आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: उत्तमसरात आढळली विषारी घोणसाची 36 पिल्ले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - बडनेरापासून जवळच असलेल्या उत्तमसरा गावात एकाच ठिकाणी घोणस या विषारी सापाची तब्बल ३६ पिल्लं शुक्रवारी (दि. १०) आढळून आली. जहाल विषारी असलेल्या या पिल्लांना व मादी सापाला वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी सुरक्षितरित्या वन विभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे.

 

पावसाळा हा काळ सापांच्या प्रजननासाठी अत्यंत अनुकूल असतो. त्यामुळेच जून ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान विविध जातीचे साप प्रजनन करून अंडी देतात तर काही साप थेट पिल्लांना जन्म घालतात. दरम्यान घोणस प्रजातीमधील मादी साप थेट पिल्लांना जन्म घालतात,असा समज आहे. उत्तमसरा गावाला लागूनच 'वसा' संस्थेचे रेस्क्यूू सेन्टर आहे. याच सेंटरपासून काही अंतरावर काडी कचऱ्यामध्ये वसाचे सर्पमित्र भूषण सायंके यांना सापाची दोन पिल्लं आढळून आली. त्यामुळे त्यांना अधिक पिल्ल परिसरात असण्याची शंका आली व त्यांनी शोध सुरू केला असता परिसरात सापांच्या फुत्कारण्याचा आवाज आला. त्यामुळे भूषण यांनी निरखून पाहिल्यावर त्यांना घोणस व तिचे पिल्लं दिसली. त्यामुळे त्यांनी वसाच्या इतर सर्पमित्रांना बोलवून ती पिल्ल व मादी काडीकचऱ्यातून बाहेर काढली. कारण ही पिल्लं व मादी मुख्य रस्त्यावर तसेच वसाच्या रेस्कू सेंटरपासून जवळच होते. रेस्कू सेंटरमध्ये विवीध प्राण्यांवर उपचार सुरू असतो, त्यामुळे ही पिल्लं व मादी त्या परिसरात घातक ठरली असती. दरम्यान, सर्पमित्रांनी बडनेरा वनपरिक्षेत्राचे कार्यालय गाठले. त्याठिकाणी साप व पिल्लांची नोंद करून वनाधिकाऱ्यांच्या समक्ष सर्व सापांना जंगलात मुक्त केले. यावेळी वसाचे भूषण सायंके, सागर शृंगारे, शैलेश आखरे, मुकेश वाघमारे, सागर फुटाणे, रोहित रेवाळकर, अनिकेत सरोदे यांच्यासह वनाधिकारी तसेच इतर वन्यजीव प्रेमी उपस्थित होते.


समज-गैरसमज : घोणस सापाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर बाहेर काढतो. त्यामुळे कित्येकांचा असा गैरसमज आहे, की घोणस सस्तन प्राण्यांप्रमाणे पिल्लांना जन्माला घालतात.

 

अलीकडच्या काळात पहिल्यादांच घडले
घोणस सापाची मादी एकावेळी १४ ते ६९ पिल्लांना जन्म देऊ शकते. आम्ही उत्तमसरा मध्ये मादी घोणस सापासह तिचे ३६ पिल्लं आज पाहीली. या मादी घोणस सापाची लांबी ४ फूट ११ इंच होती तर पिल्लांची सरासरी लांबी ६ ते ९ इंच होती. एकाचवेळी ३६ पिल्ल व मादी दिसण्याची ही अलीकडच्या काळातील आपल्या भागातील पहिलीच वेळ असल्याचे 'वसा'चे सर्पमित्र गणेश अकर्ते यांनी 'दिव्य मराठी'सोबत बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...