आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लातूर - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे गेले चार दिवस अख्खे लातूर भाजपमय झाले होते. सगळे नेते एकदिलाने अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीसाठी झटत होते. परंतु सत्तेच्या गेल्या चार वर्षांत भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष वाढला आहे. प्रमुख नेत्यांमधील सुंदोपसुंदीमुळे पक्ष आतून पोखरत चालला आहे. अमित शहांसमोर उत्तम अभिनय करीत सगळ्या नेत्यांनी कार्यक्रमाची वेळ मारून नेली असली तरी प्रत्यक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत ही एकी राहणार का, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. अगदी अलीकडेपर्यंत लातूरमधली भाजप ही काँग्रेसची बी टीम म्हणून ओळखली जायची. परंतु भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने लातूरमधील भाजपची सूत्रे संभाजी पाटील निलंगेकरांच्या हाती दिली. तोपर्यंत लातूरमधील देशमुख परिवाराशी जुळवून घेणारे संभाजी निलंगेकर आक्रमकपणे निवडणुकांच्या मैदानात उतरले आणि जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांना कौल दिला.
नगर पालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका अशा सगळ्याच निवडणुकांत भाजपची सरशी झाली. ही शक्तिस्थाने भाजपकडे आल्यानंतर खरेतर पक्ष मजबूत होणे अपेक्षित होते. परंतु सत्ता येताच भाजपत सुंदोपसुंदी सुरू झाली. गेल्या चार वर्षांच्या काळात नेत्यां-नेत्यांमधील अंतर वाढत गेले. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या एकला चलो रे च्या भूमिकेमुळे त्यात भर पडत गेली. त्यामुळे निलंगेकर, खा. गायकवाड, आ. भालेराव, रमेश कराड, अभिमन्यू पवार, शैलेश लाहोटी असे प्रत्येक नेत्यागणिक गट पडत गेले. आगामी निवडणुकीत एकमेकांना पाडण्यासाठीची तयारी सुरू झाल्याच्या चर्चाही खुलेआम केल्या जात आहेत. संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्थानिकांची मोट बांधून शहांचा कार्यक्रम यशस्वी केला. या निमित्ताने त्यांनी बांधलेली मोट लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिली तरी भाजपला यश मिळू शकते. परंतु ती किती एकसंध राहील, याविषयी साशंकता आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.