्यांच्या धोरण आणि व्यूहरचनेचे कौतुक केले जात आहे. त्याच स्वरुपाची प्लॅनिंग भाजपला विधानसभा निवडणुकीत करावी लागणार आहे. त्यामुळे, तूर्तास अमित शहा अध्यक्ष पदावर राहणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, भाजपच्या विजयाचे नायक असलेले अमित शहा यांना केंद्रात गृहमंत्रालय देण्यात आले आहे. तेव्हापासूनच अमित शहा दोन-दोन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी वेळ देऊ शकणार नाहीत आणि त्यांच्या जागी नवीन भाजप अध्यक्षाचा शोध सुरू आहे अशी चर्चा उडाली होती.

X
COMMENT