पोलिस उपनिरीक्षकाच्या खात्यातून / पोलिस उपनिरीक्षकाच्या खात्यातून बनावट चेकद्वारे काढली तब्बल 12 लाखांची रक्कम

महाराष्ट्र पोलिस अकादमीमधील घटना, गुन्हा दाखल 

प्रतिनिधी

Dec 15,2018 09:38:00 AM IST

नाशिक- महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी असलेल्या उपनिरीक्षकाच्या बँक खात्यातून १२ लाखांची रक्कम परस्पर वर्ग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बँक खाते असलेल्या आयडीबीआय बँक शाखा गंगापूररोड येथे उघडकीस आला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयिताच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि महाराष्ट्र पोलिस अकादमीचे सहायक संचालक भरत हुंबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१४ ते २०१६ या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक दुष्यंत दादासाहेब पाटील यांच्या आयडीबीआय बचत खात्यावर वेगवेगळ्या तारखांना महाराष्ट्र पोलिस अकादमीमधील आहरण व संवितरण अधिकारी यांच्या खात्याचे चार चेकद्वारे ११ लाख ९० हजार ३६५ रुपये उपनिरीक्षक दुष्यंत पाटील यांच्या नावाचे बनावट कागदपत्र तयार करून त्यांच्या बँक खात्यात जमा केले. ही जमा रक्कम खात्यातून डेबिट कार्डद्वारे वेगवेगळ्या तारखांना काढून घेत अपहार केल्याचे सहायक संचालकांच्या लक्षात आहे.

हुंबे यांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र पोलिस अकादमी अथवा बँकेमधील अनोळखी संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक एस. आर. साबळे तपास करत आहे.


संशयिताचे नाव निष्पन्न :

गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर तंत्रविश्लेषन शाखेच्या मदतीने तपास केला असता अपहार करणाऱ्या संशयिताचे नाव निष्पन्न झाले आहे. लवकरच या संशयिताला अटक केली जाईल, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

प्रशिक्षणार्थीच्या बँक खात्याचा गैरवापर
पोलिस अकादमीत प्रशिक्षणार्थी असलेले दुष्यंत पाटील हे पोलिस सेवेत दाखल झाल्यानंतर कर्तव्य बजावताना त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. याचा गैरफायदा घेत संशयिताने त्यांच्या टीए, वेतन फरक आणि अन्य बिलांचे देणे असल्याचे भासवत बँकेत त्यांच्या नावे बोगस खाते उघडले. त्यांच्या नावाचा मोबाइल नंबर घेतला. या आधारे बँक व्यवहाराची सर्व माहिती पाटील यांना न जाता संशयिताला जात हाेती.

X
COMMENT