आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई, काकू, मावशी.. आजी सुद्धा Online!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमृता देसरडा 

आजची पिढी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असली, तरी जुनी पिढीदेखील स्वतःचा झेंडा त्यावर रोवते आहे. त्यात आज्जी, आई, काकू, मावशी, आत्या यांसारख्या अनेक भूमिका पार पाडणारी स्त्री कशी मागे राहील? या माध्यमांच्या जाळ्यात आज त्याही आपले अवकाश शोधत आहेत, स्वतःची ओळख वाढवत ती ठळक करत आहेत...
लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सध्या ट्रेंडी असूनही खूप गरजेची असणारी गोष्ट कुठली असेल, तर ती आहे सोशल मीडिया. रोजच्या जगण्यात आपण काय करतो, कुठे जातो, कुणासोबत असतो हे सांगण्याची इच्छा फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून कोट्यवधी लोक पूर्ण करून घेतात. त्यात गृहिणी, अर्धवेळ नोकरी करणाऱ्या, निवृत्त महिला, लेखन, फोटोग्राफी यांसारखे छंद उतारवयात जोपासणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. नाशिकच्या ज्योत्स्ना जगताप या गृहिणी आहेत. त्यांच्या एका मुलीचं नुकतंच लग्न झालं आहे, तिच्या लग्नाबद्दल त्यांनी खूप साऱ्या पोस्टस् आणि फोटो अपलोड केले. त्यांना फेसबुक हे माध्यम मनातल्या भावना व्यक्त करायला चांगलं वाटतं. त्यांच्या मते, फेसबुकवर स्क्रोल करताना जगात काय चालू आहे, हे समजत राहतं. सगळ्या गोष्टींची माहिती नसली, तरी त्यावर सुटं सुटं व्यक्त होता येतं. कुठल्याही ओळखीच्या नसलेल्या व्यक्तीशी बोलता येतं. लोकांच्या कमेंट्स वाचायला त्यांना खूप आवडतात. त्यात वेळ कसा जातो, हे समजत नाही. रोज एखादं निरीक्षण, घटना किंवा अनुभव फेसबुकवर शेअर करायलाही आवडतं. जीवनातले आनंदाचे क्षण, मुलांचे वाढदिवस, लग्न समारंभ, लग्नाचा वाढदिवस, अगदी कुणी जवळच्या किंवा लोकप्रिय व्यक्तीचे निधन झाले, तरी सोशल मीडियावर स्टेट्स अपडेट केले जातात, इतकं हे माध्यम एकाच वेळी खासगी आणि सावर्जनिक झालं आहे. 

सुरेखा भोर या आळेफाटा या छोट्याशा कोपऱ्यात राहणाऱ्या गृहिणी. एक आज्जी म्हणून घरातला आणि व्यवसायाचा व्याप सांभाळत त्या त्यांच्या पतीसोबत ट्रेकिंगला जातात, त्या त्यांच्या टाइमलाइनवर नेहमी ट्रेकिंगचे फोटो अपलोड करतात. सगळ्या कुटुंबाचे, स्नेही लोकांच्या वाढदिवसाचे फोटो त्या आवर्जून सोशल मीडियावर पोस्ट करतात. पुण्याच्या शुभा रुद्र या निवृत्त कलाशिक्षिका. वयाची साठी ओलांडली, तरी त्यांचा सोशल मीडियावरील उत्साह वाखाणण्यासारखा आहे. त्यांना लेखन, वाचन, विविध रेसिपीज करायची खूप आवड आहे. त्यांच्या मते, नवोदित लेखकाला फेसबुकच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळतं. आपण काय लिहायला हवं आणि काय नाही, याचं भान त्यांना येतं. त्या दिवसातून फक्त वीस मिनिटे फेसबुकवर येतात आणि ज्या सकारात्मक गोष्टी आहेत तेवढ्याच टिपतात. त्यांना साहित्यिक ग्रुप्स किंवा कम्युनिटीजवर काय चालू आहे, हे जाणून घ्यायला खूप आवडतं.


औरंगाबादमधील पन्नाशी पार केलेल्या वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या ज्योती पाटील या सुद्धा खूप अॅक्टिव्ह असतात. त्यांच्या मते, सोशल मीडियामुळे लोक एकमेकांच्या अधिक जवळ आले आहेत. त्यांच्यात कनेक्टिव्हिटी वाढली आहे. लोकांच्या ज्ञानात भर पडते, त्यातून सकारात्मक परिणामही होतात. परंतु, त्यातून प्रत्यक्ष संपर्क कमी होऊन आभासी संपर्क वाढला आहे. ती त्यांना या माध्यमांची कमजोर बाजू वाटते. घरात राहूनही मोबाइलच्या एका क्लिकवर आपण जगाशी संपर्क साधू शकतो, हा चमत्कार अनेक जणींना हवाहवासा, तर काही जणींना नकोसा वाटतो. जुन्या पिढीनं टेक्नोसॅव्ही असायला हवं आणि नवीन पिढीशी संवादी राहण्यासाठी या माध्यमांचा वापर करायला हवा, याचं भान येऊ लागलं आहे. हे माध्यम किती, कसं आणि कधी वापरायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचं असलं, तरी या आकर्षक, आभासी दुनियेत प्रत्येकासाठी एक वेगळं, अकल्पित जग निर्माण होत आहे.         

संपर्क- ९५५२५१६५१३

बातम्या आणखी आहेत...