आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amol Muley Writes About Chandrabhaga Gurav, Eye Donations

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रकाशयात्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. नेत्रदानाबाबत मोठी जनजागृती करून गेल्या सहा वर्षांत ३४० डोळ्यांचे संकलन करणाऱ्या बीड इथल्या चंद्रभागा गुरव यांच्याबद्दल...

 

जन्मजात वा अपघाताने आलेल्या अंधत्वामुळे आयुष्यभर डोळ्यांसमोर अंधार घेऊन जगणाऱ्यांच्या आयुष्याच्या वाटा ‘तिमिरातून तेजाकडे’ नेण्याचा एक मार्ग असतो नेत्रदान. याबाबत मोठी जनजागृती, मोहिमा होऊनही सुशिक्षितांमध्येही नेत्रदानाचे प्रमाण अत्यल्पच म्हणावे असे. या पार्श्वभूमीवर, सहा वर्षांत तब्बल ३४० डोळ्यांचे संकलन करणाऱ्या बीड जिल्हा रुग्णालयातील नेत्रदान समुपदेशक चंद्रभागा गुरव यांचं काम लक्षणीय म्हणावं लागेल. विकासाच्या बाबतीत मागास असलेला बीड जिल्हा नेत्रदान चळवळीत मात्र राज्यात अग्रेसर आहे.


चंद्रभागा गुरव मुळातच सामाजिक भान असलेल्या, समाजकार्याच्या आवडीतून त्यांनी पदवीनंतर पदव्युत्तर पदवी समाजकार्य विषयात पूर्ण केली. अंबाजाेगाईच्या मानवलोक समाजकार्य महाविद्यालयात शिक्षण घेताना त्यांच्यावर डॉ. द्वारकादास व शैलजा लोहिया या दांपत्याच्या समाजकार्याचे संस्कारही झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ रत्नागिरी आणि त्यानंतर परभणीच्या रुग्णालयांमध्ये एचआयव्ही बाधितांच्या समुपदेशनाचे काम केले. एआरटी संेंटरमध्ये त्या समुपदेशक म्हणून कार्यरत होत्या. २०१२मध्ये त्या बीडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्रविभागात समुपदेशक पदावर रुजू झाल्या. गुरव म्हणतात, जिल्हा रुग्णालयात २००७पासूनच नेत्रदानाला सुरुवात झाली. परंतु, समुपदेशकाचे पद रिक्त असल्याने केवळ नेत्रदानाविषयी जनजागृती करण्याचे काम सुरू होते. माझी नियुक्ती झाल्यानंतर फेब्रुवारी २०१२मध्ये पहिले नेत्रदान करवून आणण्यात आम्ही यशस्वी ठरलो. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी अपघातात मृत पावलेले अंबादास डोंगदरदिवे (रा. चिंचाळा ता. वडवणी) यांच्या नातेवाइकांचे आम्ही समुपदेशन केले अन् त्यांनी नेत्रदानाला होकार दिला. तिथूनच जिल्हा रुग्णालयातील नेत्रसंकलनाचा श्रीगणेशा झाला. चंद्रभागा गुरव यांना एआरटी सेंटरमध्ये एचआयव्ही बाधितांचे समुपदेशन करण्याचा अनुभव असला तरी नेत्रदानासाठी समुपदेशन करण्याचं काम अधिक आव्हानात्मक आहे. एखाद्याच्या घरातील व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू होतो तेव्हा त्यांच्यासाठी तो खूपच दु:खद क्षण असतो. कुटुंबीयांची मन:स्थिती ठीक नसते. मात्र, याच परिस्थितीत मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना भेटून समुपदेशन करावे लागते. आपल्या प्रिय व्यक्तीच्या डोळ्यांमुळे एका अंधाच्या आयुष्याची वाट उजळणार असल्याचे सांगून त्यांना नेत्रदनाचे महत्त्व पटवून द्यावे लागते. आपण गमावलेल्या व्यक्तींचे किमान डोळे तरी जिवंत राहू शकतात आणि ते इतरांच्या कामी येऊ शकतात हे  कुटुंबीयांना पटवून देण्यात आपण  यशस्वी ठरलो की, या दु:खद प्रसंगातही नातेवाईक नेत्रदानाला होकार देतात, असं त्या सांगतात.त्या सहा वर्षांपासून समुपदेशनाचे हे काम प्रभावीपणे करत असल्यानेच आतापर्यंत सहा वर्षांत एकूण ३४० डोळ्यांचे संकलन जिल्हा सामान्य रुग्णालयाने केले आहे. यामध्ये २०१३ ते २०१५-१६ या तीन वर्षांत नेत्रदानाची उद्दिष्टपूर्ती करून बीड जिल्हा रुग्णालयाचा नेत्रविभाग राज्यात अग्रेसरही राहिला. नेत्रदान करणाऱ्या वर्गाविषयीही गुरव यांची निरीक्षणं आहेत. त्या म्हणतात, अल्पशिक्षित लोकांचे समुपदेशन करून त्यांना नेत्रदानासाठी तयार करणे सुशिक्षित लोकांच्या तुलनेत निश्चित सोपे असते. आपल्यामुळे अनेकांना दृष्टी मिळत असल्याचा आनंद आहेच. अपघातात मृत्यू पावलेल्या एका जोडप्याचे अन् त्याच दिवशी आत्महत्या केलेल्या एका शेतकऱ्याचे असे एकाच दिवसात तीन जणांचे नेत्रदान करून सहा डोळे संकलित करण्याचा प्रसंगही कायम लक्षात राहणारा असल्याचे त्यांनी सांगितले. बीड येथे संकलित केलेले डोळे जालना येथील गणपती नेत्रालयाच्या आय बँकेत पाठवले जातात. तिथेच गरजूंना नवी दृ़ष्टी देण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. गुरव यांचे हे काम अनेकांचे आयुष्य ‘तिमिरातून तेजाकडे’ नेणारे आहे. म्हणूनच हा ‘प्रवास उजळणाऱ्या वाटांचा’ आहे.


