आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडून आल्यावर अमोल कोल्हे यांनी चाहत्याला नारायणगाव येथे बोलावून दिल्या स्वतःच्या चपला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - चाहते कधी काय करतील हे सांगता येत नाही. वसमत तालुक्यातील धामणगाव येथील एका कार्यकर्त्याने डॉ. अमोल कोल्हे हे खासदार होईपर्यंत चप्पल घालणार नाही, असा निर्धार केला. आणि या निर्धाराची  फलश्रुती झाल्यानंतर सदर प्रकाराची दखल घेत  कोल्हे यांनी सदर कार्यकर्त्याला बोलावून घेऊन  त्याचा आदर सत्कार केला आणि स्वतःच्या पायातील चपला त्याला देऊन टाकल्या.


स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर  जोपर्यंत ते खासदार होत नाहीत, तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, असा निर्धार वसमत तालुक्यातील धामणगाव येथील सदाशिव बेले या तरुणाने केला होता. सदाशिव बेले याला स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेतील कोल्हे यांनी केलेली भूमिका फारच आवडली. कोल्हे यांच्या रूपाने साक्षात संभाजी महाराजच अवतरले की काय, असा त्यांना नेहमी भास होत होता. आणि त्यातूनच त्यांनी कोल्हे यांना विजयी होण्यासाठी निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत पायात चपला न घालण्याचा नवस देवाला बोलला. त्यांनी ४०-४५ अंश सेल्सियस तापमानाची व रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता त्यांनी चप्पल घालणे बंद केले होते. 


डॉ. कोल्हे यांच्या विजयानंतर धामणगाव येथे ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला व बेले यांना पेढे भरून अभिनंदन केले. काही उत्साही कार्यकर्त्यांनी हे फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल केले हा सर्व प्रकार खा. कोल्हे यांना  समजल्यानंतर त्यांनी बेले यांना नारायणगाव येथे बोलावून घेतले. नारायणगाव येथे ३० मे रोजी सदाशिव बेले व त्याचा मित्र दर्शन बेले गेले असता खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या चाहत्यांचा आदर सत्कार केला आणि स्वतःच्या पायातील कोल्हापुरी चप्पल काढून दिली. सदाशिव बेले हे मिळालेली भेट घेऊन आज  वसमत येथे परतले. त्यांचा आनंद गगनाला मावेनासा झाला.

बातम्या आणखी आहेत...