दुःखद / अमिताभ बच्चन यांचे पहिले मेकअप आर्टिस्ट पंढरीदादा यांचे निधन, भावूक झालेल्या बिग बींनी लिहिले - त्याने शेकडो अंतःकरणांना स्पर्श केले होते

पंढरीदादा हे नाव त्यांची ओळखच झाली होती.

दिव्य मराठी वेब टीम

Feb 18,2020 02:57:00 PM IST

बॉलिवूड डेस्कः चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ मेकअप आर्टिस्ट पंढरीदादा जुकर यांचे 17 फेब्रुवारी रोजी मुंबईत निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. सुमारे 60 वर्षे ते रंगमंच, मोठा पडदा आणि छोटा पडदा या माध्यमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा मेकअप करत होते. मधुबाला, मीनाकुमारी, राज कपूर, अशोक कुमार, देव आनंद, राजेश खन्ना, सुनील दत्त यांच्यापासून ते जुही चावला, माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, करीना कपूर यांचा मेकअप त्यांनी केला होता.


महानायकाचे पहिले मेकअप आर्टिस्ट


महानायक अमिताभ बच्चन यांनी पंढरीदादांच्या निधनाची बातमी चाहत्यांशी शेअर केली. त्यांनी ट्विटवर म्हटले, "पंढरी जुकर यांचे निधन. प्रार्थना आणि शोक. फिल्म इंडस्ट्रीचे आघाडीचे आणि आयकॉनिक मेकअप आर्टिस्ट, ज्यांनी आजच्या सर्वच प्रमुख मेकअप कलाकारांना ट्रेंड केले. हुशार, व्यावसायिक आणि अतिशय आकर्षक व्यक्तिमत्त्व. माझा पहिला मेकअप त्यांनीच केला होता."


पुढच्या ट्विटमध्ये बिग बी भावूक झाले


बिग बींनी पंढरी दादांसोबतचा आपला फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी भावनिक संदेश लिहिला. ते म्हणाले, "पंढरी जुकर आता राहिले नाहीत. मास्टर, आयकॉन आणि अल्टिमेट मेकअप आर्टिस्टचे निधन झाले. त्यांनी शेकडो चेहे-यांना स्पर्श केला आणि त्यांना आकर्षक बनवले. त्यांनी शेकडो अंतःकरणाला स्पर्श केला आणि आमचे प्रिय बनले."

अमिताभ आणि दादांचा प्रसिद्ध किस्सा


बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि पंढरी दादा यांच्या एक किस्सा खूप लोकप्रिय आहे. ही कहाणी त्या काळाची आहे जेव्हा बिग बी गोव्यात पहिल्यांदा 'सात हिंदुस्तानी' चित्रपटाचे शूटिंग करत होते. पटकथेच्या मागणीनुसार पंढरी दादांनी अमिताभ यांचा मेकअप केला. पण त्याच दिवशी अचानक त्यांना काही कामानिमित्त मुंबईला परतावे लागले. मग दादा गोव्याला परत येईपर्यंत अमिताभ त्याच मेकअपमध्ये राहिले आणि शूटिंग करत राहिले. मेकअप निघणार नाही या भीतीने त्यांनी आपले तोंड धुतले नव्हते आणि गुळणीही केली नव्हती.

X