जाणीव गरजेची : चंद्रभागा एका पायाने दिव्यांग आहेत त्यामुळे शरीराचा एक भाग व्यवस्थित नसेल तर कशा प्रकारे अडचणींचा सामना करावा लागू शकतो याचा त्यांना अनुभव आहे. त्यातच दोन्ही डोळ्यांनी अंध व्यक्तींच्या अडचणी अधिकच. याच अंधाच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण आपल्यामुळे मिळू शकतो हे ओळखून चंद्रभागा गुरव मृत व्यक्तींचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक यांचे समुपदेशन करून नेत्रदानासाठी त्यांना तयार करतात. नातेवाईक नकार देत असतील तर जिल्हा रुग्णालय पोलिस चौकीतील पोलिस, वैद्यकीय अधिकारी व इतर सामािजक कार्यकर्त्यांची मदत घेत नातेवाइकांचा नकार होकारात बदलवण्याचे शक्य तितके प्रयत्न करतात. 
    

३२ वर्षीय चंद्रभागा,  पती, सासूसासरे यांच्या पाठिंब्यामुळे आपण हे काम करू शकत असल्याचे सांगतात. गुरव यांना दोन मुले आहेत. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर समुपदेशनासाठी त्यांना वेळी-अवेळी रुग्णालयात यावे लागते, कुटुंबीय नेत्रदानाला तयार होईपर्यंत त्यांची समजूत काढावी लागते यात उशीरही होतो. नेत्र संकलनानंतर तत्काळ हे डोळे जालन्याच्या आय बँकेत पाठवावे लागतात ते वेळेत पोहोचणे आवश्यक असते. नाहीतर त्यांचा इतरांना उपयोग होत नाही. त्यामुळे कुटुंबीयांची मदत होते, असे त्या म्हणाल्या.

- अमोल मुळे, बीड
amol.mule@dbcorp.in

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser