Magazine / श्रमदानाचे, एकजुटीचे ५० दिवस

स्त्रीचे विश्व हे फक्त चूल आणि मूल एवढेच नाही, हे वेळोवेळी महिलांनी सिद्ध केले आहे

अमोल पाटील

Jun 11,2019 12:18:00 AM IST

स्त्रीचे विश्व हे फक्त चूल आणि मूल एवढेच नाही, हे वेळोवेळी महिलांनी सिद्ध केले आहे. महिलांच्या संघटनातून पाण्यासाठी तहानलेल्या गावाचा कायापालट होऊ शकतो याचे प्रत्यक्ष उदाहरण शिंदखेडा तालुक्यातील साळवे गावात पाहायला मिळते.

सतत दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील साळवे हे दोन हजार ३०० लोकवस्तीचे गाव चार वर्षांपासून अल्प पर्जन्यामुळे सतत गावकऱ्यांना तीव्र टंचाईला सामोरे जावे लागते. डिसेेंबर महिना संपल्यानंतर गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. हे वर्षानुवर्षांपासून सुरू असलेले दुष्टचक्र बदलवण्याचा संकल्प चैतन्य टेरिफ नक्षत्र ग्रामीण महिला स्वयंसिद्धा संघाच्या अध्यक्षा मंगलाबाई भारती यांनी केला. गावात पाणी फाउंडेशनच्या चमूने गावकऱ्यांना वॉटर कप स्पर्धेच्या सहभागासाठी आवाहन केले.
या आवाहनाला प्रतिसाद देत मंगलाबाई यांनी पाच दिवसांचे निवासी प्रशिक्षण घेतले. त्यांच्यासमवेत इतर बचत गटांच्या महिलांनीदेखील सहभाग घेतला. प्रशिक्षणानंतर गावात परतल्यावर तत्काळ आपल्या १५ बचत गटांच्या २०० महिलांची बैठक घेतली. या बैठकीत गाव पाणीदार करण्याचा संकल्प सोडण्यात आला. याकरिता दुसऱ्या दिवसापासून महिलांनी श्रमदानाची चळवळ उभी केली.


प्रारंभी पुरुषांनी हिणवले. मात्र, नामोहरम न होता मंगलाबाई आणि त्यांच्या साथीदार सुमन नेवाड, मीना माळी, कोकिळा गिरासे यांनी महिलांची मोट उभारली. ८ एप्रिलपासून २७ मेपर्यंत नित्य नियमाने हाता टिकाव, फावडी घेत गाव शिवारात श्रमदानासाठी सर्व २०० महिला हजर राहिल्या. ५० दिवसांत गाव परिसरात तब्बल १५ हजार घनमीटर काम केले. त्यांच्या श्रमदानाच्या कामाची दखल घेत शासनाने यंत्र उपलब्ध करून दिल्यामुळे यंत्राच्या साहाय्याने २० हजार घनमीटर काम करण्यात आले.


मंगलाबाई आणि त्यांच्या साथीदारांच्या जलसंधारणाच्या चळवळीत सहभागी होण्यासाठी १ मे राेजी जिल्हाधिकाऱ्यांसह पंचक्रोशीतील नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे अधिकारी व पदाधिकारी अशा दोन हजार नागरिकांनी साळवे गावात येऊन श्रमदान केले. परिणामी उन्हाळ्यात साळवे गाव आणि परिसरात तब्बल ३५ हजार घनमीटर काम झाले आहे. त्यात सीसीटी, डीपसीसीटी, शेततळे अशी कामे केली. गाव पाणीदार व्हावे, येणाऱ्या काळात महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरावा ही एकमेव इच्छा असल्यामुळे महिलांनी नेत्रदीपक कामगिरी केली. आगामी पावसाळ्यात निसर्गाची साथ राहिली तर लाखो लिटर जलसाठा निर्माण होण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून साळवे आणि परिसरातील गावे पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होणार आहेत.

गाव हिरवे करण्याचा संकल्प
आगामी उन्हाळ्यात याच जलसाठ्याच्या बांधावर वृक्षारोपणाचा संकल्प महिलांनी केला आहे. याकरिता गावातच स्वत:ची रोपवाटिका तयार केली आहे. या रोपवाटिकेत एक हजार ७०० रोपांची लागवड झाली आहे. याशिवाय वन विभाग आणि कृषी विभागाकडून गावासाठी रोपे उपलब्ध होणार आहेत..
> लेखकाचा संपर्क : ९७६५४२९९२७

X
COMMENT