आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे विरुद्ध ठाकरंेचा वाद 'वर्षा'वर पोहोचला; अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गणेश मंडळांना मंडप टाकण्यासाठी महापालिकेकडून घ्याव्या लागणाऱ्या परवानगीचा वाद रविवारी मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचला. गणेश मंडळांच्या शिष्टमंडळासह राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी 'वर्षा' बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. गणेशोत्सव उत्साहात साजरा करा, कायदेशीर अडचणी येणार नाहीत यासंदर्भात सर्व काळजी राज्य सरकार घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिले. 


महापालिका प्रशासन मुंबईतील गणेश मंडळांना मंडपासाठी परवानगी देताना नाहक त्रास देत आहे, अशी तक्रार अमित यांनी या वेळी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना फोनवर संपर्क साधला. मुंबईतील गणेशोत्सव मंडळाच्या मंडपासंदर्भात काही सूचनाही त्यांनी आयुक्तांना दिल्या. गणेशोत्सव मंडळांना उत्सवादरम्यान कुठल्याही अडचणी येणार नाहीत, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी अमित ठाकरेंना दिली. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची म्हणजेच ठाकरे घराण्यातील थोरली पाती (उद्धव ठाकरे) यांची सत्ता आहे. त्याच महापालिकेविरोधात रविवारी ठाकरे घराण्यातील धाकली पाती (राज यांचे चिरंजीव) अमित यांनी मुख्यमंत्र्यांकडे चक्क गाऱ्हाणे घातले. ही तक्रार पालिका प्रशासनाविरोधात असली तरी तिचा रोख सत्ताधारी शिवसेनेविरोधातच होता. 


पालिकेकडून ऑनलाइन परवानगी 
वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशाच मंडपांना परवानगी देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा दंडक आहे. त्यामुळे अनेक मंडळांना परवानग्या मिळणे मुश्कील झाले आहे. मुंबईत १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून महापालिका मंडपांना आॅनलाइन परवानगी देते. 


गणेश मंडळांनी घातले होते राज ठाकरेंना साकडे 
मुंबईतील गणेश मंडळांनी मागच्या आठवड्यात मुंबई महापालिकेच्या मंडप परवानगी पद्धतीसंदर्भात राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली होती. त्यावर राज यांनी गिरगावातील गणेश मंडळांना भेट देऊन 'तुम्ही बिनधास्त मंडप बांधा आणि गणेशोत्सव साजरा करा,' असे आश्वस्त केले होते. त्यासंदर्भात अमित यांनी आज फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, विभाग अध्यक्ष संतोष धुरी, धनराज नाईक व मुंबईतील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...